Onion Market :-कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून यावर्षी संपूर्ण हंगामात कांद्याचे दर घसरलेले राहिल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसला. बऱ्याच ठिकाणी कांद्याचा उत्पादन खर्च देखील निघणे कठीण होऊन बसले. त्यातल्या त्यात यावर्षी हवामानातील बदलामुळे कांद्याची टिकवणक्षमता देखील कमी झाल्यामुळे साठवून ठेवलेला कांदा देखील लवकर खराब होत आहे. साधारण या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी चहुबाजूने घेरले गेले आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
परंतु गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या बाजारभावात बऱ्यापैकी सुधारणा होताना दिसून येत आहे. सध्या जर आपण कांद्याचे मार्केट पाहिले तर ते दोन हजार रुपयांच्या आसपास किंवा त्यापुढे असून किरकोळ बाजारामध्ये 35 ते 40 रुपयांच्या पुढे कांद्याचे बाजार भाव सरकले आहेत. त्यातच केंद्र सरकारने नेहमीसारखाच यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला व नाफेडच्या स्टॉक मधील कांदा खुल्या बाजारात विकणार असल्याचे समोर आले. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांमध्ये यामुळे प्रचंड नाराजी पसरले.
कांदा दराला पोषक स्थिती मात्र मध्येच नाफेडची एन्ट्री
सध्या कांदा आवक कमी झाल्याचे दिसून येत आहे. म्हणजेच देशाची कांद्याची जी काही मागणी आहे त्यापेक्षा पुरवठा कमी होत असल्यामुळे बाजारभावातील सुधारणा दिसून येत आहे. तसेच कांदा निर्यात देखील सुरू असून बांगलादेशातून देखील कांद्याला मागणी होत आहे.
तसेच प्रमुख कांदा उत्पादक राज्य आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील जो काही खरीप कांदा आहे तो देखील एक ते दीड महिने उशिरा आहे. त्यामुळे राज्यातील कांद्याला चांगले दिवस येतील अशी एक अपेक्षा आहे. सध्या दोन हजाराच्या पुढे कांद्याचे दर बऱ्याच ठिकाणी दिसून येत आहेत.त्यातच केंद्रीय ग्राहक कल्याण विभागाने नाफेडच्या स्टॉक मधील कांदा विकणार असल्याचे जाहीर केले व कांदा दर वाढीला ब्रेक लागल्याचे चित्र निर्माण झाले.
नाफेडचा जर कांद्याचा स्टॉक बघितला तर तो तीन लाख टन असून हा कांदा नाफेड बाजारात आणून विकत आहे. परंतु खरच नाफेडच्या या तीन लाख टन कांद्यामुळे कांद्याच्या दरावर परिणाम होईल का? कारण देशाची जर दैनंदिन गरज पाहिली तर ती 50 हजार टन कांद्याची असून नाफेडने त्यांचा सर्व तीन लाख टन कांदा जरी विकून टाकला तरी देशाला फक्त सात दिवस पुरेल एवढाच कांदा आहे.
त्यामुळे नाफेडच्या कांद्याचा कांदा बाजारावर परिणाम होईल असे तरी शक्यता नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून पुरवठा न वाढवता बाजारपेठेचा अंदाज घेऊनच कांदा बाजारात आणणे गरजेचे आहे. म्हणजेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग टाळणे महत्त्वाचे आहे.
येणारा महिना कांदा बाजारभावासाठी कसा राहील?
जर आपण यावर्षीच्या खरीप हंगामाचे कांदा लागवड पाहिले तर बऱ्याच भागांमध्ये ती खूप उशिरा झाली आहे. तसेच जुलैमध्ये झालेला जास्तीचा पाऊस आणि आता या ऑगस्ट महिन्यातील पावसामधील मोठा खंड याचा परिणाम देखील खरीप हंगामातील कांद्यावर होण्याचा परिणाम आहे.
त्यामुळे येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याच्या भावात आणखी वाढ होईल अशी शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. कांदा येणाऱ्या दिवसात तीन ते चार हजारांचा टप्पा देखील गाठू शकेल. त्यामुळे काही काळ तरी कांद्याचे भाव स्थिर राहतील असा देखील अंदाज कांदा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.
Share your comments