
Electricity News
मुंबई : अपारंपरिक वीज पुरवठ्याची नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात ३१ गावे व ८५ वाडी व पाडे, अक्कलकुवा तालुक्यात ५ गावे, २३० वाडी व पाडे यांना अपारंपारिक पद्धतीने वीजपुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील अपारंपारिक पद्धतीने वीज पुरवठा करण्यात येत असलेल्या या सर्व गावे, वाड्या व पाड्यांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील गावांना वीज पुरवठा करण्याबाबत सदस्य आमश्या पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला होता.या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात गावे, वाडी व पाड्यांना पारंपरिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात आला आहे. यामध्ये अक्कलकुवा तालुक्यात १८५ गावे, ७४९ वाडी व पाडे आणि धडगाव तालुक्यातील १३१ गावे, ९१६ वाडी व पाडे यांचा समावेश आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात पारंपरिक पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जन मन योजनेतूनही निधी मिळणार आहे. नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता पुढील दीड ते दोन वर्षात संपूर्ण गावे, पाडे आणि वाड्यांना पारंपारिक पद्धतीने वीजपुरवठा करण्यात येईल,असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Share your comments