
Climate change news
डॉ. हिमालय गणाचारी, डॉ. भाऊ गावित, डॉ. संगीता शिंदे, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. वीरेंद्र बराई
वातावरणामध्ये होत असलेला बदल आणि पिकांवर होणारा त्याचा परिणाम हे काही नवीन नाही. हवामान बदल ही काही एका दिवसात किंवा वर्षांमध्ये होणारी घटना नाही. वर्षानुवर्षे होणारी वृक्षतोड, औद्योगीकरण/शहरीकरण, मोठ्या प्रमाणात होणारे कार्बन उत्सर्जन इत्यादींचा हा परिणाम आहे. आजच्या परिस्थितीत नुसते कारणे माहीत असून चालत नाही तर त्यामुळे होणाऱ्या परिणाम सुद्धा माहित असणे आवश्यक आहे.
हवामान बदलामुळे होणारे परिणाम
- उष्णता/तापमान वाढ
- तीव्र वादळे
- वाढता दुष्काळ/ पूर
- आरोग्यास वाढणारा धोका
- अनियमित होणारा पाऊस
हवामान बदलामुळे होणाऱ्या परिणामांमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे पर्जन्याची अनियमितता. मान्सून हा जून मध्ये येऊन ऑक्टोबर, नोव्हेंबर पर्यंत राहायचा, पण आता तो जुलै ऑगस्ट महिन्या पासून वर्णी देतो. त्यामुळे पिकावर सुद्धा त्याचा परिणाम होऊ लागला आहे. पेरणी जून मध्ये होऊन सुद्धा पाण्याची असलेली कमतरता यामुळे पिके जळून जाऊ लागली आहेत. परिणामी त्यांचे उत्पन्न घटले. अशावेळी पाण्याची कमतरता/गरज पूर्ण करण्यासाठी शेततळे हा एक उत्तम उपाय आहे.
शेततळे आणि उपयोग
- पावसाचे पाणी वाहून जाण्यापासून रोखता व साठवता येते.
- कोरड्या हंगामात आवश्यकतेनुसार विश्वसनीय जलस्रोत म्हणून कामी येतो.
- दुष्काळी भागात पाणीटंचाईच्या विरोधात आशेचा किरण म्हणून काम करते.
- शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लावते.
- सातत्यपूर्ण उत्पादन राखण्यास मदत होते.
- जमिनीचे आरोग्य व उत्पन्नात सुधारणा होते .
- पिकांमध्ये विविधता येते.
- पशुधन वाढी करता उपयोग होतो.
- मत्स्य पालन आणि सिंचन अशी दुहेरी उत्पादने घेता येतात.
शेततळे आधारित योजना
शेतकऱ्यांमध्ये शेततळ्याचा वापर वाढविण्यासाठी शासनामार्फत वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात, त्यामध्ये प्रामुख्याने खालील योजनांचा समावेश आहे.
- मागेल त्याला शेततळे योजना.
- मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेततळे.
- मनरेगा अंतर्गत शेततळे अनुदान योजना.
- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना.
- सामुदायिक शेततळे (पोखरा अंतर्गत) अनुदान योजना.
- प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना
- जलयुक्त शिवार योजना
- गटशेती अंतर्गत सामूहिक शेततळे योजना.
शेततळ्यासाठी आवश्यक जागेचे निकष
शेततळे खोदण्यासाठी जागेची निवड खूप महत्त्वाची आहे म्हणून शेततळे घेण्यापूर्वी शेतकऱ्यांनी खालील निकषांचा विचार करणे गरजेचे आहे.
- ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन असलेल्या जागेची निवड करावी.
- काळी जमीन ज्यात चिकन मातीचे प्रमाण जास्त आहे, अशी माती चांगली असते.
- मुरमाड, वालुकामय सच्चिद्र खडक असलेल्या जमिनीची निवड करू नये.
- जमिनीचा उतार तीन टक्क्यांपेक्षा कमी असावा.
- नाल्याच्या प्रवाहात शेततळे घेण्यात येऊ नये.
- शेततळ्याची पाणी साठवण क्षमता पाणलोट क्षेत्रातून वाहून येणाऱ्या पाणी क्षमते पेक्षा जास्त असावी.
ज्यावेळी शेतातून किंवा शेताजवळून नाला वाहत आहे आणि नाल्याचा उतार तीन ते पाच टक्क्यापर्यंत आहे. तेव्हा नाल्यातील प्रवाहाला काटकोनात बांधून शेततळे तयार करता येते. तसेच शेतात मध्यभागी किंवा एक बाजूला खोलगट जागा असेल, तर खड्डा खोदून शेततळे तयार करता येते. शेततळे तयार करताना शेततळ्याची जागा निवडणे व त्याचा आकार ठरविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेततळ्यात वाहून येणारे पाणी जास्त दिवस थांबावे या दृष्टीने पाण्याचा पाझर कमी असलेल्या चिबड जमिनीत शेततळे घ्यावे. अन्यथा माती किंवा पॉलिथिनचे अच्छादन वापरून पाझर कमी करता येईल अशी जमीन निवडावी. त्याचबरोबर साठविलेल्या पाण्याचा वापर सोयीस्कर करता येईल असे ठिकाण निवडावे. शेततळ्याचा आकार ठरवितांना शेततळ्यात वाहून येऊ शकणारा अपधाव, बाष्पीभवनाद्वारे आणि पाझरामुळे होणारा व्यय आणि आपल्याला आवश्यक असणारे पाणी या सर्व बाबींचा ताळमेळ घालून मगच निर्णय घ्यावा.
शेततळे आणि त्याचे प्रकार
शेततळ्याचे आकारमान हे लांबी × रुंदी × उंची या सूत्राद्वारे काढले जाते. आकारमानानुसार विचार करता शेततळे व त्याचे विविध प्रकार प्रामुख्याने खालील प्रमाणे.
- तटबंधी असलेले शेततळे
- खोदलेले शेततळे
- तटबंधी असलेले शेततळे
अश्या प्रकारची शेततळे हि अपधावेच्या विरुद्ध दिशेला बांधून त्याला तटबंधी करतात. तसेच ह्याचे आकारमान, साठवण क्षमतेच्या गरजेवर ठरवतात. सौम्य व माध्यम उतार अश्या प्रकारच्या शेततळ्यासाठी योग्य असतो. अशा प्रकारचे शेततळे आकृती क्रमांक एक मध्ये दाखविल्याप्रमाणे असते.
- 2.खोदलेले शेततळे
ह्या प्रकारच्या शेततळ्याना योग्य प्रकारचा आकार असतो म्हणजे, आयताकार, चौकोनी इत्यादी. पाणी आत येण्यासाठी इनलेट व पाणी बाहेर काढण्यासाठी आउटलेट असते. याचे बांधकाम करण्यासाठी, माती जमिनीमधून खोदून काढतात आणि तीच माती तटबंधी बनवण्यासाठी वापरतात. याची उंची व आकार आवश्यक पाण्याच्या साठवण क्षमतेवर अवलंबून असते. अशा प्रकारच्या शेततळ्याचे काही उपप्रकार खालील प्रमाणे
- डग आउट शेततळे:
सौम्य उतार असलेली जमीन अशाप्रकारच्या शेततळ्यासाठी योग्य असते. उतार ज्या दिशेला असतो त्या दिशेला ह्याचे बांधकाम करता. अशा प्रकारचे शेततळे आकृती क्रमांक २ (अ) मध्ये दाखविल्याप्रमाणे असते.
- सरफेस शेततळे :
जेव्हा अपधाव शेतामधून वाहत जाऊन एखाद्या खड्ड्यामध्ये साठतो त्याला सरफेस पॉन्ड म्हणतात. ह्याची खोदण्यासाठी लागणारी उंची कमी कमी असते. चढउताराची जमीन ह्या साठी योग्य असते. याला इनलेट नसले तरी चालते पण आउटलेट असणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे शेततळे आकृती क्रमांक २ (ब) मध्ये दाखविल्याप्रमाणे असते.
- स्प्रिंग किंवा क्रीक फेड शेततळे :
ह्या प्रकारचे शेततळे हे डोंगर किंवा टेकडी च्या पायथ्याशी बांधले जातात. अशा प्रकारचे शेततळे आकृती क्रमांक २ (क)मध्ये दाखवल्याप्रमाणे.
- ऑफ स्ट्रीम स्टोरेज शेततळे :
अश्या प्रकारचे शेततळे हे नैसर्गिक नाल्याच्या विरुद्ध बाजूला बांधले जाते. ह्या मध्ये नाल्यामधून पाणी वळवून सोडले जाते व जास्तीचे झालेले पाणी आऊटलेट मधून बाहेर काढले जाते. अशा प्रकारचे शेततळे आकृती क्रमांक २ (ड) मध्ये दाखविल्याप्रमाणे असते.
साधारणतः शेताच्या एकूण क्षेत्रफळाच्या पाच टक्के पेक्षा शेततळ्याचे क्षेत्रफळ जास्त असू नये. शेततळ्याची जागा आणि आकारमान ठरविल्यानंतर त्याची लांबी, रुंदी आणि उंची ठरवावी. सर्वसाधारणपणे शेततळ्याचा आकार आयताकृतीत ठेवावा, काही वेळा मात्र चौरसाकृती आकार सुद्धा ठेवतात. खड्डा खोदून तयार केलेल्या शेततळ्याची उंची तीन ते पाच पर्यंत ठेवावी. कडक मुरमाड जमिनीत तळ्याच्या बाजूंना एकास एक उतार द्यावा. ज्यावेळी खड्डा खोदून शेततळे तयार करायचे असेल त्यावेळी तळ्यातील माती काठापासून एक ते दीड मीटर दूर व्यवस्थित बांधाच्या आकारात टाकावी. त्यावेळी त्यावर शक्यतो कुंपण घालावे म्हणजे जनावरे तसेच लहान मुले आत येणार नाहीत. अशा तळ्यात संपूर्ण शेतातून वाहून येणारे पाणी आत येण्यासाठी व जास्त झालेले पाणी वाहून जाण्यासाठी दोन ठिकाणी मोरी ठेवावी. ही पद्धत त्या ठिकाणी वापरली जाते ज्या ठिकाणी पाणी साठवण संभाव्य प्रमाण एक पेक्षा जास्त असते. ज्या ठिकाणी हे प्रमाण एक पेक्षा कमी असते त्या ठिकाणी पाणी विहीर, नदी किंवा नाल्यांमधून उचलून शेततळ्यामध्ये सोडतात आणि मग त्याचा वापर करतात.
शेतातून वाहून येणारा गाळ शेततळ्यात जाऊ नये यासाठी शेततळ्यात पाणी येण्याच्या मोरीच्या अलीकडे एक छोटा आयताकृती खड्डा तयार करावा, जेणेकरून पाण्यासोबत येणारा गाळ खड्ड्यात साचून स्वच्छ पाणी शेततळ्यात जमा होईल. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी ह्या खड्ड्यात साचलेला गाळ काढून शेतात पसरवावा. शेततळ्यातून बाष्पीभवनाद्वारे होणारा व्यय कमी करण्याच्या दृष्टीने शेततळ्याच्या बाजूला झाडे लावणे जास्त श्रेयस्कर आहे. कारण त्यामुळे वाऱ्याचा वेग कमी होऊन बाष्पीभवनाचा वेग मंदावतो. खोदकाम करून तयार केलेल्या शेततळ्यातून पाण्याचा पाझर कमी करण्याच्या दृष्टीने पॉलिथिलिनचे आवरण जमिनीखाली 25 ते 30 सेंटीमीटर गाडून घ्यावे. यासाठी शेततळ्याचा तळ आणि उताराच्या सर्व बाजू सपाट कराव्यात. अनुकुचीदार दगड वेचून बाहेर टाकावेत, वाळू आणि मातीचा थर देऊन त्यावर 500 मायक्रॉन जाडीचे पॉलिथिन पसरवून व्यवस्थित करावे. उन्हाळ्यात शेततळे कोरडे झाल्यावर त्यातील गाळाची माती शेतात पसरून घ्यावी, जेणेकरून परत पावसाळ्यात शेततळ्यात पाणी चांगल्या प्रकारे साठवले जाईल आणि त्याचा उपयोग करून घेता येईल. शेततळ्यामधून शेतीला पाणी देताना ठिबक व तुषार सारख्या सूक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करावा जेणेकरून कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र ओलिताखाली आणता येते.
लेखक - डॉ. हिमालय गणाचारी, डॉ. भाऊ गावित, डॉ. संगीता शिंदे, डॉ. सचिन नांदगुडे, डॉ. वीरेंद्र बराई
पत्ता: मृदा आणि जलसंधारण अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी, अहिल्यानगर, महाराष्ट्र, ४१३७२२
दूरध्वनी: 90 9 00 71 209
ई-मेल: [email protected]
Share your comments