अवकाळीचं संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला काही तयार नाही. नागपूरसह विदर्भातील अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, भंडारा आणि चंद्रपुर जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांसह नागरिकांचं मोठं नुकसान केलं आहे. सुरुवातीला झालेल्या अवकाळी पावसातून शेतकरी कसा बसा सावरत होता तोच आता झालेल्या गारपिटीमुळे उरलं सुरलेलं पीकही उध्वस्त झालं आहे.
अवकाळीमुळे पोल्ट्री फार्ममधील हजारो कोंबड्याचा मृत्यू
नागपुरात येरणगावमधील एका पोल्ट्री फार्ममध्ये गारपीटीमुळं सात हजार कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. तर चंद्रपुरात वीज कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याला अवकाळी पाऊस आणि गारपिटीने चांगलाच झोडपले आहे. याच तालुक्यातील येरण गावच्या एका पोल्ट्री फार्ममधील तब्बल सात हजार कोंबड्या या गारपिटीमुळे दगावल्या असून शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे.
एवढंच नाही तर या परिसरातील आणखी दोन पोल्ट्री फार्ममध्येही शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांवर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत मृत पक्षी भरुन फेकण्याची वेळ आली आहे.
अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा; कांदा, भुईमुगासह भाजीपाला पिकाच मोठं नुकसान अमरावती जिल्ह्यात काल संध्याकाळी झालेल्या मुसळधार पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातल्या त्यात सर्वाधिक फटका हा धामणगाव रेल्वे तालुक्याला बसला आहे. रेल्वे तालुक्यातील आजणगाव गावातील तीळ, कांदा, भुईमुगासह भाजीपाला पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
अमरावती येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला हरभरा, गहू आणि सोयाबीन उघड्यावर असल्याने पूर्णपणे पावसात भिजला आहे. डोळ्यादेखतच शेतमालाचं आणि पिकांचं नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना रडू कोसळले. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, आर्णी, बाभुळगाव, महागाव, दारव्हा या तालुक्यातदेखील तीळ, हळद, भुईमूग, मका या पिकांसह आंबा, पाले भाज्या आणि फुलशेतीचं मोठं नुकसान झालं आहे.
तर सर्वाधिक फटका हा बाभूळगाव तालुक्याला बसला असून नांदुरा, उमरडा, चिमणा, बागापूर, नांदेसावंगी, नांदुरा, मांगुळ, अंतरगाव, मिटणापूर, वरखेड, पालोती, गिमोना, टाकळगाव, मालापूर या ठिकाणी बोर आणि लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करणार? कोणत्या उपाययोजना आखणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक बातम्या:
'राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सर्वगुण संपन्न आहेत तर मग शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत'? ;किसानपुत्रानं लिहिलं रक्तानं पत्र
शेतकऱ्यांवरील अन्यायकारक कायद्यांमुळे शेती विकासाला खीळ; सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, वाचा काय आहेत मागण्या?
शेतकऱ्याचा नादच खुळा! पुदिना लागवडीतून कमावला लाखोंचा नफा
Share your comments