जलद गतीने, कमी श्रमिक खर्चात तसेच कमी वेळात अधिकाधिक शेतीची कामे होण्यासाठी शेतकरी बांधव अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. सद्या शेतीच्या कामाच्या दृष्टिकोनातून 'ड्रोन' या तंत्रज्ञानाला बाजारात बरीच मागणी आहे. मात्र हे साधन सर्वच शेतकरी बंधूंना परवडेलच असे नाही. त्यामुळे या ड्रोनचा वापर करणे सगळ्यांना शक्य होईल आणि शेती व्यवसायाला गती मिळेल यासाठी 6 महिन्यांपासून केंद्र सरकारने ड्रोनचा शेतामध्ये वापर व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरु केले आहेत. अर्थसंकल्पात तर पेरणी क्षेत्राचे मोजमाप, भूमी अभिलेखांचे डिजिटायझेशन, कीटकनाशके आणि पोषक द्रव्यांच्या फवारणीसाठी ‘किसान ड्रोन’चा वापर केला जाणार आहे, अशी तरतूदही केली होती.
शेतीला अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो आणि हा कणा अजून भक्कम करण्यासाठी,विकसित करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करणं गरजेचं आहे. कृषिसंस्कृती आणि अत्याधुनिक यंत्रणे यांच्यातील सुसज्ज व्यवस्थापन शेती उद्योगात नक्कीच क्रांती घडवून आणू शकेल. या अनुषंगाने केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदी करता यावा यासाठी वैयक्तिक स्वरुपात आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील ईशान्यकडील राज्यातील शेतकऱ्यांना अनुसूचित जाती, जमाती, लघु व अत्यल्प भूधारक शेतकरी, महिला यांना खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 5 लाख रुपयांची आर्थिक स्वरूपात मदत केली जाणार आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना 40 टक्के किंवा जास्तीत जास्त 4 लाख रुपयांची आर्थिक सहाय्य मिळणार आहे.
ड्रोन खरेदीसाठी अनुदान :
ज्यांनी कृषीमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे त्यांना सीएचसी स्थापन करता येणार आहे. तसेच ड्रोन खर्चाच्या 50 टक्के दराने जास्तीत जास्त 5 लाख रुपयांच्या आर्थिक स्वरूपातील मदतीसाठी ते पात्र असतील. ड्रोन प्रात्यक्षिकासाठी आधीच निश्चित करण्यात आलेल्या संस्थांव्यतिरिक्त तसेच कृषी उपक्रमांमध्ये गुंतलेल्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनाही आता पात्रता यादीत आणण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे हा उद्देश असून त्यामुळे त्यांची सोय होईल व खर्चदेखील कमी होईल आणि त्यांचे उत्पन्न वाढेल, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी म्हटले आहे. ड्रोन हे अत्याधुनिक यंत्र शेतकऱ्यांपर्यंत नेण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असून सरकारही याबाबत कटिबद्ध आहे असे देखील कृषी सचिव मनोज आहुजा यांनी सांगितले.
ड्रोनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या शेतीचे महत्व
• 'ड्रोन' वापरातून शेतातील पिकांवर फवारणी करणं अधिक सोयीच तसेच जलद गतीनं काम होणं शक्य होईल.
• शेतात किडीचा प्रादुर्भाव अधिक वाढल्यास मनुष्यबळ हतबल होतात. मात्र ड्रोनमध्ये कीटकनाशक फवरण्याची क्षमता अधिक असल्याने किडीचा उपद्रव आटोक्यात आणण्यासाठी ही यंत्रणा फायदेशीर ठरते.
• अवकाळी पाऊस किंवा अतिवृष्टी यांवरही तोडगा म्हणून ड्रोनचा वापर केला जाऊ शकतो.
• ड्रोनच्या वापरामुळे कामास विलंब होत नाही. शिवाय मजुरांच्या तुलनेत ड्रोनद्वारे दुप्पट कामे होऊ शकतात.
• तसेच पिकांवर लक्ष ठेवणे. त्यांच्या आरोग्यविषयक असणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर नीट पाहणी करणे ड्रोनमुळे सोयीस्कर झाले.
• पीक वाढणीच्या काळातदेखील पिकांवर लक्ष ठेवणं सोयीचं होईल.
• शिवाय जमिनीचे परीक्षण करणं, जमीन मोजमाप करणं अशा वेळ घेणाऱ्या गोष्टी या यंत्रणेमुळे सहज सोप्या होतात.
• रासायनिक फवारणी अधिक प्रमाणात झाल्यास त्याचे तोटेही बरेच आहेत. ड्रोन या अत्याधुनिक यंत्रणेमुळे रासायनिक फवारणीचा अतिरिक्त वापर टाळला जातो.
• मोठ्या प्रमाणात केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये 'ड्रोन' चा वापर अधिक फायद्याचा आहे. कमी किंमतीत संपूर्ण शेतावर लक्ष ठेवण्यास मदत होते.
देशभरातील शेतीला चालना देण्यासाठी तसेच कमी श्रमात अधिकाधिक उत्पन्न येण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्रालय राज्य सरकारांना अनेक योजनांच्या माध्यमातून मदत करत आहे.
महत्वाच्या बातम्या:
खंडपीठात सुनावणी:हंगामाच्या शेवटी 40 टक्के ऊस शिल्लक, केंद्र आणि राज्य सरकारला शपथपत्र दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
आता मिळणार मोफत गॅस कनेक्शन; आजच घ्या लाभ, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया
भेंडवळची भविष्यवाणी आली! यावर्षी राहणार पावसाळा सर्वसाधारण, तिसऱ्या व चौथ्या महिन्यात भरपूर पावसाचे भाकीत
Share your comments