चंदन (Santalum album) हा छोट्या आकारमानाचा उष्ण कटिबंधीय वृक्ष आहे. याचे खोड सुगंधी आणि थंड असते. मूलतः भारतीय उपखंडातून उद्भवलेला हा वृक्ष आता भारतीय उपखंड चीन, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपिन्स व वायव्य ऑस्ट्रेलिया या प्रदेशांत याची लागवड केली जाते. हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या काहीशा नाजूक, खाली झुकलेल्या असतात. कर्नाटक, तामिळनाडू राज्यांत चंदनाचे वृक्ष विपुल प्रमाणात आढळतात.
चंदन उगाळून याचा लेप शरीराला लावण्याची पद्धत आहे. याचा वापर औषधी म्हणूनही करतात. माणसांना, देवाच्या मूर्तीला चंदनाच्या खोडाचा तुकडा उगाळून बनलेले गंध लावतात. चंदनाचे चारोळीसारखी असणारे फळ पक्ष्यांचे आवडते खाद्य आहे. चंदनाच्या बियांपासून 50 ते 60% पर्यंत लवकर सुकणारे कोरडे तेल (ड्रॉइंग ऑईल) मिळते. हे तेल इन्सुलेशन टेप व वॉर्निश बनविण्यासाठी वापरले जाते. त्याची पेंड जनावरांचे खाद्य व खत बनविण्यासाठी व अगरबत्तीला लागणारा लगदा म्हणून वापरतात. खोड आणि बियांप्रमाणेच चंदनाच्या मुळांमध्येही तेलाचा अंश असतो. चंदनाच्या तेलात असणाऱ्या सॅटॅलॉल या रसायनामुळे त्याला सुगंध आणि औषधी गुणधर्म प्राप्त होतात.
चंदनाची महती भारतीयांना अनेक वर्षांपासून आहे. प्राचीन काळातील लेखामध्ये चंदन वृक्षाची महती पाहावयास मिळते. चंदनाची जितकी मागणी आहे त्या तुलनेत उपलब्धतेचे प्रमाण खूप कमी आहे. जागतिक बाजारात चंदनाची मागणी सातत्याने वाढत आहे. कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांत चंदनाचे सर्वाधिक उत्पादन होते. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ, आंध्र प्रदेश या राज्यांतील चंदनाचे क्षेत्र वाढीस लागले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रातही चंदनाने मूळ धरले आहे. विशेषत: महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम 1964 अन्वये चंदनाच्या तोडीस बंधन घातले गेले आहे. चंदन चोरीची भीती असल्याने आजवर शेतकरी यापासून दूर राहिला होता. तसेच कायद्याच्या अडचणीही जाचक बनल्या होत्या.
अलीकडे केंद्र व राज्य शासनानेही चंदन लागवडीस प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे राज्याच्या सर्वच भागांमध्ये चंदन लागवड लक्षणीय प्रमाणामध्ये वाढू लागली आहे. ही झाडे किडमुक्त असल्यामुळे ह्याचा वापर औषधी, फर्निचर साठी चंदनाचा उपयोग होतो. परदेशातही चंदनाला मागणी आहे. चंदनाच्या झाडाला एक इलेक्ट्रॉनिक चिप लावल्यास चोरी तसेच तस्करी पासून देखील सुटका होते. चोरी किंवा तत्सम प्रकार घडल्यास मोबाईल वर संदेश येतो त्यामुळे 7/12 वर नोंद केली जाते. चंदनाचे झाड बळीराजालाही लखपती नव्हे तर कोट्याधीश बनविणारे आहे. सांप्रतकाळी महाराष्ट्र देशी दुष्काळ झळा बसू लागल्या आहेत. जलसमृद्ध म्हणविल्या जाणाऱ्या पश्चिमेकडील जिल्ह्यातील पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. अशा स्थितीत चंदनाची शेती ही शेतकऱ्यांना समृद्ध बनविणारी आहे.
हेही वाचा :कोकमची लागवड आणि जाती
चंदनाच्या लाकडाचा भाव प्रति किलो 4 ते 5 हजार रुपये असा आहे. 20 वर्षे वाढ झालेल्या चंदन झाडापासून 25 ते 30 किलो लाकूड मिळते. आजचा बाजारभाव पाहता सुमारे 5 ते 6 कोटींचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळते. चंदनाच्या तेलालाही प्रति लिटर 5 लाख रुपये असा दर मिळतो. राज्यात चंदनाच्या झाडामध्ये तेलाचे प्रमाण सरासरी पाच लिटर इतके आहे. प्रति हेक्टरी 100 लिटर तेल सहज मिळून जाते. मात्र तेल मिळवण्यासाठी जितके मजूर वापरावे लागतात. त्या तुलनेत त्यांची मजुरी परवडणारी नाही. चंदनाची बाजारपेठ जगभर आहे. पूर्वेकडील चीन, जपान, सिंगापूर, हाँगकाँग, तवान या देशांत मोठी मागणी आहे.
चंदनाचे लाकूड कोरीव कामासाठी खासकरून वापरले जाते. त्यामुळे काष्ठशिल्प बनविण्यासाठी त्याची मागणी वाढत आहे. देवतांची मूर्ती, शोभेच्या वस्तू बनविण्यासाठी गाभ्याचे लाकूड आवश्यक असते. अशा प्रकारचे लाकूड 20 वर्षांच्या लागवडीतून सहजपणे उपलब्ध होते. पावसाचे प्रमाण कमी होत चालले असताना दुष्काळी स्थितीत तग धरून राहणारी चंदनशेती लाभदायक ठरू शकते. बँकेतील ठेवीसारखा या शेतीचा फायदा करून घेता येणे सहज शक्य आहे. शासनानेही चंदनशेतीसाठी प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतलेली आहे. सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्ष लागवड व वैरण विकास योजनेंतर्गत याची लागवड करण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते. याचा लाभ घेत राज्याच्या अनेक भागांतील शेतकरी चंदनशेती करण्यासाठी पुढे येत आहेत.
चंदन हा सदाहरित वृक्ष असून त्याच्या फांद्या सडपातळ, सरळ अथवा वाकड्या असतात. याची उंची साधारणपणे 12 ते 15 मिटर असून घेर 2 ते 2.5 मिटरपर्यंत असतो. याची पाने सदाहरित, अंडाकार, टोकदार, समोरा-समोर व देठाकडे निमुळती असतात. खोड लहान व कमी जाडीचे असते तेव्हा मऊ असते. परंतु जस-जसे झाड मोठे होते तसे त्याची साल खरबरीत व उभ्या चिरा असलेली बनत जाते. याचे लाकूड कठीण, सुक्ष्म दाणेदार कणांनी बनलेले तेलयुक्त असते. लाकडाचा बाहेरील भाग सफेद व सुगंधहिन असतो. तर आतील गाभा पिवळसर ते तपकिरी असून तो अतिशय सुगंधी असतो. यामध्ये तेलाचे प्रमाण 1 ते 6% असते. चंदनाचे मूळ हे सुरूवातीस बऱ्यापैकी लांब, नाजूक व लवचिक असते. बाजूकडील मुळे संखेने भरपूर, तंतूमय, नाजूक व मुख्य मुळाच्या खाली पसरलेली असतात. सुरुवातीस मुळांवर गाठी असतात. त्याने त्याचे परावलंबीत्व दिसून येते. चंदनाचे बी एकदल प्रकारातील असून रंग पिवळसर गुलाबी, तपकिरी, गर्द तपकिरी व काळपट असतो. फळाचा वरचा भाग लुसलुशीत व गरयुक्त असून तो काढल्यानंतर बी मिळते. बियांपासून रोपे तयार केली जातात.
रोपे तयार करणे
लहान रोपे अति सुर्यप्रकाशात व उष्णतेमुळे किंवा कमी पाण्यामुळे सुकू शकतात. त्यासाठी सावली व पाण्याची व्यवस्था करावी. ताजे बियाणे 2 महिन्यापर्यंत सुप्तावस्थेत असते. त्यामुळे त्यावर पाणी अथवा हवेची प्रक्रिया होऊ शकत नाही. याकरिता जर्मिनेटर 50 मिली, प्रिझम 50 मिली, 1 लि. पाणी या प्रमाणातील द्रावणात बी रात्रभर भिजत ठेवून त्याची सुप्तावस्था नष्ट होऊन 1 ते 1।। महिन्यात अंकूरताना दिसतात. एरवी 3 महिन्यापर्यंत देखील अंकुरलेली दिसत नाहीत. 2 वर्षापासून 10 वर्षापर्यंतच्या झाडांवरील बियांपासून रोपे तयार करताना उगवणक्षमतेत कोणताही फरक आढळून येत नाही.
गादी वाफ्यावर बी लागवड पद्धत
गादीवाफे 2 प्रकारचे केले जातात. ज्या भागात पाऊस जास्त पडतो तेथे उंच गादीवाफे तर इतर भागात जमिनीला समांतर खणून वाफे बनविले जातात. साधारणपणे वाफे 10 मिटर x 1 मीटर आकाराचे करून 15 सेंमी उंची ठेवावी. यामध्ये लालमाती व चाळलेली वाळू 2:1 प्रमाणात घेऊन वाफे बनवावेत. अशा वाफ्यात प्रक्रिया केलेले 4 किलो बी पसरून घेऊन त्यावर 2 सेंमी जाडीचा वाळूचा थर देऊन त्यावर वाळलेले गवताचे अच्छादन करावे. वाफ्यास रोज झारीने अथवा स्प्रिंक्लरने पाणी द्यावे. वाफ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी सावलीची सोय (शेडनेट 50%) करावी. बी उगविल्यानंतर गवताचे अच्छादन अलगद काढून टाकवे. नर्सरीचे योग्य नियोजन होण्याच्या दृष्टीने बियाणे डिसेंबर-जानेवारीत पेरावे.
पिशवीत रोपे लावणे
बी गादीवाफ्यावर पेरल्यानंतर 25 ते 30 दिवसात रोपे उगवण्यास सुरुवात होते. रोपे लगेच पिशवीत लावावीत. अशी रोपे लवकर रूजतात. रोपांवर दर 15 दिवस ते 1 महिन्याच्या अंतराने सप्तामृत 250 मिली 100 लि. पाण्यातून फवारावे. म्हणजे रोपांची निरोगी व जोमाने वाढ होते. साधारणपणे 6 ते 8 आठवड्यानंतर रोपांची सावली काढून टाकवी व रोपांच्या पिशव्या अधून मधून फिरवत रहाव्यात. जेणेकरून मुळे जमिनीत रूजणार नाहीत. 6 ते 8 महिन्यामध्ये रोपे 25 ते 30 सेमी उंचीची तपकिरी रंगाचे खोड झालेली लागवडीयोग्य उपलब्ध होतात. 1 किलो बियापासून साधारणपणे 2,000 रोपे तयार होतात.
हेही वाचा :सोलर ट्री : विजेशिवाय शेतात होणार सिंचन, होणार पाण्याची बचत
लागवड
मान्सून पावसाची सुरुवात होताच जून, जुलै, ऑगस्ट मध्ये रोपांची लागवड करता येते. याकरीता उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात 16'x12' अंतरावर 1.5 x 1.5 x 1.5 फुटाचे खड्डे खोदून घ्यावेत. खड्डयामध्ये किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करून अर्धा खड्डा सेंद्रिय अथवा कंपोस्ट खत, निंबोळी पावडर व कल्पतरू सेंद्रिय खत (250 ग्रॅम) ने भरून घ्यावा. त्यानंतर एक पाऊस झाल्यावर जमिनीत ओल असताना रोपांची लागवड करावी व शेजारच्या खड्डयामध्ये यजमान वृक्षाच्या रोपांची लागवड करावी. यजमान रोप कालांतराने मरते व चंदन त्याच्या जवळ असल्याने इतर दिर्घायुषी यजमान वृक्षाच्या मुळांमधून आपले आवश्यक ते अन्न शोषण सुरू करते.
चंदन हा अर्धपरजीवी वृक्ष आहे. याला संस्कृत भाषेत 'शर्विलक' म्हणतात. शार्विलक म्हणजे चोर. चंदन हे आपणास लागणारी सर्व खाद्यान्ने व जिवनसत्वे स्वत:च्या मुळाद्वारे शोषून घेत असतात. त्याकरिता चंदनाची लागवड करताना त्याच्या शेजारी यजमान वृक्षानी लागवड करावी लागते. चंदनाची वाढ खुरटी राहते व झाड 2-3 वर्षांनी मरते. पिशवीतील रोपे लागवडीपुर्वी 1 लि. जर्मिनेटर चे 100 लि. पाण्यात द्रावण तयार करून पिशवी मध्ये रोपांना 50 ते 100 मिली द्रावणाची आळवणी करावी. नंतर लागवडीच्यावेळी रोपाची प्लॅस्टिक पिशवी अलगद बाजूला काढून रोप लावावे. लागवडीनंतर त्याला पुन्हा जर्मिनेटरचे वरीलप्रमाणे ड्रेंचिंग (आळवणी) करावी.
- यजमान दिर्घायुषी झाडे: साग, सादडा, लिंब, सुरू, पळस, करंज, निलगिरी, बाभूळ, सुबाभुळ, शिरीष, काशिद, खैद, सिसम, रक्तचंदन, तामण, गावडा, मोह, कुमकुम वृक्ष इ. ची लागवड करता येते.
- यजमान मध्यम आयुषी झाडे: हादगा, शेवरी, शेवगा, सुरू, निलगिरी, बांबू, ग्लिरीसिडीया, निरगुडी, बकुळ, बारतोंडी इ.
- यजमान फळझाडे: सिताफळ, रामफळ, डाळिंब आवळा, बोर.
- यजमान खुरटी झुडपे: कन्हेर, रुई, घायपात, गुलतुरा, तरवड ही पिके आहेत.
आंतरपिक
चंदन व यजमान वृक्षाची लागवड करताना दोन ओळींमध्ये किमान 10 फूट जागा उपलब्ध होऊ शकेल. या जागेत पहिले 4-5 वर्षापर्यंत हरभरा, उडीद, मूग, भुईमूग अशी आंतरपिके घेतल्यास लागवडीस पोषक वातावरण मिळून चंदनाची वाढ जोमदार होते. आंतरपीक घेताना जमीन नांगरणी/वखरणी केली जाते. शेताला पाणी, खते दिली जातात. कडधान्यामुळे जमिनीत हवा खेळती राहते. नत्राचे प्रमाण वाढते. या सर्वांचा चंदन वाढीस फायदा होतो. या पिकांबरोबरच औषधी वनस्पतींमध्ये सर्पगंधा, अश्वगंधा, सफेद मुसळी, शतावरी, कोरफड अशी पिके घेता येतात.
जमीन
लाल, काळी, चिकणमाती ते वाळू मिश्रीत लोहयुक्त, उत्तम निचरा होणारी, उत्तम उपजावू चिकण माती व नदी काठच्या निचऱ्याच्या पोयटायुक्त जमिनीत चंदनाची वाढ अगदी जोमाने होते. पाणी दिल्यानंतर विस्तारणारी माती, तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम व पोटॅशयुक्त जमीन झाडाची उंची व घेर वाढीस फायदेशीर ठरते. जमिनीचा सामू हा 6.5 ते 8.2 असणारी जमीन चंदन लागवडीस योग्य समजली जाते.
हवामान
चंदनाने झाड हे 600 ते 1,600 मि.मी. पर्जन्यमान असलेल्या पर्जन्यमान असलेल्या प्रदेशात व 12 ते 45 डी. से. तापमानात चांगले वाढते. साधारणपणे थंड हवा, मध्यम पर्जन्यमान व भरपूर सुर्यप्रकाश तसेच भरपूर काळ कोरडी हवा चंदनास उत्तम ठरते.
पाणी
चंदनाच्या झाडाला पहिल्यावर्षी ठिबकने आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्यावे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी आठवड्यातून 2 वेळा पाणी ठिबकने द्यावे. चौथ्या वर्षापासून चंदनास नोव्हेंबर - डिसेंबरमध्ये पाणी देण्याची गरज नसते. तसेच जानेवारी ते जून या काळात आठवड्यातून एकदा पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस असल्यास पाण्याची आवश्यकता नसते. मात्र पावसाने ताण दिल्यास गरजेप्रमाणे महिन्यातून 2 वेळा तरी पाणी द्यावे.
आंतरमशागत
लागवडीनंतर प्रत्येक वर्षी ऑक्टोबरमध्ये 1 मीटर व्यासाची वर्तुळाकार माती कुदळीने 15 सेमी. पर्यंत खोदून कल्पतरू सेंद्रिय खत 250 ग्रॅम ते 1 किलोपर्यंत आवश्यकतेनुसार झाडाच्या वयाप्रमाणे तसेच सुगंधी गाभ्याची अधिक वाढ होण्यसाठी सप्तामृताच्या फवारण्या दर महिन्याला कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार कराव्यात.
रोग व किड
चंदनावर शक्यतो नुकसानकारक जैविक अथवा बुरशी रोगाचा प्रादुर्भाव आढळत नाही. परंतु जंगलातील जुनाट झाडांवर स्पाईक रोग मायक्रोप्लाझमा सदृश्य जिवाणूपासून झाल्याचा आढळून आला आहे. किडीमध्ये भुंगे हे रात्री पानांच्या कडा कुरतडत मधल्या शिरेकडे खात जातात. हे किडे पानांच्या खालच्या बाजूस अथवा पानाच्या गुंडाळीत अथवा जाळे बनवलेल्या पानात दिवसा आढळतात. त्याचबरोबर रस शोषणारी अळी, खोड पोखरणारी अळी, वाळवी या किडींचा प्रादुर्भाव चंदनावर आढळून येतो. यांचा प्रादुर्भाव होऊ नये. याकरिता कृषी विज्ञान केंद्रातील तज्ञांच्या सल्ल्यानुसार सप्तामृताच्या फवारण्या वेळीच कराव्यात. प्रादुर्भाव झाल्यावर नुकसानीची पातळी ओलांडण्यापुर्वी रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. मात्र सतत रासायनिक किटकनाशकाचा वापर शक्यतो टाळावा. म्हणजे त्याचा चंदनाच्या गाभा व तेलाच्या दर्जावर परिणाम होणार नाही.
काढणी
चंदनाचे झाड साधारण 30-60 वय वर्षापर्यंत तोडणीयोग्य होते.
उत्पन्न
चंदन हि हळूहळू वाढणारी प्रजाती आहे. चंदनाचा खोड/गाभा 10 व्या वर्षापासून परिपक्व होतो. खालील तक्त्यात दिलेल्या उंची आणि घेर या तपशिलाप्रमाणे झाड काढणी योग्य झाले कि नाही ते कळते.
वय (वर्ष) | घेर (से.मी) | उत्पन्न (किलो) |
10 | 10 | 1 |
20 | 22 | 4 |
30 | 33 | 10 |
40 | 44 | 20 |
50 | 55 | 30 |
चंदनाचा गाभा
चंदनापासून सुगंधी गाभा व त्यापासून तेल मिळते. सुगंधी गाभा हा तुरट, कडू, ताप निवारक, थंड, उल्हासित, कडक, जड, टिकाऊ, मधुर आणी तिव्र वासाचे, दोष विरहीत पिवळसर अथवा तपकिरी रंगाचे, सरळ घट्ट दाणेदार व एक साच्याचे तंतुमय तेलकट गाठी विरहीत असतो. फिक्या रंगाच्या गाभ्यामध्ये गडद रंगाच्या गाभ्यापेक्षा तेलाचे प्रमाण जास्त असते. चंदन तेलाचे प्रमाण 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या झाडात 0.2 ते 2%, तर परिपक्व झाडात 2.8 ते 5.6% असते. मुळापासून शेंड्याकडे 45% पर्यंत तेलाचे प्रमाण कमी होत जाते तर गाभ्याच्या मध्यबिंदूपासून ते बाह्य भागापर्यंत 20% पर्यंत कमी होत जाते. गाभा तयार होण्याचे काम 4 वर्षाच्या पुढे सुरू होते. तर नैसर्गिकरित्या ते 7 वर्षाच्या पुढे होते. 12 ते 15 वर्षात 12 ते 15 सेंमी व्यासाच्या वृक्षापासून 30 ते 35 किलो सुगंधी गाभा मिळू शकतो.
गाभ्यापासून तेल
गाभ्याच्या पावडरवर वाफेच्या उर्ध्व पतनाची क्रिया करून तेल काढले जाते. त्यास जगभर 'इस्ट इंडियन सँडलवूड ऑईल' या नावाने ओळखले जाते. बाह्य लाकडा पासून दुर्मिळ वस्तू, खेळणी, कॅरम गोट्या (कॉईन) बनविल्या जातात. तर ताज्या पानांपासून फिक्कट पिवळे मेण मिळते.
चंदन लागवड करताना
खाजगी जमिनीमध्ये चंदनाची लागवड करण्यसाठी परवानगी लागत नाही. परंतु प्रजाती तोडण्यासाठी विभागीय अधिकाऱ्याकडे परवानगी घेणे गरजेचे असते. चंदन एक संरक्षित वण प्रजाती आहे, त्यामुळे तोडणीस आणि विक्रीस वनरक्ष कायदा 1956 अंतर्गत पुरवठा परवानगी घेणे आवश्यक आहे. लागवड केल्यानंतर जमिनीचा सातबारा नमुन्यामध्ये नोंद करून घ्यावी आणि संबंधित वन अधिकाऱ्याच्या आपल्या प्रक्षेत्रावर चंदन लागवड असल्याचा दाखला प्राप्त करून घ्यावा.
चंदन लागवडीसाठी अर्ज सदर करतांना लागणारी कागदपत्रे
- वृक्ष तोडीचा नमुना नं.1.
- लागवड असलेल्या जमिनीचा सातबारा.
- लागवड असलेल्या क्षेत्राचा 8 अ.
- लागवड असलेल्या जमिनीचा नकाशा.
- लागवड असलेल्या जमिनीच्या चतु:सीमा.
- 12 हेक्टर पेक्षा कमी जमिन असल्याचे प्रमाणपत्र.
- उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र.
- पुन: वृक्ष लागवड करणार असल्याचे हमीपत्र (100 रुपयांच्या स्टांप पेपरवर)
लेखक:
डॉ. स्नेहल दातारकर, प्रा. अमोल नागमोते
(कृषी विभाग, जी एच रायसोनी विद्यापीठ, साईखेडा, छिंदवाडा)
Share your comments