कोकमची लागवड आणि जाती

Saturday, 30 June 2018 04:13 PM


कोकणामध्ये विविध प्रकारची फळझाडे आढळतात. त्यामध्ये कोकम हे प्रामुख्याने आढळणारे सदाहरीत फळझाड आहे. या फळझाडाच्या शास्त्रोक्त लागवडीकडे फारसे लक्ष दिले जात नाही. डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली, यांनी कोकमाच्या कोकण अमृता आणि कोकण हातीस या जाती विकसित केल्या आहेत. त्यांची लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. या पिकास फळ प्रक्रियेमध्ये वाव असल्याने याची लागवड केल्यास फळ प्रक्रिया उदयोगामध्ये मोठया प्रमाणात मागणी आहे. कोकमाचे फळ कच्चे असताना तसेच पिकून लाल रंगाचे झाल्यावर त्याचे विविध पदार्थ करून साठवून वर्षभर विविध अन्नपदार्थांत वापर करतात.

कोकमास उष्ण आणि दमट हवामान मानवते. रोपांपासून वाढणारे झाड सरळ वाढते मात्र त्यामध्ये ५० टक्के नर आणि ५० टक्के मादी झाडे निपजतात. त्यामुळे लागवड केल्यानंतर ५० टक्के झाडांपासूनच किफायतषीर उत्पादन मिळते. आंबा, काजू, नारळ, सुपारी झाडांच्या बागेसारखी कोकमाची सलग लागवड क्वचितच पहावयास मिळते. यामुळेच कोकणात मोठया प्रमाणात उपलब्ध असलेल्या पडीक जमिनीवर या फळपिकाची शास्त्रोक्त पध्दतीने लागवड केल्यास खालीलप्रमाणे फायदे होतील. 

  • लागवड योग्य पडीक जमिन लागवडीखाली येईल.
  • फळप्रक्रिया उदयोगास चालना मिळून नविन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
  • कृषी उत्पन्न वाढल्याने विकासास चालना मिळेल.

डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापिठाने मृदूकाष्ट कलम पध्दत विकसीत केली आहे. त्यामुळे खात्रीशीर अधिक उत्पन्न देणाऱ्या कोकम जातींची लागवड करणे शक्य आहे. लागवड करताना ९० टक्के मादी झाडे आणि १० टक्के नर झाडांची कलमे घेवून लागवड करावी.

सुधारीत जातीः

  • कोकण अमृताः डॉ. बा.सा.कोंकण कृषी विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १४० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. फळे मध्यम आकाराची, जाड सालीची आणि आकर्षक लाल रंगाची असतात. फळे पावसाळयापूर्वी पिकतात त्यामुळे फळांचे नुकसान होत नाही.
  • कोकण हातीसः डॉ. बा. सा. कोंकण कृषी विद्यापीठाने ही मादी प्रकारची जात विकसीत केली आहे. पुर्ण वाढलेल्या झाडापासून १५० किलो फळे प्रती वर्षी मिळतात. या जातीची फळे मोठी, जाड सालीची आणि गर्द लाल रंगाची असतात. मोठया आकाराच्या फळामुळे या जातीची मागणी जास्त आहे.

लागवड आणि निगा:

लागवडीसाठी मे महिन्यात ६x६ मीटर अंतरावर ६०x६०x६० सेमी आकाराचे खड्डे काढावेत आणि पावसाळयापुर्वी चांगली माती, १ घमेले कुजलेले शेणखत व एक किलो सुपर फॉस्पेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. रोपांचे अथवा कलमांचे वाळवीपासून सरंक्षण करण्यासाठी ५० ग्रॅम २ टक्के फॉलीडॉल पावडर प्रत्येक खड्डयात टाकावी आणि पावसाच्या सुरूवातीला प्रत्येक खड्डयात एक वर्षाची निरोगी, जोमदार वाढणारी रोपे किंवा कलमे लावावीत.

विषेशतः कलमे लावल्यानंतर ताबडतोब त्याला काठीचा आधार दयावा. आधार देवून सरळ वाढू दिल्याने कलम उभे सरळ वाढते, लवकर उत्पन्न देते आणि रोपांपेक्षा लवकर उत्पन्न मिळू शकते. कलमाच्या जोडाखाली पहिली दोन वर्षे वारंवार फुटवा वाढतो. तो काढून टाकावा अन्यथा फुटवा वाढून कलम मरण्याची शक्यता असते. लागवडीच्या पहिल्या वर्षी कडक उन्हापासून संरक्षण करण्यासाठी कलमे अगर रोपाना सावली करावी. बागेमध्ये साधारणतः १० टक्के नर झाडे लावावीत. लागवडीनंतर प्रत्येक झाडास पहिली किमान दोन वर्षे १० लिटर प्रती दिनी ठिबक सिंचनाव्दारे पाणी दयावे.

खतेः

कोकमापासून अधिक उत्पन्न मिळवण्यासाठी पहिल्या वर्षापासून खते देणे आवश्यक आहे. खते ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये दयावीत. खताची मात्रा पहिल्या वर्षांपासून त्याचप्रमाणात १० वर्षापर्यंत वाढवावी आणि १० व्या वर्षी आणि पुढे तीच कायम ठेवावी. खताची मात्रा पुढीलप्रमाणे आहे.

वर्ष

शेणखत / नत्र

स्फुरद

पालाश

१ ले

२ किलो / १०० ग्रॅम

१५० ग्रॅम

५० ग्रॅम

१० वे

२० किलो / १ किलो

१.५ किलो

५०० ग्रॅम


पिंक रोगः

या बुरशीजन्य रोगामुळे सुरूवातीला पांढऱ्या रंगाचे गोलदार ठिपके पानांवर पडतात. अनेक फांदयाना या रोगाची लागण झाल्यास फांदया मरतात आणि उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. फांदयांचा लागण झालेला भाग कापून काढून त्यावर बोर्डोपेस्ट लावाली.

काढणी, उत्पन्न आणि उपयोगः

कोकमामध्ये फळधारणा ५ व्या वर्षापासून सुरू होते. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये फुले लागतात आणि मार्च ते मे मध्ये फळे तोडणीस तयार होतात. हिरव्या रंगाची फळे फोडून वाळवतात त्यांचा उपयोग मोठया प्रमाणात अन्नपदार्थ साठविण्यासाठी आणि आंबटपणा आणण्यासाठी करतात. फळे पिकल्यावर गर्द लाल किंवा काळसर लाल रंगाची होतात. त्यांचा उपयोग आमसुले (वाळवलेली रस लावलेली कोकम साल) कोकम आगळ (मीठाचा वापर करून साठवलेला रस) आणि अमृत कोकम (कोकम सरबत) इत्यादीसाठी केला जातो. कोकमाच्या बियांमध्ये घनस्वरूपात असलेले तेल असते त्याला कोकम बटर असे म्हणतात. कोकम बटरचा उपयोग सौंदर्य प्रसादने तसेच औषधांमध्ये, क्रिममध्ये केला जातो. पुर्ण वाढलेल्या कोकम झाडापासून १४० ते १५० किलो फळे मिळतात.

महत्वाचे मुद्दे

  • कोकम झाडाचे वय वाढते तसे उत्पन्न वाढते - त्यामुळे त्याला नियमीत खताची मात्रा दयावी. खत दिल्यामुळे फळे नियीमत मिळतात, फळांचा दर्जा चांगला राहतो.
  • कोकमाच्या झाडाला भरपूर सुर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्यावी. त्याच्यावर सावली करणारी आजूबाजूची झाडे कमी केल्यास फळधारणा वाढते, फळे आकाराने मोठी होतात.
  • कोकमाच्या झाडावरील मेलेल्या फांदया कमकुवत फांदया कापून नष्ट कराव्यात. मात्र कोकमामध्ये जमिनीकडे वाढणाऱ्या (जिओट्रोपिक) फांदयावर फुले आणि फळे लागतात अशा फांदया तोडू नयेत.
  • कोकमाच्या झाडाला फळे लवकर तयार होण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे फळधारणा झाल्यावर (जानेवारी - फेब्रुवारीमध्ये) ३ टक्के पोटॅशिअम नायट्रेटची (१३:०:४५) फवारणी करावी पुन्हा ही फवारणी २० दिवसानंतर करावी. या फवारणीमुळे फळे लवकर तयार होतात, फळांचा आकार वाढतो, झाडांचे उत्पादन वाढते तसेच फळांची प्रत देखील सुधारते.

डॉ. आर. जी. खांडेकर आणि प्रा. म. म. कुलकर्णी
(उद्यानविद्या विभाग, डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली)
9422431246

kokum variety कोकम लागवड वाण konkan hatis कोंकण हातीस konkan कोंकण konkan amruta कोंकण अमृता garcinia indica
English Summary: kokum cultivation and its varieties

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

Krishi Jagran and  Helo App Monsoon Update


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.