सीताफळ लागवड व छाटणी तंत्र

19 December 2018 02:14 PM By: KJ Maharashtra
Custard Apple

Custard Apple

सिताफळ हा पानझडी वृक्ष मूळचा उष्णकटीबंधीय अमेरिका व वेस्ट इंडीजमधील असून शतकाच्या अखेरीस याची आयात भारतात पोर्तुगीजांनी केली आहे. हा वृक्ष भारतात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाना आणि कर्नाटक या राज्यात मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली क्षेत्र आहे. त्यात सर्वात जास्त लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रामध्ये असून या कोरडवाहू फळझाडाची  लागवड जळगाव, बीड, दौलताबाद (औरंगाबाद), अहमदनगर, नाशिक, सोलापूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, वर्धा इ. जिल्ह्यातील अवर्षणग्रस्त व हलक्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात केली जाते.

सिताफळाचे उपयोग:

सिताफळ अत्‍यंत मधूर फळ आहे. सिताफळामध्‍ये खनिजद्रव्‍ये आणि जीवनसत्‍वे उपलब्‍ध करून देण्‍याची चांगली क्षमता असल्‍यामुळे ते एक पुरक फळ आहे. सिताफळाच्‍या ताज्या 100 ग्रॅम गरात पुढीलप्रमाणे अन्‍नघटक द्रव्‍यांचा समावेश होतो. पाणी (73.30 %), प्रथिने (1.60 %), खनिजे  (0.70 %), पिष्‍टमय पदार्थ (23.50 %), चुना (0.20 %), स्‍फुरद (0.47 %), लोह (1.00 %). सिताफळाच्‍या झाडातील औषधी आणि आयुर्वेदीक गुणधर्म देखील मोलाचे आहेत.  पानांचा वापर कडवट औषधे बनविण्‍यासाठी केला जातो तर बियांपासून तेलनिर्मिती करता येते व या तेलाचा उपयोग साबण निर्मितीसाठी केला जातो. ढेपेचा उपयोग खत म्‍हणून करतात. सिताफळांची भूकटी (पावडर) करून ती आईस्‍क्रीम बनविण्‍यासाठी वापरली जाते. सीताफळ्याच्या फळव्यतीरिक्त त्याची मुळी उगाळून चाटल्यास ह्या समस्या म्हणजे लघवी अडणे, लघवी साफ न होणे, लघवीची आग इ. खूप तहान लागणे, कितीही पाणी प्याले तरी समाधान न होणे यावर सीताफळे खावीत.

हेही वाचा :पिंपळगाव बसवंत बाजार - टोमॅटोला प्रति क्रेट 821 रुपये भाव

आवश्यक हवामान व जमीन:

कोरडे व उष्ण हवामान सिताफळाच्या झाडांच्या व फळांच्या वाढीसाठी पोषक आहे. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता, सिताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे. ह्या फळपिकामध्ये पाण्याचा आणि उष्णतेचा तान सहन करण्याची क्षमता आहे. उष्ण व कोरड्या हवामानातील सिताफळे चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची, गुणवत्तेच्या बाबतीत सरस ठरतात असा अनुभव आहे. मोहोराच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते. पावसाळा सुरु झाल्याखेरीज झाडांना फळधारणा होत नाही. साधारणपणे झाडाच्या वाढीसाठी 500-750 मिमि पाऊस आवश्यक असतो. कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही.

सिताफळाची लागवड ही अवर्षणग्रस्‍त भागासाठी शिफारस केली असल्‍यामुळे हे फळझाड कोणत्‍याही जमिनीत येऊ शकते. अगदी खडकाळ रानापासून ते रेताड जमिनीत सुध्‍दा सिताफळाचे झाड वाढू शकते. अत्‍यंत हलक्‍या माळरानात जशी सिताफळाची वाढ चांगली होत, तशीच ही झाडे शेवाळयुक्‍त जमिनीत गाळमिश्रीत जमिनीत, लाल जमिनीत तसेच अगदी विस्‍तृत प्रकारच्‍या जमिनीतही निकोपपणे वाढतात. मात्र भारी, काळी, पाणी साठवून ठेवणारी अल्‍कलीयुक्‍त जमिनी या फळझाडाला अयोग्‍य ठरतात.

 


सुधारित जाती:

सिताफळाच्‍या विविध 120 प्रजाती असून त्यामध्ये सहा प्रजाती महत्त्वाच्या आहेत. त्या सहा मध्ये सीताफळ, रामफळ, हनुमानफळ, लक्षमनफळ इ. आहेत. यामध्ये सीताफळ हे सर्वात जास्त पापुलर आहे. अधिक उत्‍पादनासाठी अनेक जाती आहेत. बाळानगर, अर्का सहान-संकरित जात (हस्त परागीकरण करणे आवश्यक आहे), फुले पुरंदर, फुले जानकी, NMK-1, एनोना हायब्रीड नं. 2 धारूर 3, 6 ऑयलॅड जेम्‍स, पिंक बुलक्‍स हाई, एर्टिमोया वॉशिंग्‍टन 10705, वॉशिंग्‍टन 98787 इ. जातीची शेतकरी लागवड करू शकतात.

लागवड:

 • सिताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापुर्वी मे महिन्यात 0.60×0.60×0.60 मीटर आकाराचे खड्डे जमिनीचा मगदूर पाहून घ्यावे.
 • 5×5 मीटर अंतरावर खड्डे घ्यावेत. या अंतराने लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडे बसतात आणि लागवड जर 4X4 मीटर वर केल्यास 50 % अधिक झाडे बसतात (625 झाडे/हेक्टरी)
 • हे खड्डे पावसाळ्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत, सिंगल सुपर फोस्फेट पोयटा मातीसह भरावेत.
 • थायमेट 10 जी बांगडी पध्दतीने वापरण्यात यावे.
 • यासाठी हेक्टरी अर्धा टन शेणखत, 200 किलो सिंगल सुपर फोस्फेटची आवश्यकता आहे.
 • अशा प्रकारे खड्डे भरल्यानंतर झाडाची लागवड (जुलै-ऑगस्ट) पावसाळ्यात करावी.

खत व्यवस्थापण:

 • सिताफळाच्या झाडांना सहसा नियमितपने खते दिली जात नाहीत. परंतु मोठे व चांगले उत्पादन येण्यासाठी पावसाळा सुरु झाल्याबरोबर प्रत्येक झाडाला २ ते ३ पाट्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत देणे योग्य ठरते. तसेच पहिल्या ३ वर्षापर्यंत प्रत्येक झाडांना पुढीलप्रमाणे खते द्यावीत.
वर्षे नत्र (ग्रॅम) स्फुरद (ग्रॅम) पालाश (ग्रॅम)
1 125 125 125
2 250 250 125
3 375 250 250


5 वर्षापुढील प्रत्येक झाडाला 5-7 पाट्या शेणखत किंवा कंपोस्ट खत आणि 200 ते 500 ग्रॅम युरिया द्यावा.

पाणी व्यवस्थापन:

सिताफळाच्या झाडांस जास्त पाण्याची आवश्यकता नसते. फलधारणा झाल्यानंतर ती फळे पक्क होण्याच्या अवस्थेत सुमारास एक दोन वेळेस पाणी द्यावे म्हणजे फळाचा आकार व दर्जा वाढविण्यासाठी आवश्यक आहे. पावसाचा ताण जास्त पडल्यास १५ ते २० दिवसांनी पाणी द्यावे. सिताफळ निसर्गतःच काटक फळझाड असल्‍याने वरच्‍या पाण्‍याशिवाय वाढू शकते. सिताफळाच्‍या पिकाला नियमित पाण्‍याची आवश्‍यकता नसते. निव्‍वळ पावसाच्‍या पाण्‍यावरही चांगले उत्‍पन्‍न येऊ शकते मात्र झाडाला पहिले 3 ते 4 वर्ष उन्‍हाळयात पाणी दिल्‍यास झाडांची वाढ चांगली होते. त्‍याचप्रमाणे फळधारणेनंतर साधारपणे सप्‍टेबर ऑक्‍टोबर महिन्‍यात पाण्‍याच्‍या 1 ते 2 पाळया दिल्‍यास भरपूर व मोठी फळे मिळतात.

हेही वाचा :बांगलादेश सीमेवर अडकलेल्या टोमॅटो, कांद्याचे ट्रक पोहचणार बाजारपेठांमध्ये ; शेतकऱ्यांना दिलासा


आंतरपिके:

 • सिताफळाचे झाड लहान असेपर्यंत त्यात जमिनीच्या मगदुरानुसार चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, हरभरा इत्यादी शेंगवर्गीय पिके घेता येतात.

बागेची निगा:

 • सिताफळाची रोपे लावल्‍यानंतर काही रोपे मेली असतील तर महिन्‍याचे आत नांग्‍या भरून घ्‍याव्‍यात. तसे शक्‍य न झाल्‍यास पुढील वर्षी जून महिन्‍यापूर्वी नांग्‍या भराव्‍यात.
 • खुरपणी करून बागेतील तण काढावेत.
 • रोपे लहान असताना पावसाचा ताण पडल्‍यास मधून मधून पाणी द्यावे.
 • झाडाची वाढ जोमाने होण्‍याकरिता व चांगले फळ मिळण्‍याकरिता छाटणी करावी. छाटणी करताना झाडाला योग्‍य वळण सुरुवातीच्‍या वाढीच्‍या काळात द्यावे. त्‍यासाठी झाडावरील अनावश्‍यक फांद्या काढून टाकाव्‍यात.
 • पावसाचा ताण जास्‍त पडल्‍यास 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे.
 • बागेमध्‍ये वेळोवेळी आंतर मशागत करावी.

सीताफळ झाडांना आकार देणे आणि छाटणी:

सीताफळ या फळपिकामध्ये छाटणीला खूप महत्व आहे. छाटणी केली नाही तर झाड हे झुडपाल होते आणि त्याची उत्पन्न देण्याची क्षमता कमी होते. जास्त नाही पण हलक्या छाटणीची गरज असते. साधारणता झाडाची पानगळ झाल्यानंतर छाटणी करावी. छाटणीनंतर लगेच 1 बुरशीनाशकाची फवारणी करावी.

हेही वाचा :भारतात बऱ्याच शहरांमध्ये बटाटा 70 रुपये पर्यंत पोहोचला आहे, कांदा 100 आणि टोमॅटो शतकाच्या जवळ

उन्हाळी बहारामध्ये दुबार छाटणी:

पहिली छाटणी ही बहाराचे पाणी सुरू करण्यापूर्वी 15 ते 20 दिवस अगोदर केली जाते. उन्हाळी बहाराचे पाणी जानेवारी ते मे मध्ये सुरू करण्यात येते. जून 25 ते 27 नंतर झाडांवर फळे असताना दुसरी छाटणी करावी. झाडांना 8 ते 10 दिवसांत पालवी येते. त्यातूनच नवीन फुलांची निर्मिती होते. सदरची फळे नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत काढणीस येतात व एकाच झाडापासून दोनदा फळे घेणे शक्य होते. फळे साधारण सुपारीच्या आकाराची झाल्यानंतर फळांची विरळणी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विरळणी करताना चांगल्या आकारमानाची देखणी फळे ठेवावीत. वेडीवाकडी, कीड व रोगग्रस्त फळांची विरळणी करावी.

 


कीड आणि रोग व्यवस्थापण:

कीड/रोग

लक्षणे

निवारण

पिढ्या ढेकुण

ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतो.किडीच्या अंगावर पांढरे आवरण असून ते चिकट पदार्थ झाड्याच्या विभिन्न भागांवर व फळावर टाकतात. त्यामुळे फळांची गुणवत्ता खालवते.

किडींनी ग्रासलेली फळे व फांद्या झाडावरून कडून टाकव्यात.
झाड्यांच्या मुख्य खोडावर चिकट पट्ट्या लावाव्यात.
नुवान 1.5 मी. ली. प्रती ली. प्रमाणे फवारणी करावी.

फळमाशी

 

फळमाशीचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी प्रती एकर 4-5 कामगंध सापळ्याचा उपयोग करावा.
फळ काढण्याच्या 2-3 आठवडया आधी फळाला पिशवी लावून घ्यावी.

फळकुज

फळ्याच्या देठाजवळ याची लक्षणे आढळून येतात. हा रोग फक्त पावसाळ्यात आढळतो.

बाविस्टीन या बुरशीनाशकाची 1 मी.ली./ लिटर पाण्यामध्ये फवारणी करावी

 

काढणी, प्रतवारी, पॅकिंग व साठवण:

सिताफळामध्‍ये डोळे उघडणे ही क्रिया पूर्ण झाली म्‍हणजे झाडावरची फळे उतरविण्‍यास काही हरकत नाही. बहूदा सिताफळाची लागवड केल्‍यापासून 5 ते 6 वर्षानी फळे मिळू लागतात. कलमे केलेल्‍या झाडांना 3 ते 4 वर्षात फळे लागण्‍यास सुरुवात होते. सिताफळांच्‍या झाडांना जून, जूलै मध्‍ये फूले येण्‍यास सुरुवात होते. फूले आल्‍यावर फळे तयार होण्‍यास सर्वसाधारणपणे 5 महिन्‍यांचा कालावधी लागतो. फळे सप्‍टेबर ते नोव्‍हेबर मध्‍ये तयार होतात. आणि दसरा, दिवाळीच्‍या सुमारास सिताफळे बाजारात येतात. शेतकरी बांधवांनी सर्वसाधारणपणे सिताफळाच्‍या बहरात फळधारणेपासून 100 ते 130 दिवस काढणीसाठी ग्राहय धरावेत अशा वेळी फळांचे खवले (कडा) उकलू लागल्‍या व आतील दुधाळ भाग किंचित दिसू लागला की फळे तयार झाली असे समजून फळांची काढणी करावी.

प्रतवारीसाठी पाडावर आलेली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत. मोठी व आकर्षक फळे निवड करून अ ग्रेड ची म्‍हणून बाजूला काढावीत. फळे मध्‍यम आकाराची असल्‍यास ती ब ग्रेड ची म्‍हणून निवडावीत आणि राहिलेली लहान सहान फळे ही क ग्रेडची म्‍हणून समजावीत.

स्थानिक बाजारपेठांकरिता जर माल पाठवायचा असेल तर उपलब्‍धतेनुसार बांबूच्‍या करंडयात खालीवर कडूलिंबाचा पाला घालून त्‍यात फळे व्‍यवस्थित भरावीत व फळे विक्रीसाठी तयार झालेली वेडयावाकडया आकाराची फळे शक्‍यतो अगदी जवळच्‍या स्‍थानिक बाजारात त्‍वरीत विकून टाकावीत. सिताफळ नाशवंत फळ असल्‍यामुळे ते जास्‍त दिवस साठविता येत नाही. शितगृहातसुध्‍दा सिताफळ जास्‍त दिवस ठेवता येत नाहीत आणि समजा मोठया प्रमाणात व्‍यापारी तत्‍वावर उत्‍पादन करणा-या या शेतकरी बांधवांनी सामुहीकपणे शितगृहाची व्‍यवस्‍था उपलब्‍ध केल्‍यास या फळासाठी शितगृहातील साठवणूकीचे तापमान 39 ते 42 फॅरनहिटस तर आर्द्रता 45 ते 90 टक्‍के राखावयास हवी. असे झाल्‍यास साठवणूकीचा कालावधी 5 ते 6 आठवडे राहतो.

उत्पन्न:

साधारणता तिसऱ्या वर्षीपासून उत्पन्नास सुरवात होते. पाच वर्षानंतर साधारण 25-30 किलो/झाड इतके उत्पन्न मिळते.

प्रक्रिया:

सिताफळाचे मार्मालेड व जॅम बनवितात. डबाबंद सिताफळ (कॅनिंग) घरगुती आणि व्‍यापारी तत्‍वावर करणे, शितपेय गृहउद्योगात आईस्क्रिम बनविण्‍यासाठी सिताफळाची भूकटी (कस्‍टर्ड पाऊडर) इत्‍यादी सिताफळ प्रक्रियांना देखील बराच वाव आहे.

नंदकिशोर माधवराव कानडे, प्रशांत किसन निमबोळकर आणि सुभाष चंदर
पिएच.डी विधार्थी, फळ विभाग, आई. आई. एच. आर, बेंगलोर-560089
9881787237
nandkishorukd123@gmail.com

Custard apple सीताफळ IIHR Banglore आयआयएचआर बंगलोर
English Summary: Custard Apple Cultivation & Pruning Technique

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.