प्रा. प्रज्ञा खिल्लारे, डॉ. राजरतन खंदारे
कपाशीवर रसशोषक किडींच्या व दहियारोगाच्या प्रादुर्भावामुळे जास्त प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांनी या कडे वेळीच लक्ष देऊन कीड व रोगाच्या व्यवस्थापनासाठी थेट रासायनिक कीटकनाशकाचा वापर नकरता एकात्मिक कीड व्यवस्थपनाचा अवलंब करुन नुकसान टाळता येईल.
रस शोषण करणाऱ्या किडी : मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरीमाशी, पिठ्या ढेकूण इ.
मावा : पूर्ण वाढ झालेली मावा रंगाने पिवळसर ते गडद हिरवी असते. शरीराने मृदू असून पोटाच्या मागच्या बाजूस शिंगा सारखी दोन टोके असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने व कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने आकसतात व मूरगळतात त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. या किडीचा प्रादुर्भाव रोपवास्थेत तसेच शेवटच्या अवस्थेत दिसून येतो. कोरडवाहू कपाशीवर सर्वात जास्त प्रादुर्भाव हा जुलै च्या शेवटच्या आठवडा ते ऑगस्ट चा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर जानेवारी महिन्यात आढळून येतो.
तुडतुडे : तुडतूडे हे पाचरीच्या आकाराचे व फिक्कट हिरव्या रंगाचे असतात. ते नेहमी तिरके चालतात. प्रौढ व पिल्ले पानांच्या खालच्या बाजूने राहून रस शोषण करतात. रस शोषण करताना आपली विषारी लाळ त्यात सोडतात. अशी पाने प्रथम कडेने पिवळसर होऊन नंतर तपकिरी रंगाची होतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने लाल तांबडी होतात परिणामी झाडाची वाढ खुटते. कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे जुलै च्या शेवटच्या आठवडयापासून या किडीचा प्रादुर्भाव सुरु होतो व सर्वात जास्त प्रादुर्भाव हा ऑगस्टचा शेवटचा आठवडा ते सप्टेंबर चा दुसरा आठवडा या कालावधीत आढळून येतो.
फुलकिडे : प्रौढ फुलकिडे अतिशय लहान फिक्कट पिवळसर अथवा तपकिरी असून त्यांच्या पंखाच्या कडा केसाळ दिसतात. प्रौढ व पिल्ले कापसाच्या पानामागील भाग खरवडून त्यातून निघणारा रस शोषण करतात. प्रादुर्भाव ग्रस्त भाग प्रथम पांढुरका व नंतर तपकिरी होतो. यामुळे पाने फुलकळ्या आकसतात, झाडाची वाढ खुंटते व बोंडे चांगली उमलत नाहीत. या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवाड्यापासून सुरु होतो. अधिकतम प्रादुर्भाव हा सप्टेंबरच्या पहिल्या पंधरवाड्यात दिसून येतो.
पांढरीमाशी : प्रौढ माशी आकाराने लहान व पंख पांढरे असून शरीरावर पिवळसर झाक असते, डोक्यावर दोन तांबडे ठिपके असतात. प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून रसशोषण करतात अशी पाने कोमजतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पाने लालसर ठिसूळ होऊन शेवटी वळतात याशिवाय पिल्ले आपल्या शरीरातून गोड चिकट द्रव बाहेर टाकतात त्यामुळे पानावर काळी बुरशी वाढते. तसेच पांढरीमाशी रोगाचा प्रसार करते. या किडीचा प्रादुर्भाव कोरडवाहू कपाशीवर सप्टेंबर महिन्यापासून सुरु होतो व नोव्हेंबर महिन्यात अधिकतम प्रादुर्भाव दिसून येतो.
पिठ्या ढेकूण : पिल्ले व प्रौढ ढेकूण लहान, गोलाकार, शरीरावर चिकट रेशीम कापसासारखे आवरण असते. या दोन्ही अवस्था कपाशीची पाने, कोवळीशेंडे, पात्या, बोंडेयातून रस शोषण करतात. हे देखील चिकटद्रव बाहेर टाकतात व त्यावर काळी बुरशी वाढल्यामुळे झाड चिकट काळपट दिसतात व झाडाची अन्न तयार करण्याची प्रक्रिया थांबते.हि कीड पिकाच्या शेवटच्या काळात कपाशीवर आढळून येते.
आर्थिक नुकसान पातळी :
मावा : १५ ते २० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा १० मावा / पान
फुलकिडे : १० फुलकिडे / पान
पांढरीमाशी : ८ ते १० प्रौढमाश्या /पान
तुडतुडे : २ ते ३ पिल्ले / पान
एकात्मिक व्यवस्थापन
मशागतीय पध्दत :
• शेताच्या कडेने तसेच पडीक जमीनीतील किडींच्या पर्यायी वनस्पती नष्ट कराव्यात.
• अंतर मशागत करून पिक तण विरहीत ठेवावे.
• रस शोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नत्र खताचा वापर कमी करावा.
• मित्र कीटकांचे संवर्धन करावे.
यांत्रिक पध्दत :
• प्रादुर्भाव ग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावी.
• १० ते १२ पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टरी पिकाच्या उंची पेक्ष्या १५ सेंमी जास्त उंचीवर व पिकाच्या ओळीपासून २० सेंमी अंतरावर पांढ-या
माशांना आकर्षित करण्यासाठी शेतामध्ये लावावेत.
जैविक पध्दत :
• रस शोषक किडीना खाणारा ढाल कीडा व क्रायसोपा या मित्र किटकाचे प्रौढ व अळ्या दिसून आल्यास त्याचे संवर्धन करावे व किटकनाशकांची फवारणी टाळावी.
• पिठया ढेकणासाठी व्हर्टीसीलीयम लिकॅनी १.१५ टक्के डब्लूपी या बुरशीची ४० ग्रॅम व पांढरीमाशी करीता ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
• ५ टक्के निंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रती १० लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
रासायनिक पध्दत :
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्या नंतरच शिफारशी/लेबलक्लेम नुसार खालील रासायनिक किटकनाशकांचा आलटून पालटून वापर करावा.
Share your comments