कांदा पिकाची मुळे उथळ असल्याकारणे कांदा पिकात योग्य वेळी खत देणे खूप महत्वाचे आहे. पिकाचे अपेक्षित उत्पादन येण्यासाठी 25 ते 30 टन प्रती हेक्टरी चांगले कुजलेले शेणखत वापरावे. सेंद्रिय खतामुळे साठवण क्षमता वाढते त्यासाठी जास्तीत जास्त शेणखताचा किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करणे आवश्यक आहे.
नत्राची आवश्यकता पिकाच्या पूर्ण वाढीकरिता अनेक अवस्थेमध्ये असते. कांद्याचे रोप लावल्यानंतर दोन महिन्यापर्यंत नत्राची गरज जास्त असते. नत्र विभागून दोन ते तीन हफ्त्यात दिले असता त्याचा चांगला फायदा होतो, कांद्याची मुळे रुजल्यानंतर नत्राची गरज असते. कांदा पूर्ण पोसल्यानंतर मात्र नत्राची आवश्यकता नसते. अशा वेळी नत्र दिले तर डेंगळे येणे, जोड कांदे येणे, कांदा साठवणुकीत सडणे हे प्रकार होतात. तेव्हा शिफारस केलेले नत्र लागवडीनंतर खरीप हंगामात 45 दिवसांच्या आत तर रब्बी-उन्हाळी हंगामात 60 दिवसांच्या आत दोन ते तीन हफ्त्यात विभागून देणे फायदेशीर ठरते.
पिकांच्या मूळांच्या वाढीकरिता स्फुरदाची आवश्यकता असते. स्फुरद जमिनीत चार इंच खोलीवर लागवडी अगोदर दिल्यास नवीन मुळे तयार होईपर्यंत स्फुरद उपलब्ध होते. स्फुरदाची मात्रा एकाच वेळी आणि ती पिकांच्या लागवडी अगोदर द्यावी. स्फुरद, नत्रासोबत दिल्यास स्फुरदाची उपलब्धता वाढते.
हेही वाचा:रब्बी उन्हाळी कांदा पिकामध्ये खत आणि तण व्यवस्थापन
आपल्या जमिनीत पालाशचे प्रमाण भरपूर आहे.मात्र पिकांना उपलब्ध होणाऱ्या पालाशची मात्रा कमी असल्यामुळे, पेशींना काटकपणा येण्यासाठी, कांद्याचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी, तसेच कांद्याला आकर्षक रंग येण्यासाठी, पालाशची आवश्यकता पिकांच्या वाढीच्या सर्व अवस्थेमध्ये असते. पिकाच्या लागवडी अगोदर स्फुरदाबरोबर पालाशची संपूर्ण मात्रा द्यावी.
कांद्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी त्याचप्रमाणे जमिनीत भुसभुशीत टिकवून ठेवण्यासाठी गंधकयुक्त खतांचा वापर करणे योग्य आहे. अमोनियम सल्फेट, सल्फेट ऑफ पोटॅश यासारख्या खतांचा वापर केल्यास त्यातून काही प्रमाणात गंधकाची मात्र मिळते. अन्यथा गंधकयुक्त खतांचा वापर केल्यास फायदा होतो.
कांदा पिकांचे भरघोस आणि चांगल्या प्रतीच्या उत्पादनासाठी संतुलित अन्नद्रव्याची आवश्यकता असते. खतांच्या मात्रा किती द्यावयाच्या हे जमिनीचा प्रकार, लागवडीचा हंगाम, खते देण्याची पद्धत यावर अवलंबून आहे. ज्या संयुक्त दाणेदार खतांमध्ये कमी नत्र आणि अधिक स्फुरद व पालाश असेल असे खत कांद्याला देणे सयुक्तिक ठरते. उरलेल्या नत्राची मात्र युरिया किंवा अमोनियम सल्फेट द्वारे दोन ते तीन हफ्त्यात लागवडीनंतर द्यावे. या व्यतिरिक्त पहिली खुरपणी झाल्यानंतर 20 किलो गंधकयुक्त खत प्रती एकर दिल्यास कांद्याच्या साठवण क्षमतेमध्ये तसेच रंगामध्ये चांगले परिणाम दिसून येतात. कांदा पिकाला सूक्ष्मद्रव्याची गरज अतिशय कमी प्रमाणात लागते. सेंद्रिय खतांचा चांगला पुरवठा असल्यास सर्वसाधारण जमिनीत सुक्ष्मद्रव्याची कमतरता भासत नाही. हि सुक्ष्मद्रव्ये अधिक प्रमाणात दिली गेल्यास त्याचा पिकांवर अनिष्ट परिणाम दिसून येतो. त्यामुळे सूक्ष्मद्रव्ये जमिनीतून किंवा फवारणीद्वारे पिकाला द्यावे.
महाराष्ट्रात जेथे कॅनॉलच्या पाटाचे बारमाही क्षेत्र आहे व जेथे ऊस व गव्हाची उशिरा रब्बी हंगामात लागवड होऊन आद्रतेचे प्रमाण उन्हाळी महिन्यात कायम राहून सुक्ष्म वातावरण निर्मिती होते अशा सौम्य हवामान असलेल्या क्षेत्रात नोव्हेंबर महिन्यात बियाणे टाकून जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत रोप लागवड केली जाते व जो कांदा मे महिन्यात तयार होतो अशा कांदा लागवडीला “उन्हाळी कांदा” असे संबोधतात. या उशिराच्या रब्बी लागवडीत, एक तर पाण्याच्या पाळ्या जादा लागतात तसेच कांदा पोसणीच्या काळात (मार्च-एप्रिल) तपमान 35 अंश सेल्सिअस पेक्षा अधिक झाल्याने उत्पादकतेवरही विपरीत परिणाम होतो.
त्याचप्रमाणे कांदा काढणीच्या वेळेस जर वळवाचा पाऊस आला तर साठवणूक क्षमतेवर अनिष्ट परिणाम होऊन कंद लवकर सडतो. तसेच या काळात बाजारपेठेत जास्त कांदा आवक झाल्यामुळे बाजारभावाला मंदी असते. या सर्व विविध कारणांमुळे उन्हाळी कांदा लागवड टाळून, एक-दीड महिना कांदा लवकर केल्यास उन्हाळी कांद्याचे रब्बी कांद्यात रूपांतर होऊन राज्याची कांदा उत्पादकता व साठवणूकक्षमता निश्चितपणे वाढू शकते. महाराष्ट्रातील बरीच कांदा लागवड रब्बी ऐवजी उन्हाळ्यात होते या वास्तविकतेचा बारकाईने विचार करून शेतकरी बंधुनी आपली मानसिकता बदलून कांद्याचे अर्थकारण सुधारण्यास मदत होईल.
हेही वाचा:पपई फळबाग लागवड आणि व्यवस्थापन
कांदा पिकास तांबे, लोह, जस्त, मॅगनीज व बोरॉन या सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज भासते. तांबे या सूक्ष्म अन्न्द्र्वयाच्या कमतरतेमुळे रोपांची वाढ खुंटते व पातीचा रंग करडा, निळसर पडतो. जास्तीची उणीव झाल्यास पाने जड होऊन खालच्या अंगाने वाकणे हि लक्षणे दिसतात. सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरतेची ओळख व खात्री पटल्यानंतरच त्या त्या द्रव्याची सल्फेटच्या रुपात फवारणी करावी. त्यासाठी झिंक सल्फेट 0.1 टक्के, मॅगनीज सल्फेट 0.1 टक्के, फेरस सल्फेट 0.25 टक्के, बोरिक एसिड 0.15 टक्के या प्रमाणात फवारणी करावी. कांदा पिकास 60 दिवसांनी एकदा व 75 दिवसांनी दुसऱ्यांदा पॉलीफिड व मल्टी के याची फवारणी केल्यास कांद्याची फुगवण होते आणि वजनात वाढ होते. पॉलीफिड 6 ग्रॅम पावडर 1 लिटर पाणी तर मल्टी के 5 ते 10 ग्रॅम पावडर 1 लिटर पाणी या प्रमाणात फवारावे.
सध्या बहुतांश ठिकाणी कांद्याची लागवड चालू आहे. त्याकरिता प्रति हेक्टरी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 50 किलो पालाश द्यावे. 1/3 नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी द्यावे. राहिलेले नत्र दोन हफ्त्यात लागवडीनंतर 30 व 45-50 दिवसात विभागून द्यावे. कांदा पिकास नत्र शिफारस केलेल्या मात्रेपेक्षा जास्त व लागवडीच्या 60 दिवसानंतर दिल्यास कांद्याची पात जास्त वाढते मानी जाड होतात. कंद आकाराने लहान राहतो. जोड कांद्याचे प्रमाण जास्त निघते व साठवणक्षमता कमी होते.
हंगाम निहाय रासायनिक खते किलो प्रती हेक्टरी:
हंगाम |
लागवडीचे अंतर (से.मी.) |
नत्र (युरिया) |
स्फुरद (एसएसपी) |
पालाश (एमओपी) |
खरीप |
15x10 |
100(217) |
50 (312.5) |
50 (83.5) |
रांगडा |
||||
रब्बी-उन्हाळी |
||||
(माती परिक्षणानुसार खत मात्र द्यावी) |
एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन:
- सेंद्रिय खते: 25 ते 30 टन शेणखत/हेक्टर
- जीवाणू खते: अझोस्पिरीलम व स्फुरद विरघळवणारे (पीएसबी) जीवाणू
- 25 ग्रॅम/किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.
खते देण्याची योग्य वेळ:
- सेंद्रिय खते: लागवडीपूर्वी 15 दिवस अगोदर द्यावे.
- रासायनिक खते: 50:50:50 किलो नत्र:स्फुरद:पालाश/हेक्टर, अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व उर्वरित 50 किलो मात्रा 2 समान हफ्त्यात विभागून 30 व 45 दिवसांनी द्यावे.
- रब्बी हंगामाचा कांदा पुनर्रलागवडीपूर्वी 15 दिवस अगोदर गंधक हेक्टरी 45 किलो या प्रमाणात द्यावे.
डॉ. आदिनाथ ताकटे, प्रभारी अधिकारी, मध्यवर्ती रोपवाटिका (बियाणे विभाग)
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
9404032389
Share your comments