1. इतर बातम्या

गांडूळ खत तयार करण्याच्या पद्धती

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Vermicompost

Vermicompost

रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते मात्र भौतिक सुपिकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीत केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. त्यावर यापुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्याची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पिके घेणे तसेच आहे त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे अनिवार्य आहे. परंतु असे असले तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे. दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेतजमिनीची भौतिक, रासायनिक व जैविकदृष्टय़ा अपरिमित हानी होत आहे.

शेतकऱ्याचा उत्पादन खर्च मोठय़ा प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षांनुवष्रे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे. दिवसेंदिवस शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.

गांडूळ खत म्हणजे काय?

गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा  म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वर्मिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24सांचा कालावधी लागतो. गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापकी स्वतच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा नव्वद टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळखतात वनस्पतीच्या वाढीसाठी लागणारी अन्नद्र्व्ये, संप्रेरके, उपयुक्त जीवाणू असून वनस्पतीची रोग प्रतिकारक क्षमता वाढविते. गांडूळखत हे भरपूर अन्नद्र्व्ये, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रीय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळखत हा सेंद्रीय शेतातील एक महत्वाचा घटक आहे.


हेही वाचा :गांडूळ खत म्हणजे काय; कशी केली जाते निर्मिती , वाचा संपुर्ण माहिती

गांडुळाचे प्रकार: 

  • एपिजिक: ही गांडुळे जमिनीच्या पृष्ठभागालगतच राहतात. आपल्या अन्नापकी 80 टक्के भाग सेंद्रिय पदार्थ खातात, तर 20 टक्के भाग माती व इतर पदार्थ खातात. त्यांचा प्रजननाचा दर अधिक असतो. त्यांचा आकार लहान असतो.
  • अ‍ॅनेसिक: ही गांडुळे साधारणत जमिनीत एक मीटर खोलीपर्यंत राहतात ते सेंद्रिय पदार्थ व माती खातात. त्यांचा आकार मध्यम असतो.
  • एण्डोजिक: ही गांडुळे जमिनीत तीन मीटर अथवा त्याहून अधिक खोलीपर्यंत राहतात. त्यांचा आकार लांब असतो, रंग फिकट असतो व प्रजननाचा दर अतिशय कमी असतो. ते बहुधा माती खातात. या तीन प्रकारांची वैशिष्टय़े व गुणधर्म पाहता एपिजिक व अ‍ॅनेसिक गांडुळे खत तयार करण्यासाठी वापरली जातात. त्यातही आईसेनिया फेटिडा, पेरिऑनिक्स, युड्रिलस व लॅम्पिटो या चार प्रजाती अधिक उपयुक्त आहेत. ते स्वतच्या वजनाइतके अन्न रोज खातात.

गांडुळाचा जीवनक्रम: गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार 7 ते 20 दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील 2 ते 3 सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी 12 ते 15 सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात.

 

गांडूळखतासाठी गांडुळाच्या योग्य जाती: गांडूळांच्या 300 हून अधिक जाती असल्या तरी प्रामुख्याने ईसिना फोइटीडा, युड्रीलस युजेनिया, पेरीनोक्सी, एक्झोव्हेटस, फेरीटीमा इलोंगेटा या गांडूळांच्या महत्वाच्या आणि योग्य जाती आहेत. या जातीची वाढ चांगली होऊन त्या खत तयार करण्याची प्रकिया 40 ते 45 दिवसात होते.

गांडूळ खत तयार करण्यासाठी लागणारे पदार्थ:

  • पिकांचे अवशेष: धसकटे, पेंढा, ताटे, कोंडा, पालापाचोळा आणि गवत इ.
  • जनावरांपासून मिळणारी उप उत्पादीते: शेण, मूत्र, शेळ्या लीद, कोंबड्यांची विष्ठा, इ. 
  • फळझाडे आणि वनझाडांचा पालापाचोळा 
  • हिरवळीची खते : ताग, धैंचा, गिरीपुष्प, शेतीतील तण इ. 
  • घरातील केरकचरा : उदा. भाज्यांचे अवशेष, फळांच्या साली, शिळे अन्न इ.

गांडूळखत करण्याच्या पद्धती:

गांडूळखत ढीग आणि खड्डा या दोन्ही पद्धतींनी तयार करता येते. मात्र दोन्ही पद्धतींमध्ये कृत्रिम सावलीची गरज आहे. सूर्यप्रकाश व पावसापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी छप्पराची शेड तयार करावी. या शेडची लांबी दोन ढिगांसाठी 4.25 मीटर तर चार ढिगांसाठी 7.50 मीटर असावी. निवारा शेडच्या दोन्ही बाजू उताराच्या असाव्यात. बाजूच्या खांबांची उंची 1.25 ते 1.50 मीटर आणि मधल्या खांबांची उंची 2.25 ते 2.50 मीटर ठेवावी. छप्परासाठी गवत, भाताचा पेंढा, नारळाची झापे, कपाशी अथवा तुरीच्या काड्या, ज्वारीची ताटे, जाड प्लॅस्टिकचा कागद किंवा सिमेंट अथवा लोखंडी पत्र्यांचा उपयोग करावा. गांडूळखत तयार करण्यासाठी गांडूळांची योग्य जात निवडावी.


ढीग पद्धत:
 

ढीग पद्धतीने गांडूळखत तयार करण्यासाठी साधारणत: 2.5 ते 3.0 मी. लांबीचे आणि 90 सें.मी. रूंदीचे ढीग तयार करावेत. प्रथम जमीन पाणी टाकून ओली करून घ्यावी. ढिगाच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस यासारख्या लवकर न कुजणार्‍या पदार्थांचा 3 ते 5 सें. मी. जाडीचा थर रचावा, त्यावर पुरेशे पाणी शिंपडून ओला करावा. या थरावर 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्टचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. या थरावर पूर्ण वाढलेली गांडुळे हळूवारपणे सोडावीत.

साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 प्रौढ गांडुळे सोडावीत. दुसर्‍या थरावर पिकांचे अवशेष, जनावरांचे मलमूत्र, धान्याचा कोंडा, शेतातील तण, गिरीपुष्प शेवरी या द्विदल हिरवळीच्या झाडांची पाने, मासोळी खत, कोंबड्यांची विष्ठा इत्यादींचा वापर करावा. या सेंद्रिय पदार्थांचे बारीक तुकडे करून आणि अर्धवट कुजलेल्या स्वरूपात वापरले तर अधिक चांगले असते. त्यातील कर्ब: नत्रांचे गुणोत्तर 30 ते 40 च्या दरम्यान असावे. संपूर्ण ढिगाची उंची 60 पेक्षा अधिक होणार नाही याची दक्षता घ्यावी. कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थामध्ये 40 ते 50 % पाणी असावे. त्यासाठी ढिगावर गोणपाटाचे आच्छादन देऊन झारीने दररोज पाणी फवारावे. ढिगातील सेंद्रिय पदार्थांचे तापमान 25 ते 30 सेल्सिअस अंशाच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.

हेही वाचा :पिंपळगाव बसवंत बाजार - टोमॅटोला प्रति क्रेट 821 रुपये भाव

खड्डा पद्धत: 

या पद्धती मध्ये सिमेंटच्या खड्ड्यांची लांबी 3 मीटर, रुंदी 2 मीटर आणि खोली 60 सें. मी. ठेवावी. खड्ड्यांच्या तळाशी नारळाचा काथ्या, गवत, भाताचे तूस, गव्हाचा कोंडा 3 ते 5 सें. मी. जाडीचा अर्धवट कुजलेल्या शेणाचा, कंपोस्ट खताचा अथवा बागेतील चाळलेल्या मातीचा थर द्यावा. दोन्ही थर पाण्याने पूर्ण ओले करून त्यावर साधारणत: 100 कि. ग्रॅम सेंद्रिय पदार्थापासून गांडूळखत तयार करण्यासाठी 7,000 पौढ गांडुळे सोडवीत. त्यावर अर्धवट कुजलेल्या सेंद्रिय पदार्थांचा जास्तीत-जास्त 50 सें.मी. जाडीचा थर रचावा. त्यावर गोणपाटाचे आच्छादन देऊन नेहमी ते ओले ठेवावे. गांडुळांच्या वाढीसाठी खड्ड्यातील सेंद्रिय पदार्थांमध्ये हवा खेळती राहणे आवश्यक आहे. त्यासाठी सेंद्रिय पदार्थांचे थर घट्ट झाल्यास हाताने सैल करावेत. त्यामुळे खड्ड्यातील तापमान नियंत्रित राहील. अशाप्रकारे झालेल्या गांडूळखताच्या शंकू आकृती ढीग करावा. ढिगातील वरच्या भागातील खत वेगळे करून सावलीत वाळूवून चाळून घ्यावे. चाळल्यानंतर वेगळी झालेली गांडुळे, त्यांनी पिल्ले व अंडकोष यांचा पुन्हा गांडूळखत तयार करण्यासाठी वापर करावा. 

खत तयार होण्यास लागणारा कालावधी: गांडुळाचा वापर करून खत तयार होण्यास साधारणतः 35 ते 50 दिवसाचा कालावधी लागतो.

गांडूळखत तयार करण्यासाठी महत्वाच्या बाबी:

  • गांडूळखत प्रकल्प सावलीत व दमट हवेशीर ठिकाणी असावा.
  • शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व 15-20 दिवस कुजवावे.
  • खड्ड्याच्या तळाशी प्रथमत: 15 ते 20 सें.मी बारीक केलेला वाळलेला पाला पाचोळा टाकावा.
  • गांडुळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्याअगोदर 1 दिवस पाणी मारावे.
  • गांडुळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
  • व्हर्मीवाॅश जमा करण्यासाठी गांडूळबेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी, तेथे खड्डा करून व्हर्मीवाॅश जमा करण्याचे नियोजन करावे

गांडूळ खत काढण्याची पद्धत:

खताचा रंग काळसर तपकिरी झाल्यावर खत तयार झाले असे समजावे. खत तयार झाल्यावर पाणी देणे बंद करावे. वरचा थर थोडा कोरडा झाला की बिछान्यातील पूर्ण गांडूळ खत गांडुळांसकट बाहेर काढावे व त्यांचा बाहेर उन्हात ताडपत्रीवर किंवा गोणपाटावर शंकाकृती ढीग करावा. म्हणजे उन्हामुळे गांडुळे तळाला जातील. ढिगाच्या वरचे गांडूळ खत काढून घ्यावे. 3-4 तासात सर्व गांडुळे परत खत तयार करण्यासाठी बिछान्यात/खड्ड्यात सोडावीत. अशाच पद्धतीने खड्डा, कुंडी किंवा टाकी पद्धतीने गांडूळ खत तयार करता येते.

गांडूळ खताचे शेतीसाठी फायदे: 

  1. गांडूळ खतामध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये एकत्रित उपलब्ध असतात. इतर खतांमध्ये असे सहसा आढळत नाही. गांडूळ खतामुळे जमिनीची भौतिक सुपिकता टिकून राहते.
  2. गांडूळ खतामधील अन्नद्रव्ये पिकाला आवश्यक अशा स्वरूपात उपलब्ध असतात. त्यामुळे झाडांची मुळे ती सहजपणे घेऊ शकतात.
  3. गांडुळाच्या पचनसंस्थेत अनेक सूक्ष्मजीव असतात. ते अन्नपदार्थामध्ये मिसळले जातात व विष्ठेसोबत येतात. त्यात अ‍ॅक्टिनोमायसिट्स, सिडेरोफोर्स स्ट्रेप्टोमायसिसा, अ‍ॅझेटोबॅक्टर जिवाणू व बुरशी यांचा समावेश असतो. या सूक्ष्मजीवांमुळे रोगनिर्माण करणाऱ्या सूक्ष्मजीवांचा नाश होतो व पिकावर येणारी रोगराई कमी होते. त्यामुळे कीडनाशकांचा खर्च कमी होतो.
  4. गांडूळ खतामुळे जमीन भुसभुशीत राहते, त्यामुळे जमिनीत हवा व पाणी खेळते राहते व पिकांची वाढ अधिक वेगाने होते.
  5. गांडूळ खतामुळे पाण्याचा योग्य निचरा होतो व जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
  6. जलधारण क्षमता वाढल्याने पाऊस अनियमित झाल्यास पिकाला पाण्याचा ताण पडत नाही.
  7. बागायती पिकांबाबत सिंचनाचा खर्च कमी होतो व पाण्याची बचत होते.
  8. गांडूळ खताची रचना कणीदार असते त्यामुळे ते मातीचे कण धरून ठेवते व वाऱ्यामुळे, पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते.
  9. गांडूळ सेंद्रिय पदार्थ अधिक प्रमाणात खाते व त्याचे रूपांतर खतात करतो. शेतकरी त्याच्याकडे असलेल्या प्रचंड काडी कचरा, पालापाचोळा बऱ्याचदा फेकून देतो व जाळून टाकतो. त्यापासून गांडूळ खत तयार होऊ शकते. गांडूळ खत म्हणजे कचऱ्यातून निर्माण झालेली संपत्ती आहे.
  10. प्रत्येक शेतकरी स्वतच्या गरजेइतके गांडूळ खत तयार करू शकतो. त्यामुळे त्याचा उत्पादन खर्च कमी होऊन नफा वाढतो.

श्री. शक्तीकुमार आनंदराव तायडे व श्री. अनंत उत्तमराव इंगळे 
(महात्मा फुले कृषी विद्यापी, राहुरी. अहमदनगर) 
७३८७७२५९२६

English Summary: Methods of Vermicompost Production Published on: 28 December 2018, 05:34 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters