1. कृषीपीडिया

सेंद्रिय शेती करताय; मग जाणून घ्या! गांडूळ खत निर्मितीचे महत्त्व

शेतीचा, पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा विकास. आजच्या व्यवहारी दृष्टिकोनाप्रमाणे सेंद्रिय शेती करणे आवश्यक बनले आहे.

KJ Staff
KJ Staff


शेतीचा, पर्यायाने शेतकऱ्यांचा विकास म्हणजे संपूर्ण राष्ट्राचा विकास. आजच्या व्यवहारी दृष्टिकोनाप्रमाणे सेंद्रिय शेती करणे आवश्यक बनले आहे. सेंद्रिय शेती म्हणजे नैसर्गिक शेती साधनांचा वापर करून केलेली विषमुक्त (रसायनाचा वापर टाळून) शेती. आपली शेती टिकवण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर केल्यास रासायनिक खते व औषधांवर होणाऱ्या खर्चाची बचत होऊ शकते. कारण सेंद्रिय शेतीमध्ये रासायनिक खते, रासायनिक औषधांऐवजी सेंद्रिय खतांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. शेतकऱ्यांसाठी गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे असे म्हणता येईल.

देशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकऱ्यांना अन्नधान्याची पुर्तता करण्यासाठी अधिकाधिक पीक घेणे, त्या जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढविणे गरजेचे ठरते. पण सध्याच्या काळात ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे. त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर, सजीव सृष्टीवर दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यातून तो कर्जबाजारी होत आहे. एकाच जमिनीत वर्षानुवर्षे एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापरसुद्धा वाढला आहे.

शेतजमिनीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून अन्नधान्याची गरज वाढतच आहे. ही बाब लक्षात घेता, जमिनीत सुपिकता निर्माण करणाऱ्या गांडूळाला अतिशय महत्त्व आहे. कारण त्याच्या कार्यक्षमतेतूनही जमिनीची सर्वांगीण सुधारणा होते. जमिनीचा कायापालट होतो. गांडूळाला नैसर्गिक जैविक सुधारक घटक असे संबोधले जाते. गांडूळांमुळे अनेक सूक्ष्म जिवाणूंच्या संख्येत, कार्यक्षमतेत वाढ होते. त्यामुळे जमिनीची सुपिकता विघटन सुमारे ६० दिवसांत करून अन्नद्रव्य पुरवण्याचे दृष्टीने व जमीन सुधारणेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त खत गांडूळ तयार करतात.

पीक उत्पादनात वाढ शक्य

गांडूळ खत वापराचे भात, ज्वारी, मका या पिकांवर जे प्रयोग झाले, त्यानुसार या खत वापरामुळे पीक उत्पादनात १० ते १५ टक्के वाढ होते. नेहमीच्या खत वापरात ४० ते ५० टक्के बचत होऊ शकते. गांडूळाची कार्यक्षमता हंगामाच्या स्वरूपावर तर काहींची क्षमता कोणते अपरिशिष्ट पदार्थ विघटनासाठी वापरले जातात, या स्वरूपात अवलंबून राहते. सेंद्रीय शेतीत पिकाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी गांडूळ खताचे उत्पादन मोठ्या प्रमाणात करणे हे महत्त्वाचे आहे. दीर्घ मुदतीच्या पिकांसाठी गांडूळ खत फारच चांगले आहे. पण पावसाच्या पाण्यावर घेतली जाणारी व कमी मुदतीची कापूस ,मुळा, वाटाणा, कांदा, भेंडी, चवळी, दोडका, गहू, कोथिंबीर, आले या पिकांसाठी ही गांडूळखत उपयुक्त आहे. या दृष्टीने शेती व शेतकरी विकासासाठी गांडूळ खताचा वापर हे मोठे वरदान आहे.

 


गांडूळ खत म्हणजे काय?

गांडूळाच्या शरीरातून चयापचयानंतर उत्सर्जित झालेल्या मृदगंधयुक्त काळसर रंगाच्या विष्ठेस व्हर्मिकंपोस्ट किंवा गांडूळ विष्ठा असे म्हणतात. असे हे व्हर्मीकंपोस्ट किंवा गांडूळविष्ठा अधिक गांडूळाची थोडीफार अंडी, कुजलेले पदार्थ आणि माती या मिश्रणास गांडूळ खत असे म्हणतात.

गांडूळ शेती पद्धती

गेल्या पंधरा-वीस वर्षांत महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीची संकल्पना रुजली. गांडूळ खताच्या निर्मितीचा प्रयोग शेतीत सुरू झाला. या शेती पद्धतीत सजीव गांडुळांचा शेतात प्रत्यक्ष वापर करतात. त्यासाठी जमिनीत एकरी एक ते दोन लाख गांडूळ सोडावे लागतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात गांडूळ उपलब्ध होणे अवघड असल्याने तसेच विकत घेणे परवडणारे नसल्याने गांडूळांचा वापर करून पदार्थ कुजवले जातात. अशा टाकाऊ पदार्थांचा वापर करून आठ ते दहा आठवड्यांत गांडूळ खत तयार होते. शेणखत कंपोस्ट तयार होण्यासाठी चार ते सहा महिने लागतात. गांडूळांचा वापर करून आठ ते दहा आठवड्यांत खत तयार करून ते लगेच वापरता येते. शिवाय जैविक दृष्ट्या हे खत इतर खतांपेक्षा २५ ते ३० टक्के चांगल्या प्रतीचे ते असल्याने त्यामुळे होणारे बरेचसे फायदे हे भरीव स्वरूपाचे आहे.

एकदा गांडूळ खत निर्मिती प्लांट उभा केल्यावर, पहिल्यांदा तयार झालेले खत काढल्यावर त्याच जागी नवीन अवशिष्ट पदार्थ टाकून एका वर्षात सहा ते सात वेळा गांडूळ खत निर्मिती करता येते. त्यामुळे लहान शेतकऱ्याची सुद्धा गरज भागेल, एवढे गांडूळखत कमी खर्चात, कमी वेळेत तयार करून ते वापरू शकतो. त्यामुळे शेतकरी स्वावलंबी होतो. गेल्या १५-२० वर्षात एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा पद्धत हा नवीन दृष्टिकोन रूढ होत असून त्याचे फायदे पीक उत्पादन वाढीस दिसून येत आहे. एकात्मिक अन्नद्रव्य पुरवठा पद्धतीत गांडुळ खताच्या  वापराला एक आगळे स्थान आहे सेंद्रिय शेती पद्धतीत गांडुळ खताचा वापर हे एक महत्वाचे चांगले पाऊल मानले जाते .

 


गांडूळ खत तयार करण्याची पद्धती :-

गांडूळ खत तयार करण्यासाठी प्रथम चांगला जातीच्या गांडुळांची निवड करावी. त्याकरिता भरपूर प्रजननशक्ती असलेल्या, जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ खाणाऱ्या आणि वेगवेगळ्या हवामानामध्ये टिकू शकणाऱ्या गांडुळाच्या जाती निवडाव्यात. वरील निकष पूर्ण करणाऱ्या गांडुळाच्या जाती वापरल्यास उत्तम दर्जाचे, भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेले खत तयार होते. ज्या ठिकाणी खत तयार करायचे आहे, ती जमीन पाण्याचा योग्य निचरा होणारी असावी. खड्ड्यावर दिवसभर सावली राहील याकरिता छप्पर करावे. छपरामध्ये एक मीटर लांब, ६०० सेंटीमीटर रुंद, २० सेंटीमीटर खोल आकाराचे खड्डे काढावेत. खड्याच्या तळाशी प्रथम आठ ते दहा सेंटीमीटर जाडीचा थर होईल इतका काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचट इत्यादी भरून घ्यावे. त्यावर पाणी मारावे. या थरावर आठ ते दहा सेंटीमीटर जाडीचा दुसरा थर अंथरावा. यात कुजलेले शेणखत, अर्धवट कुजलेले सेंद्रिय पदार्थ टाकावेत. त्यावर ते ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे. नंतर या थरावर गांडुळे सोडावीत. साधारणतः या खड्यांमध्ये अंदाजे २०० किलो गांडूळाचे खाद्य होईल. यासाठी येथे २००० गांडुळे सोडावी.

छपराच्या लांबी अथवा रुंदीनुसार गांडूळ वापरता येतील. याकरिता लांबी बदलू शकता,  परंतु रुंदी व खोली बदलू नये. खड्ड्याची लांबी जास्त ठेवल्यास वरीलप्रमाणे खड्डे भरून घ्यावेत. मात्र एक मीटर लांब अंतराच्या खड्ड्याकरिता २००० गांडुळे सोडावी. त्यावर ५ ते ६ सेंटीमीटर जाडीचा शेणखताचा थर द्यावा. त्यानंतर परत ओल येईल इतके पाणी शिंपडावे. खड्डा हा पोत्याने झाकून टाकावा. दररोज खड्ड्याला दोन-तीन वेळा पाणी द्यावे. त्याचा ओलावा टिकून राहील असे पहावे. खड्ड्यात पाणी साचून राहू नये, म्हणून कडेने चर खोदावेत. अशा पद्धतीने खत तयार होण्याच्या प्रक्रियेस साधारणतः ४५ ते ५५ दिवस लागतात. गांडूळ खत तयार होण्याची प्रक्रिया आपण कोणता कचरा वापरतो यावर अवलंबून आहे. तयार झालेले खत रंगाने काळे, वजनाने हलके, भुसभुशीत व दुर्गंधरहित असते. खत काढण्यापूर्वी दोन ते तीन दिवस आधी खड्ड्याला पाणी मारणे बंद करावे. म्हणजे, गांडूळ खड्ड्याच्या तळाशी जातील. खड्ड्यावरील पोते बाजूला करावे व खताच्या वरचा थर चाळणीने चाळून घ्यावा. चाळणीवरील गांडूळ खत तयार करण्यासाठी वापरावा व चाळणी केलेल्या उत्तम खत भरून विक्रीसाठी किंवा स्वतःच्या शेतात वापरावा.

गांडूळ खत तयार करताना घ्यावयाची काळजी :-

  1. सेंद्रीय पदार्थांपासून गांडूळ खत तयार करावयाचे असेल, तर त्यातील काच, दगड, प्लास्टिक, रबर, धातूचे तुकडे वेगळे करावेत आणि मोठा काडीकचरा किंवा सेंद्रीय पदार्थाचे तुकडे करावेत.
  2. खतासाठी लागणारे खाद्य किमान अर्धवट कुजलेले तरी असावे.
  3. दिवसभरात दोन ते तीन वेळा खड्ड्यावर पाणी मारणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून खड्ड्यामध्ये ओलावा कायम टिकून राहील.
  4. खड्ड्यामध्ये मीठ, तिखट, विनेगार, साबणाचे पाणी, कीटकनाशके इत्यादी पदार्थांचा वापर करू नये. हे पदार्थ गांडुळांना मारक ठरतात.
  5. मुंग्या, हुमणी, कोंबड्या, डुकरे, पक्षी व प्राणी इत्यादींपासून खताचे संरक्षण करावे.

गांडूळ खताचे फायदे :-

  1. गांडूळ खतामध्ये पिकासाठी लागणारी आवश्यक पोषक द्रव्ये, जिवाणू भरपूर प्रमाणात असतात.
  2. खत वापरामुळे जमिनीचे भौतिक रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारतात. जमिनीचा पोत, सच्छिद्रता, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते.
  3. या खतामध्ये हूमसचे प्रमाण भरपूर असल्याने नत्र, स्फुरद व पालाश व इतर सूक्ष्म अन्नद्रव्य भरपूर प्रमाणात व त्वरित उपलब्ध होतात .
  4. गांडूळाच्या विष्ठेद्वारा संप्रेरके बाहेर पडून ती पिकांना उपयुक्त ठरतात.
  5. या खतामुळे जमिनीचा सामू योग्य पातळीवर राखला जातो.
  6. पिकांना समतोल, सकस व संतुलित आहार मिळतो. त्यामुळे पिकांची किडीविरोधी, रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
  7. हे खत वापरल्यामुळे जमिनीतील उपयुक्त सूक्ष्मजीवांची संख्या वाढते.
  8. शेतातील पालापाचोळा व काडीकचरा व टाकाऊ पदार्थ इत्यादींचा विल्हेवाट लागते.
  9. रासायनिक खतावर अवलंबून न राहता स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने गांडूळ खतनिर्मिती फायदेशीर आहे. या खत निर्मितीतून ग्रामीण भागात बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते .
  10. हे खत वापरल्यामुळे भाजीपाला व फळांमध्ये टिकाऊपणा येतो. अशा प्रकारच्या सेंद्रिय खतांचा वापर करून पिकवलेला भाजीपाला, फळे, अन्नधान्य इत्यादींना परदेशात खूप मागणी आहे.
  11. गांडूळ खताच्या वापरामुळे फळे-भाजीपाल्यात अपायकारक अंश शिल्लक राहत नाही. त्यामुळे फळे, भाजीपाला निर्यातीस भरपूर वाव मिळून शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळते.

 

लेखक 

1) प्रा. सावन गो. राठी

   सहायक प्राध्यापक (मृदा व कृषि रसायन शास्त्र विभाग)

   श्री संत शंकर महाराज कृषि महाविद्यालय, पिंपळखुटा, ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती

        इ.मेल. :- sawanrathi499@gmail.com

2) प्रा. आकाश दे. सुने

   सहायक प्राध्यापक (मृदा विज्ञान व कृषि रसायन शास्त्र विभाग)

   स्व. गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद, जि. बुलढाणा

       इ.मेल. :- akashsune93@gmail.com

3) प्रा. मयूर बा. गावंडे

सहायक प्राध्यापक (उद्यानविद्या विभाग) श्री शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती

English Summary: organic farming, vermicompost useful for agriculture Published on: 13 September 2020, 01:25 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters