Weather News :
मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस झाला आहे. तसंच पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मंगळवारी आणि बुधवारी राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज देखील हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यात पावसाची हजेरी आहे. आज सोमवारी राज्याच्या बऱ्याच भागात ढगाळ वातावरण होते. राज्यात आज सर्वच जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात
राजस्थानमधून परतीच्या मान्सूनने माघार घेतली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. यंदा मॉन्सूनचा परतीचा प्रवास ८ दिवस उशीराने सुरू झाला आहे. गतवर्षी २० सप्टेंबर रोजी मॉन्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते.
दरम्यान, मागील तीन दिवसांपासून राज्यभरात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस झाला आहे. मात्र हवामान बदल आणि एल निनोच्या प्रभावामुळे राज्याचा काही भागातील पावसावर त्याचा परिणाम झाला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही भागांत दुष्काळी स्थिती दिसून येत आहे.
Share your comments