Weather Update : देशातून मान्सून परतीचा प्रवास सुरु झाला आहे. यासह राज्यातील मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातून देखील मान्सून परतीचा प्रवास सुरु झाला असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई आणि पुण्यातून मोसमी वारे माघारी फिरले असून महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.
राज्यातून मान्सून परतीचा प्रवास सुरु झाला असल्याने हलका ते मध्यम पावसाची हजेरी सुरु आहे. राज्यातून पूर्णपणे १० किंवा ११ ऑक्टोबर मान्सून परतला जाईल. तर या दरम्यान काही हलका ते मध्यम आणि जोरदार पावसाची शक्यता आहे.
राज्यात यंदा उशिराने मान्सून दाखल झाला. दरवर्षी जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येणारा मान्सून यंदा २५ जूनला दाखल झाला होता. तर मागील वर्षी मुंबईतून २३ ऑक्टोबरला मान्सून परतला होता. मान्सून राज्यातून माघारी परतण्यात सुरूवात झाली असली तरी राज्यात काही ठिकाणी पावसाने दडी मारली आहे. यामुळे पाणी टंचाईची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज (दि.६) रोजी हवामान खात्याने राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. पालघर, ठाणे, रायगड तसेच मध्य महाराष्ट्राच्या पुणे, सातारा, सांगली, जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता नाही. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात या भागातून मान्सून परतण्याची शक्यता आहे.
दरम्यान, देशाच्या बहुतांश भागातून मान्सूनने आता माघार घेतली आहे. मान्सूनच्या परतीची रेषा सध्या गुरुग्राम, धर्मशाला, इंदौर, बडोदा आणि पोरबंदर अशी तयार झाली आहे. राज्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले असले तरीही परतीच्या वाटेवर निघालेला मान्सून जोरदार पावसाची हजेरी लावत तांडव घालत निघाला आहे.
Share your comments