Weather Update : उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये हवामानाची स्थिती बिकट होत चालली आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, चक्रीवादळ वाऱ्याचे क्षेत्र तयार झाल्यामुळे अनेक राज्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव दिसून येईल. उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडेल. तीव्र थंडीच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याशिवाय पंजाब, हरियाणा-चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या अनेक भागांमध्ये तापमान ६ ते १० अंशांवर राहण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रात तापमान १० अंशांवर
उत्तर भारतासह महाराष्ट्रातील वातावरणात देखील बदल झालेला आहे. राज्याच्या बहुतांश भागातील तापमान १० अंशांच्या खाली गेले आहे. यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
राज्यातील तापमानात घट झाल्याने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, नाशिक येथिल तापमान १० अंशांखाली गेलं आहे. त्यामुळे या भागात थंडीचा जोर दिसून येत आहे. राज्यात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या दरम्यान आहे. तापमानात घट झाल्याने राज्यातील वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
पुढील ५ दिवसात हवामानाचा अंदाज कसा असणार
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज (दि.१७) रोजी जम्मू-काश्मीर-लडाख-गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हलका पाऊस/बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच बिहार, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा येथे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय आज अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड आणि सिक्कीममध्ये तुरळक गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
Share your comments