IMD Update : राज्यातील तापमानात आता घट होताना दिसत आहे. यामुळे देशासह राज्यात थंडीची चाहूल वाढली आहे. अनेक जिल्ह्यांतील तापमान घट होत असल्याने थंडीचा पारा चांगलाच वाढला आहे. बहुतांश जिल्ह्यांमध्ये दुपारच्या वेळचं तापमान ३३ अंशांहूनही कमी झालं आहे.
राज्यातील किमान तापमानात घट होत असल्याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात येत आहे. जळगावमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद कऱण्यात आली आहे. जळगावचा पारा ११.३ अंशांवर पोहोचला होता. तर, पुणे, निफाड, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमान १५ अंशांहूनही कमी असल्याचं पाहायला मिळाले आहे.
राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तसंच मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात थंडीची चाहूल चांगलीच वाढू लागली आहे.
उत्तर भारतात थंडीची चाहूल चांगलीच वाढली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, आणि जम्मू काश्मीरमध्येही तापमानाचा पारा चांगलाचा खाली गेल्याने थंडीने जोर धरला आहे. उत्तराखंडमधील पर्वतीय क्षेत्रांमध्ये पावसाची हजेरी पायहायला मिळू शकते, अशी माहिती हवामान खात्याने व्यक्त केली आहे. उत्तरकाशी, रुग्रप्रयाग, चमोली या भागांमध्ये मात्र पावसाच्या तुरळक सरींची शक्यता आहे.
दरम्यान, आयएमडीच्या म्हणण्यानुसार २९ ते ३० ऑक्टोबर दरम्यान तामिळनाडू आणि केरळमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यासह देशभरात काही भागात १ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.
Share your comments