Rain News :
राज्यात उघडीप दिलेल्या पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र सर्वत्र जोरदार पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
नंदुरबार जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे एका शेतकरी कुटुंबाने ढोल ताशांच्या गजरात पावसाच्या आगमनाचे स्वागत केले आहे. तर हा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
धुळे जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. या भागातील शेतकरी काही दिवसांपासून पावसाची वाट पाहत होते. तर पाण्याअभावी पीके जळण्याच्या मार्गावर होती. मात्र बुधवारी पावसाने हजेरी लावण्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसाने धावपळ नागरिकांची धांदल उडाली झाली.
शिंदखेड्यात विजांसह हजेरी
शिंदखेडा तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. वादळी वारे, विजेच्या गडगडाटासह या भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तालुक्यात १ लाख पैकी ७५ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पाऊस नसल्याने २५ हजार हेक्टरवर पेरणी झाली नाही.
साक्री तालुक्यात पावसाची हजेरी
साक्री तालुक्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळेल. पण अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. काही शेतकऱ्यांनी पावसाअभावी करपणाऱ्या पिकात जनावरे सोडली आहे.
परभणी जिल्ह्यात पावसाची हजेरी
पावसाचा खंड दिलेल्या परभणी जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. विविध भागात बुधवारी दुपारनंतर पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे खरीप हंगामातील काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.
अमरावतीत पावसाच्या सरी
अमरावती शहरात वादळी वारा, ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळं वाहन चालक आणि पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. तर पिकांना काहीसा दिलासा मिळाला.
Share your comments