Maharashtra Rain News :
राज्यात ऑगस्ट महिना संपूर्ण कोरडा गेला. यामुळे शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली. पण सप्टेंबरमध्ये राज्यात पावसाची हजेरी लावली. मात्र आता पुन्हा तीन-चार दिवस पावसाचा खंड असणार आहे. तर १३ सप्टेंबरपासून राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय असणार आहे.
गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर राज्यात हलक्या ते जोरदार पावसाने हजेरी लावली. पण आता पुन्हा तीन दिवस पावसाची विश्रांती राहणार आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. १४ ते १९ सप्टेंबरमध्ये राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धरणांतील पाणीसाठा काहीसा वाढला. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा आहे. पण अद्यापही राज्यातील बहुतांश धरणात अपेक्षित पाणीसाठा नाही. त्यामुळे अजूनही राज्यात जोरदार पावसाची आशा शेतकऱ्यांना आहे.
पुणे, मुंबई, कोकण, पश्चिम अन् मध्य महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाच्या पावसाचा अंदाज पुणे हवामान विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी वर्तवला आहे. तसंच राज्यात १३ तारखेनंतर पुन्हा मान्सून सक्रीय होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मराठवाड्याच्या बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पिकांना काहीसा दिलासा मिळाला असल्याने शेतकरी काही प्रमाणात समाधानी आहेत. तसंच राज्यात पावसाची हजेरी लागल्यामुळे काही ठिकाणी नाचून आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील सर्व ६३ मंडलात पावसाची हजेरी तुरळक, हलक्या स्वरूपाची राहिली. जिल्ह्यातील १४ मंडलात १० ते १८ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. लातूर जिल्ह्यात सर्व ६० मंडलात तुरळक, हलका पाऊस झाला.
Share your comments