Panjabrao Dakh :- सध्या महाराष्ट्रमध्ये पावसाने मोठाच खंड दिल्यामुळे महाराष्ट्रातील खरिपाच्या पिकांना खूप मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण झाला आहे. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत असून शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये पाऊस होत आहे
परंतु तो रिमझिम स्वरूपाचा असल्याने जोरदार पाऊस पडणे खूप गरजेचे आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये भारतीय हवामान विभागाने राज्यामध्ये सात सप्टेंबर पर्यंत तरी सरासरीपेक्षा सुद्धा कमी पाऊस पडणार असा अंदाज व्यक्त केला असल्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.
मात्र सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडेल असे देखील हवामान विभागाने अंदाज वर्तवला असून त्या कालावधीमध्ये पावसाला पोषक परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज वर्तवला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे नाव असलेले पंजाबराव डख यांनी यावर्षीचा अधिक मास आणि पाऊस याबाबत काही महत्त्वाचे विश्लेषण केलेले आहे.
अधिक मास आणि पाऊस याबद्दल पंजाबरावांचे मत
यावर्षी धोंड्याचा महिना म्हणजेच अधिक मास आलेला होता व तर तीन वर्षांनी अधिक मास येत असतो. परंतु यावर्षी धोंड्याचा महिना हा श्रावण मध्ये आल्यामुळे श्रावण महिन्याचा कालावधी वाढला. परंतु हाच श्रावण अधिक मास शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरला आहे. जर आपण ज्येष्ठ मंडळींचा विचार केला तर श्रावण महिन्यात अधिक मास आला असल्यामुळे यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळेच कमी पाऊस पडला असावा असा देखील अंदाज बांधला आहे.
याच पद्धतीचे मत पंजाबरावांनी देखील व्यक्त केले आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी श्रावण अधिक मास आल्यामुळे ऑगस्टपर्यंत अपेक्षित असा पाऊस राज्यांमध्ये झाला नाही. ज्यावर्षी अधिक मास येतो त्यावर्षी ऑगस्टनंतर मात्र पावसाची परिस्थिती बदलते. अधिक मास यावर्षी येतो त्यावर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये चांगला पाऊस पडतो असे त्यांनी म्हटले आहे.
यावर्षी देखील साधारणपणे अशीच परिस्थिती होणार असून सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात चांगला पाऊस होणार असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. 5 सप्टेंबर नंतर राज्यात पुन्हा एकदा जोरदार पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे देखील पंजाबरावांनी म्हटले आहे. त्यामुळे पंजाबरावांचा हा अंदाज कितपत सत्य ठरतो हे येणारा काळच ठरवणार आहे.
Share your comments