Weather News : उत्तर भारतात थंडीचा कायम अद्यापही कायम आहे. याचबरोबर राज्यातील तापमानात देखील त्याचा परिणाम झाला आहे. राज्यातील तापमानात घट झाल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. हा थंडीचा जोर पुढे कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. बुधवारी जळगावात ९ अंशांच्या किमान तापमानाची नोंद झाली तर राज्याच्या काही भागांमध्ये मात्र किमान तापमान अंशत: वाढलं आहे.
राज्यात थंडीचा जोर वाढला
मागील दोन दिवसांपासून राज्यातील तापमानात चांगलीच घट झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा जोर वाढल्याचे चित्र दिसून येत आहे. तसंच पुढील तीन ते चार दिवस ही थंडी कायम राहण्याचा अंदाज देखील हवामान खात्याने दिला आहे. येत्या काही काळात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचंही हवामान खात्याने म्हटलं आहे.
दक्षिण कर्नाटक आणि विदर्भादरम्यान वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे हवेतील आर्द्रता घटली आहे. याचबरोबर उत्तर भारतात थंडीची लाट कायम आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुढील चार-पाच दिवस थंडीचा जोर कायम राहणार आहे.
सध्या उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर, आंबेगाव, खेड, जुन्नर भागात धु्क्याची चादर पाहायला मिळत आहे. सततच्या ढगाळ हवामानामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. ढगाळ वातावरण निवळल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता देखील मिटणार आहे.
दरम्यान, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तर मध्य प्रदेश, बिहार, झारखंड या भागातील तापमान ६ ते १० अंशाच्या दरम्यान राहिल्याची नोंद हवामान खात्याने केली आहे. पंजाबमधील अमृतसर येथे सर्वांत निच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
Share your comments