Weather Update : अरबी समुद्रात तयार झालेल्या तेज चक्रीवादळाचा देशातील हवामानावर परिणाम झाला आहे. या वादळामुळे केरळमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पावसासह अनेक भागात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यताही हवामान खात्याने दिली आहे.
समुद्रातील कमी दबाबाचे क्षेत्र सध्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात पाहायला मिळत आहे. हे वादळ सध्या ओडिशातील पारादीपपासून अंदाजे ४०० किमी अंतरावर आणि पश्चिम बंगालमधील दिघाच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे ५५० किमी अंतरावर आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळ आज २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ रविवारपासून तीव्र स्वरुपात रूपांतरित झालं आहे. यामुळे, बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होईल.
देशाच्या इतर भागात पाऊस असला तरी राज्यात मात्र उन्हाचा चटका कायम आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्रातील हवामानावर काही परिणाम होणार नाही, असं हवामान खात्याने म्हटले आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. राज्यातील तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे.
दरम्यान, पंजाब, हरियाणा,बिहार, उत्तरप्रदेश, तामिळनाडू आणि केरळमध्ये पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दिल्लीत पुढील पाच दिवस दाट धुक्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.
Share your comments