राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल दि.26 रोजी गारपीटीसह मुसळधार पाऊस झाला. आजही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आज विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पावसासह, गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच परभणी, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक आणि नंदुरबार जिल्ह्यांत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.
हवामान विभागानच्या माहिती नुसार, आज बुलडाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसासह गारपिटीचा 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला असून जालना, हिंगोली जिल्ह्यात विजांसह पाऊस, गारपिटीचा 'येलो अलर्ट' देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांना, जोरदार वारे, विजांसह पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. तसेच ढगाळ हवामान आणि पावसामुळे काही जिल्ह्यातील तापमानात घट झाली असून थंडीत वाढ झाली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने वातावरणात अचानक बदल होवू लागला आहे. त्यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावतण तयार झाले आहे. या अवकाळी पावसाचा मोठा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसत आहे. तसेच राज्यात पुढील दोन दिवस पावसाची स्थिती कायम राहणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Share your comments