Weather Update News :
राज्याच्या बहुतांश भागात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आशा आहे. परंतु राज्यात काही भागात हलका तर काही भागात जोरदार पाऊस झाला आहे. मात्र तीन दिवसांपासून पुन्हा पावसाने विश्रांती दिली आहे. त्यात आज पुन्हा राज्यात चांगल्या पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
आज राज्यातील काही भागात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र, बहुतांश भागात अद्याप म्हणावा तसा पाऊस झालेला नाही. शेतकरी चांगल्या पावसाची वाट बघत आहेत.
४५३ मंडलांत पावसाचा खंड
गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर राज्यात हजेरी लावली. मात्र हा पाऊस राज्यात सर्वत्र झाला नसून काही भागात झाला. तसंच या पावसामुळे खरीपाच्या पिकांना पूर्णत: दिलासा मिळाला नाही. उलट, २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड असलेल्या महसूल मंडलांची संख्या आता वाढून ४५३ पर्यंत पोहोचली आहे. कृषी आयुक्तालयाच्या एक सप्टेंबरच्या अहवालानुसार, राज्यात २१ दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड पडलेल्या महसूल मंडलांची संख्या कमी झालेली नाही.
पुणे विभागात चांगला पाऊस
राज्यात काही भागात अद्यापही अपेक्षित चांगला पाऊस झाला नाही. आतापर्यंत पुणे विभागात सरासरीच्या ८३६.३ मिलिमीटरपैकी ४९२.६ मिलिमीटर म्हणजेच अवघा ५८ टक्के पाऊस पडला असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, बंगालच्या उपसागरावर पुढील २४ तासांत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते दाब क्षेत्र ओडिशा आणि उत्तर आंध्रप्रदेश किनारपट्टी ओलांडून उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील ४ ते ५ दिवस महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
Share your comments