Weather Update :
राज्यासह देशाच्या विविध भागात हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिला आहे. राज्यासह देशात २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मागील दोन दिवसापासून राज्यात पावसाने हजेरी लावली आहे.
ओढ दिलेल्या पावसाने राज्यात दोन दिवसापासून हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. मात्र राज्याच्या बऱ्याच भागातील पिके पाण्याअभावी करपली आहेत. त्यात आता पुन्हा पाऊस झाला आहे तरी काही शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
कोकणात आणि गोव्यात २५ ते २८ दरम्यान वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने वायव्य भारतात विजांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
तसंच मराठवाड्यात २७ सप्टेंबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रविवारी गुजरातमध्ये देखील पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गुजरात प्रदेशातही विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.
दरम्यान, आज विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार वारे, विजांसह पावसाचा यलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर उर्वरित हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Share your comments