Weather News :
ऑगस्ट महिन्यात पावसाने खंड दिल्यानंतर सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. येत्या दोन, तीन दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यात पुढील दोन ते तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळेल.
राज्यात सहा आणि सात सप्टेंबर रोजी चांगल्या पावसाची माहिती हवामान खात्याने दिली आहे. विदर्भातील काही भाग, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील काही भागात चांगला पाऊस होणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे मान्सून वारे सक्रीय होणार आहे. यामुळे कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उद्या बुधवारी (दि.६) अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गोंदीया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. सोलापूर जिल्ह्यातही काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे. तर राज्याच्या इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
यंदा पावसावर अल निनोचा प्रभाव?
यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव दिसून आला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला नाही. केवळ जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राज्यात खरीप हंगामाची पेरणी झाली. पण त्यानंतर पावसाने विश्रांती दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला. पण आता पावसाचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Share your comments