आज जागतिक महिला दिन महिलांचे विविध क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. जर आपण 19 व्या शतकातील व आता 21 शतकातील विविध क्षेत्रातील योगदान बघितले . तर 21व्या शतकातील स्त्री आता असे एकही क्षेत्र नाही जिथे महिला नाही. या सर्व क्षेत्रापैकी कृषी /शेती क्षेत्रातील महिलांचे योगदान खूप महत्त्वाचे जिव्हाळ्याचे आणि अपार कष्टा चे आहे. कणखर तापणारे ऊन असो , धो-धो पडणारा पाऊस असो, की नैसर्गिक एखादे संकट असो. तिच्या अपार कष्टातून एका दाण्याचे शंभर दाणे करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्या कष्टकरी महिलांना प्रथम शतशः प्रणाम कारण शेती 'ति 'च्या शिवाय अपूर्ण आहे.
सन 2015 -16 मध्ये कृषी क्षेत्रातील महिलांचा सहभाग ( आर्थिक पाहणी अहवाल 2016 -17) नुसार 13.9 टक्के राहिला.जो की 2005-06 दरम्यान ही टक्केवारी 11.7 टक्के होती. लघु आणि सीमांत शेतकरी कुटुंबातील महिला सहभागाची टक्केवारी सर्वाधिक म्हणजेच 28 टक्के होती . महिला शेती सोबतच जोड व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यतत्पर असतात.
खरं सांगायचं म्हणजे शेतीला जोड व्यवसाय आहेत ते महिलांचे आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. कारण त्यामध्ये त्यांचे योगदान खूप समर्पित आहे .कृषिक्षेत्रात उपजीवकामध्ये विविधता आणण्याचे काम, दुग्ध व्यवसायाला चालना देणे ,पशु -पालन मत्स्य उद्योग, वनउपज गोळा करणे, लघुउद्योग, बचत गट इत्यादी मध्ये महिला आघाडीवर आहेत.आता महिला सेंद्रिय शेती आणि नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान अवगत करून घेऊन वाटचाल करीत आहेत ही फार अभिमानाची गोष्ट आहे. शेती मध्ये कोणती पिके घ्यावीत याबद्दलही महिलांची पुरुषांपेक्षा वेगळी मते असतात. याचं कारण कुटुंबाच्या अन्नाची आणि पोषण सुरक्षेची जबाबदारी महिलांवर असते शेतात काही प्रमाणात अन्नधान्य डाळी वर्गीय पिके, तेलवर्गीय पिके, भाजीपाला करावा असा महिलांच्या प्रयत्न असतो .तो शास्त्रीय दृष्टिकोनातून व कुटुंबीय जबाबदारीतून बघितला तर अतिशय बरोबर आहे. शेतीच्या प्रकारानुसार महिलांचे शेतीतील प्रमाण अवलंबून आहे .जिथे सिंचित / बागायती शेती आहे , तिथे महिलांच्या प्रमाणापेक्षा पुरुषांचे वर्चस्व जास्त आहेत तर कोरडवाहू शेतीत मात्र स्त्रियांचे वर्चस्व दिसून येते. कोरडवाहू भागांमध्ये पुरुषांनी कामासाठी स्थलांतर केल्याने अनेकदा शेतीची पूर्ण जबाबदारी महिलेवर येऊन पडते व ती खंबीरपणे महिला सांभाळतात.
2011 च्या जनगणनेनुसार एकूण महिला कष्टकऱ्यांमध्ये 55 टक्के शेतमजूर स्त्रिया व त्यामध्ये 24 टक्के शेतकरी स्त्रिया आहेत ; परंतु जमीनीची मालकी म्हणजेच सातबारावर नाव फक्त 12.8 टक्के महिलांची आहे. ही एक मोठी विषमता मन खिन्न करणारी आहे. खरं तर महिला शेतकरी पेरणी ,आंतरमशागत कामे, पीक कापणी ,मळणी ,पॅकेजिंग, प्रतवारी व मार्केटिंग ,या सर्व स्तरावर महिलांचा सहभाग अधोरेखित करणारा आहे. शेती क्षेत्रातील महिला शेतकरी, शेतमजूर व्यावसायिक अशा बहुआयामी भूमिका पार पडताना दिसून येतात; पण आज खरी गरज आहे त्यांना संघटित करण्याची व महिला शेतकऱ्यांना व्यवस्थात्मक स्तरावरील सुरक्षेतिची .कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या शाश्वत विकासासाठी शेती व अन्न उत्पादनातील महिलांच्या योगदानाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कृषी विद्यापीठाने शेतकरी महिलांना वेगवेगळ्या पातळीवर प्रशिक्षण देऊन त्यांच्यात कौशल्य विकसित करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. ज्याप्रमाणे शेतकरी मेळावे होतात
तसे आता महिला शेतकरी मेळावे कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून ग्रामीण भागात अपेक्षित आहेत. यामध्ये लघुउद्योग,जमीन ,कर्ज पाणी, कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, इत्यादी प्रशिक्षण कृषी विद्यापीठा ने देणें अपेक्षित आहे. विस्ताराचे खर कार्य महिलाच करू शकतात म्हणून विद्यापीठाचे जे काही संशोधनाद्वारे कृषी अवजारे ,नवीन वाण ,कृषी शिफारशी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे शेतकरी महिला पर्यंत पोहोचले तर त्याचा विस्तार खूप वेगाने होईल, शेती आणि कुटुंबाचा भाग त्यांनी एकहाती पेलून दाखवला आहे. आर्थिक बचत करुन आर्थिक अडचणीत अनेक महिला हातभार लावतात .खरं तर कष्टकरी महिलांना कधी ,कुठल्या ,लाभाची सन्मानाची अपेक्षा नसते ; परंतु त्यांना थोडी सहानुभूती त्यांनी केलेल्या कामातून भेटली तर त्यांचा उत्साह नक्कीच वाढतो. महिला शेतकऱ्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळायला हवेत .महिलांना पुरुषांपेक्षा कमी मजुरी वेतन ,जमीन हक्क नसणे, व्यवसायात समान दर्जाची भूमिकां न देणे, स्थानिक शेतकऱ्यांच्या संस्थेमध्ये प्रतिनिधी न देणे , अशा काही समस्येवर काम करून महिलांना सशक्त बनवणे ही आजच्या काळाची गरज आहे.
Share your comments