फळांचा राजा म्हणजे आंबा, उन्हाळ्यात सर्वांच्या आवडीच फळ हा आंबाच.गेल्या सात आठ दिवसापासून माझ्या शाळेतील जेष्ठ सहकारी शिक्षक तसेच जीवाभावाचे मित्र श्री. रमेश गडकर सर यांच्या शेतातील भल्या मोठ्या दोन तीन एकत्र आंब्याखालून सकाळी सकाळी लवकर साडे पाच वाजता उठून रात्री पडलेल्या ताज्या शाकी(पाड),पोपटानी व इतर पक्ष्यांनी अर्धवत कचरुंत टाकलेल्या शाकी अगदी लहान मुलासारखं काटेरी जाळीतून वेचून काढून एका पिशवीत जमा करून घरी आणून पाण्याने स्वच्छ धुऊन मस्त पैकी ज्वारीच्या भाकरी सोबत लाल मिरच्याची लसूण टाकून पाट्यावर वाटून घोटून चटणी सोबत ताजे पाड, शाकी ,कचरांडी खाऊन न्याहारी करण्याचा सध्या आस्वाद घेत आहे.कधी कधी मला सकाळी सकाळी लवकर उठण्यास उशिर झाल्यास सरांनी व बाईंनी जमा करून आणलेल्या शाकी मधून चांगल्या सात आठ शाकी निवडून मला आग्रहाने देतात हा उपक्रम आमचा दरवर्षीचा मागील वर्षी फार मोठ्या प्रमाणावर आंबे आले होते तेंव्हा फार चंगळ केली होती पाड
खाण्याची आता यावर्षी आंबा कमी आला पण आता सकाळी चार वाजताच अधूनमधून भला मोठा डुकरांचा कळप तर कधी रोह्यांचा कळप पाडावर डल्ला मारतात.त्या दिवशी मात्र खाली हात परत यावे लागते.खरोखरच आंब्याच्या झाडाखालून शाकी वेचून खाण्याचा आस्वाद फारच आगळा वेगळा आहे. तो मार्केट मधून विकत घेऊन आणून खाण्यात मिळत नाही.पूर्वी प्रत्येक गावात शेत शिवारात आंब्याच्या आमराई राहत .त्यामध्ये वेगवेगळ्या चवीचे आंबे राहत त्यांना साजेशे नावे सुद्धा राहत शेंदऱ्या, आमट्या, गोड्या, शेप्या, गोटी, भदाडया, कागदया,खाऱ्या, डोंगऱ्या, गाडग्या, बेल्या, असे कितीतरी आंब्याच्या चवीनुसार शेतकऱ्यांनी आंब्याचे पिढ्या न पिढ्या पासून नामकरण केलेले असत, उन्हाळ्यात दिवसभर मुले, गुराखी आंब्याच्या आमराईतून हालत नसत दिवसभर वाऱ्याच्या झुळकीने टप..टप..पडणाऱ्या वेगवेगळ्या चवीच्या शाकी खाण्याचा मनसोक्त आस्वाद घेत.त्याच बरोबर सुरपारंब्या मनसोक्त खेळत.
आंबे उतरणारे उतराई यांना रोजगार मिळत. त्यांच्या घरी सुध्दा निरनिराळ्या प्रकारच्या चवीचे आंबे. ते जवळच्या बाजाराला ,गावात आंबे विकून चार पैसे मिळवत. घरात आंबे ठेवायला जागा राहत नसे शेतकरी लोकं एकमेकांना वानुला म्हणून फुकट देत तसेच गावात राहणारे बाहेर गावचे शिक्षक, डॉक्टर, लाईनमन, ग्रामसेवक, तलाठी, सोसायटीचे सेक्रेटरी, मलेरिया कर्मचारी यांना सुद्धा वानुला म्हणून मोफत नेऊन देत. लेकीबाळी, जवाईबापू, इव्हाई, ईहीन व इतर पाहुण्यांना खास सन्मानाने नियंत्रण देऊन आमरस खाण्यासाठी बोलत.आमरसा सोबत मांडे, कुरडया,पापड,सांडाया, भजे, कांद्याचे चटणी,पोळ्या ,चपात्या इत्यादी पदार्थांची रेलचेल राहत धोंड्याचा महिना असला तर आणखीन चंगळ एकमेकांबद्दल आदर, प्रेम ,सन्मान राहत.काळाच्या ओघात शेत शिवारातील आमराई हळूहळू नामशेष झाली. आता शेत शिवारात आंब्याचे झाडं दिसत नाही नजर टाकली तिकडे ओसाड शेत शिवार दिसत आहे.
आता मार्केट मध्ये कोकणातील केशर, लंगडा, लालबाग,हापूस व इतर आंबे फार मोठ्या प्रमाणावर जागोजागी दिसत आहे.अगदी खेड्यात सुद्धा. जिथं घरादारात आंबे मावत नव्हते तिथं आता किलो आंबे विकत आणून आमरसाचा मनाला समाधान मिळावे म्हणून आस्वाद घ्यावा लागत आहे. कोकणातील आंब्यांनी आपल्या विदर्भातील मार्केट काबीज केले आहे .जसे पश्चिम महाराष्ट्राने दुधाचे मार्केट काबीज केले अगदी तसेच आता गरज आहे युवा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात नवीन आंब्याची लागवड करून आपल्या कुटुंबाची भरपाई करून मार्केट मध्ये जम बसविण्याची तसे सकारात्मक चित्र दिसत आहे.मागील वर्षी जुलै महिन्यात माझ्या लाडक्या नातवाला सुधान्शुला आंबे खाण्यासाठी जवळपास शंभर आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे .सोबत चिकू, पेरू, सिताफळ सुध्दा आहे.
किसन एकनाथ पिसे
ग्रामीण कथा व कादंबरी लेखक
सोनाई निवास, व्यंकटेश नगर, चिखली
जि. बुलढाणा
मो. नं.9850363920
Share your comments