मार्च महिन्यापासून पुकारण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे सगळ्या प्रकारचे उद्योगधंदे, रेल्वे, विमान सेवा व इतर सगळ्या प्रकारच्या तत्सम सेवा त्यांना एक प्रकारचा ब्रेक लागला होता. आता काही दिवसांपासून सरकारने अनलॉक केले असून अनेक व्यवहार पूर्वपदावर येत आहेत. परंतु लॉकडाऊनच्या काळामध्ये खाजगी क्षेत्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील लोकांच्या नोकऱ्या गेल्यात अशा लोकांसाठी केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे.
अटल विमा कल्याण योजना अंतर्गत सवलतीत वाढ करण्याच्या निर्णयाला सरकारने अधिसूचित केले आहे. ३० जून २०२१ पर्यंत केंद्राने या योजनेचा कालावधी वाढवला आहे. या योजनेचा लाभ प्रामुख्याने राज्यविमा कॉर्पोरेशनमध्ये नोंदणीकृत असलेल्या कामगारांना ५०% बेरोजगारीचा लाभ मिळेल. सरकारच्या या निर्णयाचा ३५ ते ४० लाखांहून अधिक कामगारांना फायदा होणार आहे.
अटल विमा कल्याण योजनेसाठी पात्रता
या योजनेअंतर्गत या कर्मचाऱ्यांचा रोजगार गेले आहेत, अशांना शासनाकडून आर्थिक मदत मिळते. त्याचा विचार केला तर हा एक प्रकारचा बेरोजगारी भत्ता आहे. याचा फायदा ESI योजनेत समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांना होतो. त्याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कोरोना संकटात नोकरी गमावलेल्या औद्योगिक कामगारांना तीन महिन्यांसाठी ५० टक्के पगार देण्यात येईल. २४ मार्च ते ३१ डिसेंबर दरम्यान ज्यांनी नोकऱ्या गमावल्या या कर्मचाऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. आधी या योजनेचा कालावधी ३१ डिसेंबर २०२० पर्यंत वाढवण्यात आला होता. परंतु आता जून 2021 पर्यंत या योजनेचा फायदा घेता येईल.
कोणत्या कर्मचाऱ्यांना नाही मिळणार अटल विमा कल्याण योजनेचा लाभ
एखाद्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला काही गैरव्यवहारामुळे कंपनीतून काढून टाकण्यात आले असेल किंवा त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असेल किंवा सेवानिवृत्तीच्या तारखेआधी त्या व्यक्तीने सेवानिवृत्ती घेतली असेल तर अशा परिस्थितीत सदरील व्यक्तीने ई. एस. आय. सी. चा जरी विमा उतरला असेल तरी तो/ ती या योजनेस पात्र राहणार नाहीत.
अटल विमा कल्याण योजनेच्या अटी
नोकरी सोडण्यापूर्वी किमान दोन वर्ष विमाधारकाने काम केलेले असावे. आणि ईएसआयमध्ये कमीत कमी ७८ दिवस योगदान दिले असावे. कमीत-कमी संबंधित कर्मचाऱ्याला नोकरी गेल्याच्या ३० दिवसांच्या आत दावा करावा लागतो. यासाठीचा अर्ज ईएस आयसीच्या शाखा कार्यालयात ऑनलाइन सादर करता येईल किंवा ईएसआयसीच्या वेबसाईटला भेट देऊन अटल विमा कल्याण योजनेचा फॉर्म डाऊनलोड करू शकता. एकदाचा क्लेम दाखल केल्यानंतर १५ दिवसांच्या आत क्लेमची रक्कम विमाधारकाच्या बँक खात्यात जमा केले जाईल. या योजनेअंतर्गत ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड नंबर आवश्यक आहे.
Share your comments