शेतकरी चार महिने दुध देणारी गाय गर्भार व भाकड काळात बारा महिने सांभाळतो.केवळ उन्हाळ्यात फळ देणारा आंबा आठ महिने सांभाळतो.बैलाचे काम नांगरट,पेरणी, कुळवणी व वखरणी साठी हांगामी लागते पण तो बारा महिने त्यांना सांभाळतो.आणि महत्वाचे म्हणजे त्यांचा खुराक,चारा-पाणी यामध्ये कधीच भेदभाव नसतो, दुष्काळ तर कायम पडतो म्हणून कुणाचा खुराक चारा पाणी शेतकरी थांबवत नाही!
खरीप व रब्बी हंगामात विहीरींना भरपुर पाणी असते तेव्हा कामावरच्या मजूराला खूप काम असते,पण उन्हाळ्यात विहीरीचे पाणी कमी होते,शेतात पीकं नसतात म्हणून मजूराची मजूरी अर्धी देत नाही!नफ मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्त्या करतात.कधीतरी दहा वर्षात एकदा शासन कर्ज माफी देते.पण शेतकऱ्याने त्याच्यावर अवलंबून असलेल्या मजुराला व जनावरांना वाऱ्यावर सोडल्याच्या घटना कोठेही घडल्या नाहीत!
कारखानदार व व्यापारी तोट्यात धंदा आल्यास दिवाळखोरी जाहीर करतो, फर्म बंद करतो,नवीन फर्म चालू करतो.पण शेतकऱ्याच्या जमीनीच्या उताऱ्यावर बोजा असतो,त्यामुळे त्याला तुमच्यासारख्या व्यवसाय बदलता येत नाही! आज दोन महिने काय लॉकडाऊन मध्ये कारखाने बंद राहीले,दुकाने बंद राहीले तर जणू तुमच्यावर दुष्काळ पडला. नोकर कपात काय केली,पगारही कमी दिले.पुढे कामाचे तासही वाढवणार म्हणे,एक नव्हे अनेक कामागार विरोधी घोषणा चालूचआहेत!
अरे,खरा मालक असावा तर माझ्या बळी राजा सारखा! शासन,कारखानदार,व्यापारी सगळेच मिळून शोषण करतात शेतकऱ्याचे, पण खरा राजा तो शेतकरीच! अरे एकदा करून पहा तोट्यात व्यवसाय,तुम्ही तर कामगारांचाच जीव घ्याल. कायम तोट्यात व्यवसाय करून दारातली भाकड गाय किंवा म्हातारं कुत्रं शेतकरी उपाशी मरू देत नाही,त्याचा ही विचार करा जरा. नुसत्या व्यवसाय आणि नफ्याची गणितं मांडून मानवता-माणुसकी विसरु नका!नाही आम्ही कारखानदार,ना व्यापारी,नाही कुणाचा घास हिरावणार,ना कुणाला उपाशी ठेवणार,आम्ही तर खरे जगाचे पोशिंदे,हीच आमची ओळख भारी, आहोत आम्ही बागायतदार शेतकरी!
Share your comments