ती तशी थंड झाल्यानं त्यांचा स्वाद वाढतो आणि ती खायला मग आणखी बहार येते, हे खरं आहे; पण त्यासाठी काही ती आपण रेफ्रिजरेटरमध्ये ठेवत नाही. ती टिकून राहावीत, उष्ण वातावरणात ती खराब होऊ नयेत म्हणून त्यांची साठवण आपण त्या शीतपेटीत करत असतो. सर्वच फळांना अशी थंड हवेतली साठवण मानवत नाही.केळी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवली तर ती चटकन काली पडतात. लिबलिबित होतात. ती बघवतही नाहीत आणि खाववतही नाहीत. सफरचंद वगैरे फळं मुळातच थंड हवामानात उगवणारी आहेत,त्यामुळे ती उष्ण हवामानात भराभर पिकून लवकर खराब होऊ लागतात.
म्हणून ती टिकवून धरण्यासाठी त्यांना थंड वातावरणात,शीतगृहात ठेवणं गरजेचं होऊन बसतं. त्या थंडीचा त्यांच्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.कारण त्या घसरलेल्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता मुळातच त्यांच्यामध्ये असते. त्या फळांचे घटक असलेल्या पेशी त्या थंड हवामानात आपला संसार नीट थाटू शकतात. आपलं स्वरूप टिकवून धरतात.केळीचं तसं नाही. केळं हे मुळातच उष्ण कटिबंधातलं फळ आहे. ते उष्ण हवामानातच वाढतं. रेफ्रिजरेटरच्या थंड वातावरणात ठेवल्यामुळं ते काही भरभर पिकत नाही. उलट कडब्यामध्ये किंवा कापडात गुंडाळून ठेवलं तर ते पिकण्याची प्रक्रिया जरा जोमानं होते.
झाडावरून जेव्हा केळ्यांचा घड उतरवला जातो तेव्हा ती केळी हिरवीच असतात. पिकलेली नसतात. ती जर कापडात गुंडाळून ठेवली तर ती पिकायला लागतात; पण थंड हवामानात ती ठेवली तर त्या थंडीचा त्यांच्यावर अनिष्ट परिणाम होऊ लागतो. कारण त्या तापमानाला तोंड देण्याची क्षमता त्यांच्यात नसते. त्यांना त्यापोटी इजाच होते. त्यातल्या घटक पेशींच्या अंतरंगातली रचना बदलायला लागते. त्यांचं अखंडत्वच नाहीसं व्हायला लागतं. त्या पेशींमधल्या निरनिराळ्या उपांगांना आपापलं नेमून दिलेलं काम बिनबोभाट पार पाडता यावं म्हणून त्यांच्याभोवती काही कुंपणं घातलेली असतात. त्यांना 'मेम्ब्रेन्स' असं म्हणतात.
Share your comments