गाभण जनावरांची प्रसूतिपूर्व काळजी घेतल्यास पुढे येणाऱ्या अडचणीवर मात करता येते. दुभत्या जनावरांबरोबर असणाऱ्या म्हशींचीही काळजी घेणे दुग्ध व्यवसायाच्या दृष्टीने खूप आवश्यक आहे. म्हशींचा गाभण काळ दहा महिने दहा दिवस कालावधीचा तर गायींचा गाभणकाळ नऊ महिने नऊ दिवसांचा असतो. गाभण जनावरांचा खुराक समतोल असावा त्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, खनिज द्रव हे सर्व घटक समतोल प्रमाणात असावेत.
खाद्य व्यवस्थापन
ज्या ठिकाणी भरपूर प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध आहे अशा हिरव्या कुरणात गाभण जनावरांना चरण्यासाठी सोडण्याची सोय असल्यास ते निश्चितच जनावरांच्या फायद्याचे ठरते, त्यामुळे गाभण जनावरांना ताजी वैरण खायला मिळते. बरोबरच मोकळ्या जागेत फिरायला मिळत असल्याने मोकळी हवा, सूर्यप्रकाश आणि आवश्यक तो शारीरिक व्यायाम होतो.
हिरव्या चाऱ्याची सोय नसेल तर जनावरांना गोठ्यातच भरपूर प्रमाणात हिरवा चारा खाण्यास देता येईल, अशी व्यवस्था करावी.
शेवटच्या दोन महिन्यांत गर्भाची वाढ झपाट्याने होते, त्यामुळे या काळात चाऱ्यात वाढ करावी. कारण गर्भावस्थेच्या अंतिम काळात गाभण जनावराला स्वतःच्या पोषणाकरिता किमान एक ते दीड किलो पशुखाद्य द्यावे.
गर्भाच्या वाढीसाठी आणखी एक ते दीड किलो जास्तीचे पशुखाद्य देण्याची गरज असते. अशा वेळी जास्त खाद्य दिल्याने गर्भाची वाढ चांगल्या प्रकारे होते.
भाकड काळाचे नियोजन -
रेतन केलेल्या तारखेची नोंद महत्त्वाची असते कारण त्या नोंदीनुसार तिचे दूध काढणे बंद करावे. प्रसूतीच्या अडीच ते तीन महिने अगोदर दूध काढणे बंद करावे. दूध काढणे बंद केल्यामुळे दुग्ध उत्पादनासाठी लागणारे अन्नघटक गायीची झालेली शारीरिक झीज भरून काढण्यासाठी व गर्भातील वासराच्या वाढीसाठी उपयोगात आणले जाते. पुढील वेतातील दुधासाठी कासेची वाढसुद्धा चांगल्या प्रकारे होईल व विण्यापूर्वी गायीचे व गर्भातील वासराचे आरोग्य चांगले राहील. विण्यापूर्वी प्रत्येक गाय अडीच ते तीन महिने भाकड असावी. देशी गायीच्या दोन वेतात दीड ते दोन वर्षे अंतर राहते, त्या जेमतेम ६ ते ७ महिनेच दूध देतात म्हणजेच विण्यापूर्वी १२ ते १७ महिने ही भाकड राहतात. मात्र संकरित गायी आणि त्यामध्ये पहिल्या वेतातील गायी वेत संपत आले तरी बरेच दूध देतात.
अशा गायी आटवणे खूप आवश्यक असते.
विण्यापूर्वी किमान अडीच महिने गाय भाकड राहिली पाहिजे नाहीतर त्यांचे पुढील वेतातील दूध उत्पादन निश्चितच कमी होते.
गाय जर जास्त दुधाळ असेल तर याहून अधिक काळ म्हणजे तीन महिन्यांपर्यंत भाकड ठेवणे गरजेचे असते.
गाय ३ ते ४ लिटर दूध देत असेल, तर धार काढणे एकदम बंद करावे. याहून जास्त दूध देणाऱ्या गायीचा खुराक बंद करावा. धार दिवसातून दोनदा काढत असल्यास ती एकदा आणि एकदा काढत असल्यास ती दोन तीन दिवसांआड काढावी.
दूध कमी झाल्यावर एकदम धार थांबवावी. यामुळेही दूध कमी न झाल्यास गायीची हिरवी वैरण बंद करावी. आणि त्यानेही न झाल्यास एक दिवस पाणी कमी पाजावे हे उपाय योजण्यापूर्वी गायीला दुभत्या जनावरांपासून बाजूला काढून भाकड जनावरांमध्ये बांधावे.
अशा रीतीने गाय आटल्यानंतर ती २-३ दिवसांत कास कमी करते, त्यानंतर तिच्या प्रत्येक सडात पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिजैविक सोडावे. यामुळे भाकड काळात गायीला काससुजीचा धोका होणार नाही. गाय पूर्णतः भाकड (आटल्यानंतर) झाल्यानंतर गरजेनुसार आहार परत सुरू करावा.
संकलन-कृषिसमर्पण समूह, महाराष्ट्र राज्य
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments