‘निर्यात खर्च कमी करून भारतीय आंबा अमेरिकेत रास्त दरात उपलब्ध होण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून सुरु असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. कारण देशातून पहिल्यांदाच समुद्रमार्गे आंबा निर्यात सुरू झाली आहे. हा क्षण ऐतिहासिक आहे,’’ अशी माहिती राज्याचे पणन संचालक तथा महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी दिली.भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, अपेडा आणि सानप ॲग्रो ॲनिमल्स यांच्या प्रयत्नांतून समुद्रमार्गे भारतीय आंबा नुकताच अमेरिकेत निर्यात करण्यात आला.
अमेरिकेचे क्वारंटाइन विभागाचे अधिकारी डॉ. कॅथरिन फिडलर, भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरच्या बायोसायन्स विभागाचे संचालक डॉ. टी. के. घंटी, ‘एनपीपीओ’चे उपसंचालक डॉ. झेड. ए. अन्सारी, ‘सानप ॲग्रो’चे संचालक शिवाजीराव सानप, ‘वाफा’चे अध्यक्ष अण्णा शेजवळ यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून हा कंटेनर अमेरिकेसाठी रवाना झाला.पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील म्हणाले,पाच हजार ५२० बॉक्समधून १६ हजार ५६० किलो आंबा कंटेनरद्वारे अमेरिकेला पाठविण्यात आला आहे.
२५ दिवसांच्या सागरी प्रवासानंतर तो न्यूजर्सी शहराजवळील नेवार्क या बंदरात पोहोचणार आहे.’’तीन वर्षे प्रयोग.भभा ॲटोमिक रिसर्च सेंटर, अपेडा, पणन मंडळ यांच्यावतीने २०१९ मध्ये आंबा समुद्रमार्गे निर्यातीचा प्रयोग केला होता. यात आंब्यावर विविध प्रक्रिया करून तो कंटेनरमध्ये भरून कृषी पणन मंडळाच्या विकिरण सुविधेद्वारे साठवन करून ठेवला होता. हा कंटेनर ३८ दिवसांनी उघडण्यात आला. त्यावेळी हा आंबा सुस्थितीत होता. मात्र, काही त्रुटी आढळून आल्याने त्या दुरुस्त करण्यात आल्या. त्यानंतर यंदा यशस्वीपणे आंबा निर्यात करण्यात आली आहे.
Share your comments