Mumbai News
राज्य सरकारने जाहीर केलेले कांदा अनुदान ४ सप्टेंबर रोजी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने जाहीर केलेले अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नसून शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहेत. अर्थ मंत्रालयाने एकूण मागणीच्या केवळ ५३ टक्केच निधी पणन विभागाला दिला आहे. त्यामुळे अनुदान देण्यासाठी पणन विभागाची गोची झाली आहे.
मंजूर झालेली ४६५ कोटी ९९ लाख वितरित केल्यास बहुतांश शेतकरी अनुदानापासून वंचित राहतील, त्यामुळे सर्वच पात्र शेतकऱ्यांना ८५७ कोटी रुपयांचा निधी एकदम वितरित करण्याची मागणी पणन विभागाने केली आहे.
२३ पैकी १३ जिल्ह्यांना मिळणार पूर्ण रक्कम
राज्यातील एकूण २३ जिल्ह्यांमधून कांदा अनुदानाची मागणी करणारे प्रस्ताव विभागास प्राप्त झाले आहेत. यापैकी १३ जिल्ह्यांतील अनुदानाची मागणी अल्प स्वरूपाची आहे. तर उर्वरित १० जिल्ह्यांची मागणी प्रत्येकी १० कोटींपेक्षा जास्त आहे.
दरम्यान, पणन विभागाकडे ३ लाख ४४ हजार अर्ज कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सादर केले आहेत. या शेतकऱ्यांना ८५७ कोटी रुपयांची रक्कम निश्चित केली आहे. वित्त विभागाकडे या संपूर्ण रकमेची मागणी केली असून ती येत्या दोन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
Share your comments