1. बातम्या

स्टार्टअप इंडियाच्या महाराष्ट्र यात्रेला 3 ऑक्टोबरपासून सुरवात

KJ Staff
KJ Staff


नवी दिल्ली: नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी स्टार्टअप इंडिया-महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ 3 ऑक्टोबर रोजी राजभवन, मुंबई येथून होणार आहे. याअंतर्गत 10 जिल्ह्यांमध्ये शिबीर आयोजित करण्यात येतील तर 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू आणि महाराष्ट्राचे कामगार व कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत स्टार्टअप इंडिया-महाराष्ट्र यात्रेचा शुभारंभ होणार आहे.

स्टार्टअप इंडिया-महाराष्ट्र यात्रेचे आयोजन केंद्रीय औद्योगिक धोरण व प्रोत्साहन विभाग, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग तसेच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य इनोवेटिव्ह सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. स्टार्टअप इंडियाच्या पुढाकाराने देशातील छोट्या जिल्ह्यांमधील नवउद्योजक प्रतिभेला शोधणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. नवउद्योजकांना तसेच उद्योग क्षेत्रात भविष्य घडवू इच्छिणाऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन, सुविधा प्रदान करून देणेही या यात्रे मागचा मानस आहे.

नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन येणाऱ्या व्यक्तींसाठी आणि स्टार्ट अपसाठी आवश्यक त्या सुविधांनी युक्त सुसज्ज व्हॅन स्टार्टअप इंडिया यात्रेत असणार आहे. ही व्हॅन 16 जिल्ह्यांतून 23 शहरांमधून जाणार असून 3 नोव्हेंबरला नागपूर येथे पोहोचणार आहे. नागपूर येथे भव्य समारोपीय कार्यक्रम होणार आहे. या दरम्यान 10 ठिकाणी शिबीर आयोजित केले जातील, जिथे स्टार्टअप इंडिया आणि महाराष्ट्र स्टार्टअप धोरण यावर सादरीकरण केले जाईल.

या यात्रेत सहभागी होण्यासाठी www.startupindia.gov.in वर नोंदणी करणे आवश्यक आहे.

10 जिल्ह्यांमध्ये शिबीर

मराठवाडा विभागात औरंगाबाद, बीड आणि हिंगोली येथे, पश्चिम महाराष्ट्रात पुणे आणि सोलापूर येथे विदर्भामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला तर कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये स्टार्टअप शिबीर आयोजित करण्यात येणार आहे.

यात्रेदरम्यान 23 शहरांमध्ये स्टार्टअप व्हॅन थांबणार

स्टार्टअप इंडिया महाराष्ट्र यात्रे दरम्यान राज्यातील 23 शहरांमध्ये स्टार्टअप  व्हॅन थांबणार आहे. यामध्ये पालघर, कल्याण, वेंगुर्ला, मालवण, राजापूर, कुडाळ, कोल्हापूर, सांगली, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, शिर्डी, मालेगाव, धुळे, जळगाव, बीड, नांदेड, यवतमाळ, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर ही शहरे आहेत.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters