1. बातम्या

खासगी बाजारात दर वाढले; शासकीय तूर खरेदी केंद्रांवर खरेदीचा आकडा कमीच

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
शासकीय खरेदी केंद्रावर तुरीला कमी दर

शासकीय खरेदी केंद्रावर तुरीला कमी दर

यवतमाळ  जिल्ह्यातील खासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यामुळे मार्च महिना उजाडल्यानंतरही जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्रांवर खरेदीचा आकडा कमीच आहे.

 हमीभाव केंद्रांवर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी केली असली तरी दरात तफावत असल्याने शेतकरी खासगी बाजारात तुरीची विक्री करीत आहेत.शासनस्तरावरून तूर खरेदीच्या प्रक्रियेला यंदा लवकरच सुरुवात झाली. नोंदणी करून शेतकऱ्यांना तूर आणण्याची माहिती दिली जात आहे. मात्र, हमीभावापेक्षा खासगी बाजारात तुरीचे दर अधिक आहेत. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी केंद्र ओस पडले आहेत. खासगी बाजारात तुरीला ‘अच्छे दिन’ आले आहेत. या ठिकाणी तुरीची आवक वाढली आहे. कापूस, सोयाबीननंतर तूर उत्पादक जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुरीचे पीक घेतले जाते. दर वर्षी साधारणतः तुरीची शासकीय खरेदी सात लाख क्विंटलपर्यंत पोहोचते. त्यामुळेच तुरीच्या खरेदीचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण होते.

यंदा दुष्काळाचे वर्ष पाहता दोन लाख क्विंटल तूर खरेदीचे नियोजन केले आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी करण्यात आली. खरेदी करण्यात आलेली तूर ठेवण्यासाठी चार लाख पोत्यांचे नियोजन करून ठेवण्यात आलेले आहे. मात्र, शेतकरी शासकीय केंद्रांवर फिरकले नसल्याने यंदा खरेदीचे काम पडले नाही. खासगी बाजारात तुरीला अधिक दर मिळत आहे. शिवाय, पैसे नगदी असल्याने शेतकऱ्यांनी खासगीला पसंती दिली आहे.

 

दरम्यान, जिल्हा मार्केटिंग कार्यालयाचे सात गोदामे आहेत. त्यात यवतमाळ येथे तीन, मारेगाव, आर्णी, पुसद व उमरखेड येथील एका गोदामाचा समावेश आहे. जिल्ह्यात महागाव, पांढरकवडा, नेर, आर्णी, पुसद, मारेगाव, दारव्हा, बाभूळगाव व दिग्रस या नऊ ठिकाणी नोंदणी करण्यात आली.

हजारांवर शेतकऱ्यांची नोंदणी

जिल्ह्यातील नऊ केंद्रांवर जवळपास ४० हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. खासगी बाजारात तुरीचे दर जास्त असल्याने ‘नाफेड’कडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली. त्यामुळे अजूनही अनेक शासकीय केंद्रांवर शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे.

 

“नाफेड’ची शासकीय तूर खरेदी सुरू झाली आहे. खासगीत चांगले दर आहेत. चुकारे नगदी आहेत. त्यामुळे यंदा आम्ही ‘नाफेड’ऐवजी खासगीला पसंती दिली. शेतकऱ्यांना यंदा अनेक अडचणींमुळे आर्थिक फटका बसला. तुरीला चांगले भाव मिळत असल्याने थोडा दिलासा आहे.”

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters