राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या या पावसामुळे शेतकऱ्यांची सोन्यासारखी पीके मातीमोल झाली आहेत. यंदा तर कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय. आधीच कांद्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत होता. त्यात अवकाळीने हजेरी लावल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे.
बीड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर
बीड जिल्ह्यातील बेलूरा गावात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांचा मेहनतीने पिकवलेला कांदा सापडल्याने शेतकऱ्यांना आता आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार आहेत.
नितीन प्रभाळे यांनी त्यांच्या सोशल मीडियावरून ही हृदयद्रावक दृश्ये शेयर केली आहेत. कांदा उत्पादक शेतकरी आज संपला असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. तसेच सरकारने लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा
हवामान विभागाने राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार राज्यात पावसाने हजेरी देखील लावली. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं सोलापूर शहरात बरच नुकसान झालं आहे. तर या भागातील काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली असून वाहतूक व्यवस्था खोळंबली. अक्षरशः अग्निशमन दलाचे जवळपास 20 जवान वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत होते.
अमृता नदीला पूर
गेवराई तालुक्यातील अमृता नदीला पूर आल्याने शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळ झाल्याने शेतकऱ्यांच्या फळ बागांचे व शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तर मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं मराठवाड्यात 10 जणांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
अधिक बातम्या:
७० टक्के शेतकऱ्यांचा रिफायनरी प्रकल्पाला पाठींबा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
प्रशांत डिक्कर यांच्या श्राद्ध आंदोलनापुढं सरकार झुकलं; हरभरा खरेदीसाठी सरकारनं दिली परवानगी
शेतकऱ्यानं करून दाखवलं! अनंतराव पारवेंची शेवगा शेतीत यशस्वी झेप
Share your comments