1. बातम्या

खते, बियाणे थेट बांधावर उपलब्ध करण्याचे निर्देश

KJ Maharashtra
KJ Maharashtra


अकोला:
खरीप हंगामासाठी मुबलक प्रमाणात खते, बियाणे व अन्य कृषी निविष्ठांची उपलब्धता करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत ह्या निविष्ठा पोहोच करण्यासाठी शेतकरी गटांमार्फत यंत्रणेने पोहोच करुन द्यावी, शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत बियाणे खतांची कमतरता भासू देऊ नका, असे निर्देश कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी यंत्रणेला दिले. अकोला येथे खरीप हंगाम २०२० च्या विभागीय जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते.

खरीप हंगाम २०२० चा विभागीय जिल्हा आढावा अकोला येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आला. या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री दादाजी भुसे हे होते. यावेळी अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा आढावा घेण्यात आला.

या बैठकीस विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी, विधानसभा सदस्य आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. प्रवीण लोखंडे, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आलोक तारेणिया आदी उपस्थित होते. यावेळी श्री. भुसे यांनी  वाशीम, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, अकोला या क्रमाने जिल्हानिहाय आढावा घेतला. त्या त्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. भुसे उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, शासनाने यंदाचे वर्ष हे उत्पादकता वाढ वर्ष म्हणून जाहीर केले आहे. त्यादृष्टीने खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खतांची कमतरता भासणार नाही याची खबरदारी घ्यावी. युरियाचा ५० हजार मेट्रिक टन साठा राज्यात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना युरीया कमी पडणार नाही मात्र जमिनीचा पोत चांगला रहावा यासाठी शेतकऱ्यांनी युरियाचा वापर हा कमीत कमी वा आवश्यक तितकाच करावा, यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे निर्देश त्यांनी दिले. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता तपासून घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. तथापि, याबाबत सूक्ष्म नियोजन करुन शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धता करावी.

पीक कर्जाबाबत भुसे यांनी स्पष्ट केले, जे जे शेतकरी मागणी करतील त्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे. शेतकऱ्यांकडे असलेल्या थकबाकीचा विचार न करता, पीक कर्ज द्यावे. शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बॅंका व बॅंकांचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही भुसे यांनी यावेळी दिला. त्या त्या जिल्ह्यात पीक कर्ज वितरणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दर चार दिवसांनी आढावा घेऊन कोणीही शेतकरी कर्जापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश भुसे यांनी दिले.

विदर्भाच्या काही भागात टोळधाड आल्यामुळे सतर्कता बाळगण्याचे आदेश भुसे यांनी दिले आहेत. यासंदर्भात टोळधाड ही ज्या ज्या ठिकाणी येते तेथे फवारणीसाठी शासनाने मोफत औषध उपलब्ध करुन दिले आहे. शिवाय टोळधाड मुळे पिकांचे, फळ बागांचे नुकसान झाल्यास त्याचे पंचनामे करण्याचे आदेशही देण्यात आले असल्याचे कृषी मंत्री भुसे यांनी सांगितले

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters