Good News! शिंदे सरकारने आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांसाठी मोठा निर्ण घेतला आहे. आषाढी एकादशीनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेकरिता प्रवास करता यावा, यासाठी राज्यभरातून तब्बल 5 हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी एसटी महामंडळाला दिले आहेत.
असे असणार वेळाप्रतक
आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर 25 जून ते 5 जुलैदरम्यान या विशेष गाड्या धावणार आहेत. तसेच वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीने केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे ही बैठक झाली.
दरम्यान, या यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, अमरावती या सहा विभागांतून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरमधून 1200, मुंबई 500, नागपूर 100, पुणे 1200, नाशिक 1000 तर अमरावती येथून 700 अशा प्रकारे या गाड्यांचे नियोजन आहे.
बसस्थानके उभारली जाणार
आगामी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. तसेच बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्रे, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक अशा विविध सोयीसुविधा पुरविण्यात येणार आहेत.
Share your comments