महाराष्ट्र राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केली जाते. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्रात कांदा लागवड विशेष उल्लेखनीय आहे, नाशिक जिल्ह्याला कांदा उत्पादनासाठी संपूर्ण जगात विशेष ओळख प्राप्त आहे म्हणून या जिल्ह्याला 'कांद्याचे आगार' म्हणून संबोधले जाते. राज्यात या रब्बी हंगामात विक्रमी उन्हाळी कांदा लागवड केला गेला असल्याचे वृत्त नुकतेच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये झळकत होते. राज्यात कांदा लागवड तर विक्रमी होतच आहे याशिवाय कांदा लागवडीत कांदा उत्पादक शेतकरी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहेत. शेती क्षेत्रात नवनवीन पद्धतीचा अवलंब करणे काळाची गरज बनली आहे त्या अनुषंगाने नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात सध्या कांदा उत्पादक शेतकरी नाविन्यपूर्ण प्रयोग अंगीकारताना दिसत आहेत.
आता तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेती पद्धतीला फाटा दिला आहे पारंपारिक पद्धतीने कांदा लागवड करून पाटाद्वारे पाणी देण्याऐवजी सध्या तालुक्यातील शेतकरी मल्चिंग पेपरद्वारे कांदा लागवड करत आहेत, शिवाय कांद्याच्या सिंचनासाठी ठिबक सिंचन प्रणालीचा वापर करताना नजरेस पडत आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना या आधुनिक पद्धतीद्वारे कांद्याच्या उत्पादनात वाढ होण्याची आशा आहे. हाती आलेल्या आकडेवारीनुसार, तालुक्यात आत्तापर्यंत सुमारे चारशे एकर क्षेत्रावर मल्चिंग पेपरचा वापर करून कांदा लागवड केली गेली आहे. संपूर्ण नाशिक जिल्हा कांद्याप्रमाणेच द्राक्ष लागवडीसाठी विशेष ओळखला जातो, जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांनी नवनवीन तंत्रज्ञानची सांगड घालत मोठे उत्पादन प्राप्त केले आहे आहे द्राक्ष बागायतदारांनी आधुनिक पद्धतीने द्राक्ष बागा जोपासून निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन प्राप्त केल आहे. अगदी त्याच धर्तीवर जिल्ह्यातील विशेषता निफाड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निर्यातक्षम कांदा उत्पादित करण्याचे ठरविले आहे. या रब्बी हंगामात राज्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी कांदा लागवडीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या दोन वर्षापासून कांद्याला समाधानकारक बाजारभाव प्राप्त होत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा लागवडीस प्राधान्य दिल्याचे समजत आहे. तालुक्यातील अनेक द्राक्ष बागायतदारांनी आपल्या द्राक्षाच्या बागा तोडून कांदा लागवडीस प्राधान्य दिल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कांदा पिकासाठी द्राक्षाच्या तुलनेत अगदी नगण्य खर्च असल्याने तसेच यापासून चांगले दर्जेदार उत्पन्न प्राप्त होत असल्याने द्राक्ष बागायतदारांनी कांदा लागवडीकडे आपला मोर्चा वळवला. तालुक्यात जवळपास आत्तापर्यंत तीन हजार हेक्टर क्षेत्रावर उन्हाळी कांद्याची लागवड झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
निफाड तालुक्याची ओळख निर्यातक्षम शेतीमाल पिकविण्याची आहे. तालुक्यातील शेतकरी निर्यातक्षम शेतमाल पिकवण्यासाठी आधुनिक पद्धतीने शेती करत असतात म्हणूनच तीन हजार हेक्टर क्षेत्रापैकी एकूण 400 हेक्टर क्षेत्रावर मल्चिंग पेपरचा वापर करून तालुक्यात कांदा लागवड केली गेली आहे. या एवढ्या क्षेत्रावर मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन व गादी वाफ्यात कांद्याची लागवड शेतकरी बांधवांनी केल्याचे बघायला मिळत आहे. यापूर्वी देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकासाठी मल्चिंग पेपरचा वापर करत निर्यातक्षम टोमॅटो पीक पिकवून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले होते. आता कांदा लागवडीत मल्चिंग पेपरचा वापर करून तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. मल्चिंग पेपर वापर करणाऱ्या कांदा उत्पादकांच्या मते यामुळे कांद्याची वाढ एकसमान म्हणुन एक समान राहतो. तसेच मल्चिंग पेपरमुळे दोन रोपातील अंतर एक सारखे राहते, त्यामुळे मल्चिंग पेपरचा वापर केल्याने कांद्याची वाढ एकसमान तसेच चांगली होते. यामुळे उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज शेतकऱ्यांना आहे.
तसेच ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केल्याने पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळते त्यामुळे कांद्याचा रंग व आकार हा एक सारखा राहून अशा कांद्याला चांगला बाजारभाव प्राप्त होतो. मल्चिंग पेपरचा वापर केल्याने व याच्या जोडीला ठिबक सिंचन प्रणालीचा यशस्वी वापर केल्याने पाण्याची बचत होते तसेच तण वाढत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात मोठी बचत होते शिवाय यामुळे रासायनिक खतांचा तसेच कीटकनाशकांचा अवाजवी वापर आटोमॅटिक कमी होतो. यामुळे पिकाचा दर्जा हा उत्तम असतो तसेच उत्पादन खर्चात कपात होते. शेतकऱ्यांच्या मते, पारंपारिक पद्धतीने जर कांदा लागवड केली तर कांद्यातून 9 टन एकरी उत्पादन मिळते मात्र या पद्धतीने मल्चिंग पेपरचा व ठिबक सिंचन प्रणालीचा वापर केले तर हेच उत्पन्न 12 टनांपर्यंत पोहचू शकते. मल्चिंग पेपरसाठी साधारण वीस हजार रुपये पर्यंतचा खर्च येत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मल्चिंग पेपर व ठिबक सिंचन प्रणालीद्वारे कांदा लागवड केली आहे. आता यापासून कांद्याचे किती उत्पादन प्राप्त होते तसेच कांद्याला कसा बाजारभाव प्राप्त होतो यावर या आधुनिक पद्धतीचे भवितव्य अवलंबून असेल एवढं नक्की.
Share your comments