थोर समाज सुधारक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुखांचे चरित्र प्रेरणादायी सौरभ वाकोडे
कृषि प्रधान भारत देशातील शेतकरी व शेतमजुरांची आर्थिक परिस्थिती सुधारल्याशिवाय देश महासत्ता बनुच शकत नाही हे वास्तव स्विकारत स्वतःचे आयुष्य वेचणारे दृष्ट्या महानुभवाने आधुनिक शेती तंत्रज्ञानाची गंगा तरुणाईने शेतकयांपर्यंत पोहचावी हिच डॉ. पंजाबराव देशमुखांच्या कार्याला खरी आदरांजली राहील असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष, डॉ. राजेंद्र गाडे यांनी स्व. डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या ५७ व्या स्मृतीदिना निमित्त डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाच्या कमिटी सभागृहात दि. १० एप्रिल, २०२२ रोजी आयोजित विषेश कार्यक्रमात मत प्रतिपादन केले.
कृषीक्रांतीचे प्रणेते तथा विदर्भात बहुआयामी मार्गदर्शक थोर समाज सुधारक भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचे चरित्र सर्वानाच प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन श्री. शिवाजी विज्ञान महाविद्यालय अमरावतीचे सौरभ वाकोडे आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. भाऊसाहेबांनी ग्रामीण शेतकरी, कष्टकरी, असंघटीत समाजाचे उथ्थानासाठी स्वतःचे संपन्न आयुष्य झुगारत लढा उभा केला व देशाला कृषि संपन्न करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात साकार केले. त्यांनी स्थापन केलेल्या भारत कृषक समाज या शेतकरी कल्याण संघटनाचे कार्य अविरत सुरू असून विविध संघटनांनी आता शेती आणि शेतकरी विकासाच्या या यज्ञात तन-मन-धनाने सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या उध्दारासाठी प्रयत्न करावे असे भावनिक आवाहन सुध्दा सौरभ वाकोडे यांनी केले.
भाऊसाहेबांच्या आंर्तराष्ट्रीय कृषि विषयक विचारांवर आधारीत संशोधनाच्या व विस्ताराच्या दिशा विद्यापीठाने निश्चित केल्या असुन वैदर्भिय शेती शाश्वत होण्यासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ परिश्रम घेत असुन शेतकऱ्यांचा विद्यापीठाविषयी विश्वास वृध्दींगत होत असल्याचे प्रतिपादन संचालक विस्तार शिक्षण, डॉ. राजेंद्र गाडे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले. भाऊसाहेबांचे स्मृतीकेंद्र अभ्यागतांना निश्चितच प्रेरणादायी ठरणारे असुन विद्यापीठात येणाऱ्या प्रत्येकाने आर्वजुन स्मृतीकेंद्राला भेट द्यावी असे आवाहन डॉ. राजेंद्र गाडे यांनी या प्रसंगी केले.
या प्रसंगी उपकुलसचिव डॉ. गजानन सातपुते, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. एन. व्ही. शेंडे, विद्यार्थी कल्याण अधिकारी, प्रा. किशोर कुबडे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाला कृषि विस्तार शिक्षण विभाग प्रमुख, डॉ. पी.के. वाकळे व मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ एस. पी. लांबे यांचे सह विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विस्तार शिक्षण संचालनालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने विषेश परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन विस्तार कृषि विद्यावेत्ता, डॉ. विनोद खडसे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सलामे यांनी केले.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments