1. बातम्या

महाराष्ट्रातील सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनचा पुढाकार

KJ Staff
KJ Staff


चीन कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांची मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा 
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचाही पुढाकार

राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीन पेंडच्या (De-Oiled Cake/DOC) खरेदीसाठी चीन पुढे आले असून यासंदर्भात चर्चा करण्यासाठी चीनचे कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची काल रात्री वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शेती उत्पादनांची चीनमध्ये आयात आणि या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी चीन उत्सुक असल्याचे यावेळी कौन्सुलेट जनरल टॅन्ग गुओकाई यांनी सांगितले. चीनसमवेत देवाण-घेवाण अधिक विकसित करण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येईल, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चीनने यासंदर्भात घेतलेल्या पुढाकारामुळे राज्यात उत्पादित होणाऱ्या सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळणार आहे.

राज्य कृषी मूल्य आयोग आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या पुढाकाराने या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर प्रथमच पुढाकार घेतल्याचे दिसले. यावेळी राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, महाराष्ट्र हे देशातील एक प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे. शिवाय राज्यात सोयाबीनवरील प्रक्रिया उद्योगही विकसीत असल्याने चीन देशाला मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेंडचा पुरवठा करता येऊ शकेल. केंद्र शासनानेही यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे हीत लक्षात घेऊन सोयाबीन पेंडला १० टक्के निर्यात प्रोत्साहन अनुदान (Export intensive) जाहीर केले आहे. यामुळे तसेच सोयाबीन पेंडच्या खरेदीसाठी चीनने दाखविलेल्या उत्साहामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा अधिक भाव मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कामी आवश्यक ती सर्व यंत्रणा राज्य शासनामार्फत उपलब्ध करुन दिली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले.

राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल म्हणाले, यावर्षी देशातून निर्यातीसाठी साधारण 30 लाख टन सोयाबीन पेंड उपलब्ध होईल. त्यापैकी 50 टक्के म्हणजे साधारण 15 लाख टन सोयाबीन पेंड ही  महाराष्ट्रातून उपलब्ध होईल. चीन देशाची सोयाबीन पेंडची मागणी भारतातून उपलब्ध होणाऱ्या एकूण सोयाबीन पेंडपेक्षा 10 पटीने अधिक आहे. त्यामुळे चीन ही महाराष्ट्रातील सोयाबीन पेंडच्या विक्रीसाठी खात्रीची बाजारपेठ ठरु शकेल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्य कृषी मूल्य आयोगाच्या याबाबतीतील प्रस्तावास बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या पुढाकाराने चीनच्या कौन्सुलेट जनरल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही ते म्हणाले.

भारतात आणि महाराष्ट्रात उत्पादित होणारी सोयाबीन पेंड ही नॉन जेनेटिकली मॉडीफाईड सीडस पासून उत्पादित होते. जगात अशी सोयाबीन पेंड फक्त भारतातच उत्पादित होते. रसायनमुक्त असलेल्या या सोयाबीन पेंडला चीनमध्ये मोठी मागणी आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters