आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही घन पद्धतीने म्हणजेच 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर केल्यास उत्पादन अधिक मिळते. या लागवडीत झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही. त्यामुळे आपणास या बागेतून चारपट उत्पादन मिळते.
आंब्याच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची एक मीटर खोल, काळी व त्या खाली नरम मुरूम असलेली जमीन चांगली. जमिनीचा सामू 6.5 ते 8.0 इतका असावा. मात्र 10 टक्क्यांपेक्षा जास्त चुनखडी असलेली जमीन आंबा लागवडीसाठी टाळावी. जमिनीच्या पोताप्रमाणे 8 x 8 किंवा 10 x 10 मीटर अंतरावर 1 x 1 x 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाशी 20 ते 25 सें.मी. जाडीचा वाळलेल्या पालापाचोळ्याचा किंवा गवताचा थर द्यावा. असे करताना त्यात 50 ग्रॅम कार्बारिल पावडर धुरळावी. त्यानंतर या खड्ड्यात तीन टोपली चांगले कुजलेले शेणखत, एक किलो सुपर फॉस्फेट, चांगली कसदार काळी माती आणि 100 ग्रॅम कार्बारिल पावडर यांचे मिश्रण करावे. हे मिश्रण खड्ड्यावर थोडी शीग येईल इतके भरून घ्यावे. जमीन भारी असेल तर त्यात 30 टक्के चांगला मुरूम मिसळावा. मात्र हलकी असेल तर 60 टक्क्यांपर्यंत गाळ मिसळावा.
घन लागवडीची पद्धत :
आंबा लागवडीसाठी 10 x 10 मीटर अंतरावर शिफारस केलेली आहे. परंतु आता आंबा लागवड ही 5 x 5 मीटर किंवा 5 x 6 मीटर अंतरावर करणे जास्त फायद्याचे दिसून आले आहे. या अंतरावर झाडातील अंतर 10 ते 12 वर्षांपर्यंत मिळून येत नाही; म्हणजे तोपर्यंत आपणास या बागेतून चारपट उत्पन्न मिळते. कारण 10 x 10 मीटर अंतरावर आंबा लागवड केल्यास हेक्टरी 100 झाडे बसतात. तर 5 x 5 मीटर अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी 400 झाडांची संख्या ठेवणे शक्य होते. या पद्धतीमध्ये झाडांचा घेर व उंची मर्यादित ठेवता येते. त्यासाठी छाटणी आणि वाढनिरोधकांचा वापर करता येतो. इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेत तर 3 x 1 मीटर इतकी कमी अंतरावर लागवड यशस्वी झाली आहे. त्यात हेक्टर 3333 झाडांची संख्या असते. गेल्या पाच वर्षांत आपल्याकडे सुद्धा 2 x 4 मीटर, 3 x 5 मीटरवर आंबा लागवड होत आहे. दाट लागवड करावयाची असल्यास घेराचा आकार मर्यादित ठेवणे आवश्यक आहे.
घन लागवडीचे फायदे :
1) ठराविक क्षेत्रातून अधिक उत्पादन, 2) झाडे लहान असल्यामुळे फळांची विरळणी, फवारणी, छाटणी इत्यादी गोष्टी करणे सोपे होते, 3) आंबा फळांची काढणी खुडी व झेला न वापरता हाताने करणे शक्य होते, 4) फळांची गुणवत्ता व प्रत सुधारण्याचे वेगवेगळे उपाय करणे सहज शक्य होते.
आंबा लागवडीची आधुनिक इनसिटू पद्धत :
इनसिटू पद्धत म्हणजे जागेवर कोयी लावून त्यावर नंतर योग्य वेळी कलमीकरण करणे होय. या पद्धतीचा अवलंब केल्यास बराच फायदा दिसून येतो.
1) जागेवरच कोय लागवडीमुळे रोपाचे सोटमूळ कोणत्याही अडथळ्याविना जमिनीत सरळ खोल जाते. कलमांची मुळे मात्र पिशवीत केलेली असल्यामुळे त्यांची पिशवीत गोल वेटोळी चुंबळ बनते. त्यामुळे खड्ड्यात लागवड केल्यानंतर ती जमिनीत खोलवर जाऊ शकत नाही. हलक्या, मुरमाड जमिनीत हा प्रश्न आणखीनच गंभीर होतो.
2) इनसिटू पद्धतीने लागवड केली असल्यास झाडांची वाढ जोमदारपणे होते.
3) अशा झाडांना रोग व किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी प्रमाणात जाणवतो.
4) एका रोपास बाजूच्या दोन-तीन रोपांचा जोड दिलेला असल्याने कलमात तीन-चार रोपांची एकदाच ताकद मिळून कलम अति शीघ्रतेने वाढते.
इनसिटू पद्धतीने आंबा लागवड
या पद्धतीने लागवड करण्यासाठी आंबा कोयी ताज्या असणे महत्त्वाचे आहे. कारण 15 दिवसांनंतर त्यांची उगवणक्षमता कमी होते. खुळखुळा झालेल्या कोयी अजिबात उगवत नाहीत. आपल्याकडे पावसाळा साधारणत: 20-25 जूनपर्यंत नक्कीच सुरू होतो. तेव्हा आताच गावठी आंब्याच्या पाच ते सात दिवसांच्या ताज्या कोयी जमा कराव्यात. या कोयी एकाच झाडावरील आंब्याच्या असल्यास अति उत्तम. अशा जमा केलेल्या कोयी परत चांगल्या धुऊन घ्याव्यात. दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम प्रति लिटर पाण्यात मिसळून त्यात या कोयी पाच मिनिटे बुडवून घ्याव्यात. त्यानंतर पातळ थर करून सावलीत सुकवत ठेवाव्यात. आपण मिरचीच्या रोपास जसे वाफे करतो, तसे 1 x 3 मीटरचे वाफे करावेत. त्यात तळाशी अर्धा कुजलेला पालापाचोळा आणि मातीचे मिश्रण पसरावे आणि राहिलेले अर्धे मिश्रण कोयी दोन सें.मी. झाकल्या जातील अशारीतीने पसरावे. या वाफ्यात नेहमी वाफसा राहील, असे झारीने पाणी देत राहावे. हे करत असताना शेतात आधीच तयार केलेले खड्डे लागवडीसाठी तयार ठेवावे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात एक किंवा दोन चांगले पाऊस झाल्यावर हे खड्डेचांगले ओले होऊन खड्ड्यातील माती दबलेली असेल.
अशा वेळी तेथे खड्डा पडल्यास आजूबाजूची माती टाकून खड्ड्यातील माती जमिनीच्या पातळीत आणावी. साधारणपणे 15 दिवसांत वाफ्यात लावलेल्या कोयी लागवडीस योग्य होतात. या कोयीची ओल असलेल्या प्रत्येक खड्ड्यात पाच या प्रमाणे लागवड करावी. लागवड करताना लागवडीच्या ठिकाणी ओंजळभर शेणखत मातीत मिसळून त्यावर चौकोनात चार ठिकाणी तीन इंचांवर चार कोयी लावून त्यांच्या मध्यभागी एक कोय लावावी. ओल कमी असल्यास त्यावर दोन तांबे पाणी टाकावे. अशाप्रकारे लागवड केलेल्या कोयी पाच दिवसांत तरारून उगवतात. काही ठिकाणी तीन तर काही ठिकाणी पाच कोयी उगवलेल्या दिसतील. नंतर या रोपांची चांगली निगा राखल्यास ही रोपे ऑक्टोबरपर्यंत तिसऱ्या पेऱ्यावर (कांड्यावर) येतात. त्या वेळी कुशल माळ्याकडून त्यावर कलमीकरण करून घ्यावे. या दरम्यान पाऊस झाला नसेल तर मात्र खड्ड्यास पाणी देण्याची व्यवस्था असावी.
ऑक्टोबरपर्यंत काही कारणाने रोपे कलमीकरणास योग्य नसली तरी ही रोपे फेब्रुवारीपर्यंत मात्र हमखास कलमीकरणास योग्य होतात. त्यावर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कलमीकरण केल्यानंतर त्याच हंगामात किंवा पुढील हंगामात बाजूची रोपे या कलमास जोडता येतात. अशा कलमास बाजूच्या तीन-चार रोपांच्या मुळांची ताकद मिळते. त्यामुळे कलमांची वाढ झपाट्याने होऊन चौथ्या वर्षीच अशा झाडास प्रत्येकी 20 पर्यंत फळे घेता येतात. कोयी लागवडीचे वेळापत्रक आपल्या भागातील पावसाचा अंदाज पाहून पाच दिवस मागे-पुढे करता येते. या अभिनव पद्धतीचा प्रत्यक्षात फार मोठ्या प्रमाणावर अवलंब करून जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील जिरडगाव परिसरात गट पद्धतीने मोठ्या प्रमाणावर आंबा लागवड झाली आहे. सुरवातीपासून ठिबक सिंचनाची सोय असल्यास सरळ खड्ड्यात कोयी लावूनसुद्धा लागवड करता येते.
कलमांची निगा :
प्रत्येक खड्ड्यावर पाऊसमान पाहून सप्टेंबरच्या पहिल्या - दुसऱ्या पंधरवड्यात पाऊस संपताच कुठल्याही काडी-कचऱ्याचे किंवा उसाच्या पाचटाचे वीतभर उंचीचे रोपाभोवती आच्छादन करावे. त्यावर थोडी माती टाकावी. आच्छादन करताना त्यात थोडी लिंडेन पावडर टाकणे गरजेचे आहे. कलमे केल्यानंतर किंवा तयार कलमे लावल्यानंतर गावठी रोपावर येणारी फूट वेळोवेळी काढून टाकणे महत्त्वाचे असते. पावसाचा अंदाज पाहून पावसाळ्यात व जरुरीप्रमाणे वर्षभर कलमास पाणी द्यावे. साधारणपणे पहिले वर्षभर दर 20 दिवसांच्या अंतराने 10 ग्रॅम युरिया आळ्यातील मातीत मिसळून दिल्यास कलमांच्या वाढीला मदत मिळते. कलमांचे भटक्या जनावरांपासून संरक्षण करावे. कलमांना आधार द्यावा. कलमांच्या दोन्ही बाजूंस दोन काड्या लावून त्यावर दोन आडव्या सैल बांधून घ्याव्यात. उन्हाळ्यात कलमांना सावली करावी. कलमी फांद्यांवरील मोहर वेळोवेळी काढावा, आळ्यातील तण वेळोवेळी काढीत जावे. दुसऱ्या वर्षी पाऊस पडताच शिफारशीप्रमाणे शेणखत व रासायनिक खत देऊन तीन ते चार वर्षांपर्यंत झाडांची चांगली वाढ होऊ द्यावी. जमिनीपासून सुमारे तीन फूट उंचीपर्यंत कलमांवरील बाजूच्या फांद्या काढून टाकाव्यात. वेळोवेळी नवीन फुटीवर येणाऱ्या रोग व किडींपासून संरक्षण करावे. फळ बागेस पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था करावी. ठिबक सिंचनाद्वारे प्रति हंगामाप्रमाणे सात-आठ प्रति दिन लिटर पाणी द्यावे. फळातील बागेस मात्र 70 ते 80 लिटर पाणी दररोज द्यावे. पहिली दोन वर्षे कलमांना दररोज पाणी देण्याऐवजी दोन दिवसाआड पाणी द्यावे. म्हणजे मुळ्या खोलवर जातील.
खत व्यवस्थापन :
लागवडीनंतर पहिल्या वर्षी एक टोपले शेणखत, 300 ग्रॅम युरिया, 300 ग्रॅम एसएसपी. 100 ग्रॅम एमओपी व 0.5 किलो लिंबोळी पेंड ही खताची मात्रा द्यावी. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी या मात्रेत वरील मात्रा वाढवून द्यावी. दहाव्या वर्षी प्रति झाड 10 टोपली शेणखत, तीन किलो युरिया, तीन किलो एसएसपी, एक किलो एमओपी व 10 किलो लिंबोळी पेंड एवढी खताची मात्रा देणे. पुढील वर्षी हीच मात्रा वापरावी. ठिबक सिंचनातून शिफारशीनुसार विद्राव्य खते द्यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा शिफारशीप्रमाणे वापर करावा.
Share your comments