
poultry fertilizer is so benificial for growth fertility of land
कोंबडी खताच्या वापरामुळे जमिनीची जलधारणा शक्ती वाढते.जमिनीचा पोत सुधारतो. पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. कोंबडी खतामध्ये मुख्यत: 13 अन्नद्रव्ये असतात.सध्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण 0.5 टक्क्यांच्या खाली चालले आहे.
त्यामुळे सेंद्रिय खताचा वापर वाढविणे आवश्यक आहे. बऱ्याच प्रकारची सेंद्रिय खते उपलब्ध आहेत. त्यामध्ये कोंबडी खत हा उत्तम पर्याय आहे. कोंबडी खत वापरल्याने मातीची
भौतिक,रासायनिक व जैविक क्षमता सुधारते. सेंद्रिय खताचा वापर वाढवल्याने रासायनिक खतांच्या वापरात दहा टक्क्यांपर्यंत बचत होते. कोंबडी खताचा वापर हा बागायती शेतीत चांगला होतो.
ऊस फळपिके आणि फुलझाडे कोंबडी खतास चांगला प्रतिसाद देतात. कोंबड्यांची विष्ठा, कोंबड्यांच्या लिटरसाठी वापरलेला लाकडाचा भुस्सा, साळीचा भुस्सा, शेंगांची टरफले इत्यादी सर्व घटक कुजल्यानंतर तयार झालेला पदार्थ म्हणजेच कोंबडीखत.
कोंबडी खताची प्रत ही कोंबडीची जात, वापरण्यात आलेले लिटरचे साहित्य कोंबडी खाद्य, जागा,पाण्याचा वापर यांसारख्या घटकांवर अवलंबून असते. साधारणत: एक हजार कोंबड्या पासून वर्षाला 14 टन एवढे खत तयार होते. खताचे महत्त्व कोंबडी खतामध्ये मुख्यत: 13 अन्नद्रव्ये असतात.त्यात नत्र व स्फुरद जास्त प्रमाणात असते. कोंबडी खतातील नत्र हे अमोनिआ, नायट्रेट,यूरिक ॲसिड या प्रकारात आढळते. मुख्य अन्नद्रव्य व्यतिरिक्त कॅल्शियम,मॅग्नेशिअम, सल्फर, सोडियम,फेरस, मंगल,मॉलिब्डेनम,बोरॉन, झिंक, कॉपर इत्यादी अन्नद्रव्ये उपलब्ध होतात.
- खत तयार करण्याची पद्धत:
1) पोल्ट्री शेड मधील लिटर शेडच्या बाहेर काढल्या नंतर त्याचे व्यवस्थित थर लावावेत.
2) एक टन कोंबडी लिटर साठी दोन किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धक मिसळावे.
3) पुरेसा ओलावा ( 30 ते 40 टक्के ) राहील एवढे पाणी शिंपडावे.
4) खताच्या ढिगाची एक महिन्याच्या अंतराने 2 ते 3 वेळा नियमित चाळणी करावी.
5) खताच्या ढिगाचे तापमान 40 ते 50 अंश सेल्सियस एवढे राखावे.
6) चांगल्या गुणवत्तेचे कोंबडी खत तयार होण्यास पाच महिन्याचा कालावधी लागतो
7) सध्या कोंबडी खत हे व्यावसायिक स्वरूपात ही तयार करतात. कोंबडी खताचा पॅलेट 5 ते 25 किलोच्या बॅगेत मिळतात.
- चांगल्या खताचे गुणधर्म :
1) खताचा रंग भुरकट, तपकिरी, काळपट असावा. वास मातकट असावा.
2) खताचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.
3) कणांचा आकार 5 ते 10 मीमी असावा.
4) कर्ब नत्र गुणोत्तर 1.10 ते 1. 20 दरम्यान असावी.
5) जलधारणाशक्ती 30 टक्क्यापेक्षा जास्त असावी.
खत वापरण्याची पद्धत :
1) मशागतीच्या वेळी पेरणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर कोंबडी खत जमिनीत मिसळावे. यानंतर कुळवाची पाळी द्यावी.
2) ताजे कोंबडी खत उभ्या पिकात, जमिनीत मिसळू नये. जर उभ्या पिकात द्यायचे असेल तर एक महिना अगोदर पाणी शिंपडून ते थंड होऊ द्यावे. म्हणजे त्याचे कर्बनत्र गुणोत्तर स्थिर राहते. त्यातील अन्नद्रव्ये पिकांना उपलब्ध होतात.
3) उभ्या पिकात खत देताना जमिनीत पुरेसा ओलावा असावा. नसेल तर पीक पिवळे पडते. ताजे कोंबडी खत लगेच पिकांना वापरू नये.
4) जमीन व पीक लागवडी नुसार प्रति एकरी 15 ते 20 टन खताचा वापर करावा.
Share your comments