मी माझा स्वतः चा अनुभव सांगत आहे.२०२० १९फेब्रुवारी शिव जयंतीला मी रोप लागवड करायचे नियोजन केले पण काही कारणाने रोपे वेळेवर मिळाली नाही. म्हणून १ मार्च ला ४ हजार केळी रोपे लागवड केली पण नंतर कोरोना मुळे देशात संपूर्ण लॉक डाऊन ची घोषणा ३ महिन्यासाठी झाली.
तिकडे एप्रिल महिन्यात माझ्या नवती ची कापणी सुरू झाली पण लॉक डाऊन असल्याने केळीला सुरवातीला चीलिंगमुळे ३०० रूपये भाव खूपच कमी मिळाला. पण नंतर एक्स्पोर्ट आले व त्यांनी ७०० /८०० ने कापणी सुरू केली. स्थानिक व्यापारी इतर शेतकऱ्याची केळी खूपच कमी ३५०/४५० पर्यंत कापली जात होती.
इकडे मी हे असे झालेले हाल पाहून रासायनीक खते त्या वर्षी मंदी असल्यानेविकत घेतलेच नाही. उलट बागेच्या दक्षिण पच्छिम बाजूने सन लागवड केली होती. त्यांची शेंडे बागेच्या उंची नुसार ठेवून कापून त्याचे बागेला अच्छादन केले. बागेला नियमित पाणी सुरू होते. लागवडी नंतर दर २१/२१ दिवसांनी मी बागेला प्रती झाड २५० मिली.
जीवामृत द्यायला सुरवात केली. माझ्याकडे तेंव्हा एकच गाय असल्यामुळे गोमुत्र कमी म्हणजे फक्त ९/१० लीटर गोळा व्हायचे. म्हणून मी २०० लीटर पाण्यात फक्त २ लीटर गोमूत्र व ८/१० किलो शेण स्लरी तयार करुन डब्याने खोडाजवड देत असो.३/४ वेळेस दिल्यावर त्याचा चांगलाच प्रतिसाद मला मिळाला. जमीन खूपच मऊ मऊ झाली होती.२/३ फुटाचे कोणतेही तन एका हाताने उपटल्यावर मुळासकट उपटून येत होते. विशेष उन्हाचा बागेवर काहीही परिणाम झाला नव्हता. रंग पोपटी हिरवा, बुंधा तपकिरी लाल व चमकदार दिसत होता.
मी जुलै महिन्यापर्यंत त्याला फक्त जीवामृत दिले. नंतर सगळे बंद करून फक्त बागेला २ किलो गुळ प्रती हजारी दर १५/१५ दिवसांनी देत होतो. सप्टेंबर मध्ये त्याची निसावान सुरू झाली. फणी, अंतरी, रंग सगळे छान होते. हिवाळा असल्यावर पण घड अडकत नव्हते.
थंडी राहिल्यामुळे कापणी फेब्रुवारी मध्ये सुरू झाली. रास १८/२० होती. पण सुरवातीच्या २/३ कापण्या चांगल्या भावात गेल्या पण नंतर येरे माझ्या मागल्या ची गत सुरू झाली. परत लॉक डाऊन. आता तर स्थानिक व्यापारी पण फिरकत नव्हता. बाग शेतातच झाडावर पिकायला लागली. ते घड मी तसेच पिकुन केळी खाली गळू दिली.म्हटले चला त्याचे सेंद्रीय खतात रूपांतर होऊन पिलाला मिळेल.
पिलाला पण जीवामृत दिले. पिल थंडी राहिल्यामुळे पण बागेच्या सवाई वाढले. त्याची निसावण ऑगस्ट मध्ये झाली. ते पिल पण मंदी मध्ये कमी भावतच कापले गेले. पण एक मनात संतोष व समाधान होते. जर याच बागेला रासायनीक खतांचे डोस दिले असते तर उत्पादन खर्च वाढला असता व उत्पादन खर्च जेमतेम निघाला असता.
फरक फक्त एवढाच आहे की रासायनिक खतांवर बाग लवकर तयार होते व रास जास्त येते. याऊलट गुणवत्ता सेंद्रिय पध्दतीनं पिकविलेल्या मालाला चांगली रहाते फक्त माल उशीरा तयार होतो. मी स्वतः माझा सेंद्रीय शेतीचे एक उदाहरण दिले आहे. तसे आता रासायनीक खतांचे भाव आभाळाची उंची गाठली आहे.
फक्त रासायनीक खतांचे प्रमाण अधिक करु नका.रासायनीक खते आणि सेंद्रीय खते यांचे आलटून पालटून वापर केल्यास जमिनीची झीज भरून येते व पिकांची गुणवत्ता पण चांगली राहते.
आत्ता माझ्याकडे ३ देशी गाई व ४ देशी वासरी आहेत त्यांचे गोमूत्र व गुळ मिश्रण मी केळी बागेला अधून मधून देत आहे. सोबत वेस्ट दिकांपोजर पण वापरतो.
Krishnal mahajan
जय जवान जय किसान
Share your comments