1. फलोत्पादन

फळबागेच्या यशस्वी लागवडीसाठी महत्वाच्या बाबी

KJ Maharashtra
KJ Maharashtra
फळबागेच्या यशस्वी लागवडीसाठी महत्वाच्या बाबी

फळबागेच्या यशस्वी लागवडीसाठी महत्वाच्या बाबी

फळबागेसाठी जमिनीची निवड:-

आपली जमीन कोणत्या प्रकारची आहे, हलकी, मध्यम की भारी हे सर्वांना परिचित असतेच. जर माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी. जमिनीची खोली किती आहे? जमिनीच्या खाली मुरूम किती खोलीवर आहे ? जमिनीचा निचरा कसा आहे? त्याचा अभ्यास करूनच फळबाग निवडावी. फळबागेसाठी जमिनीची निवड करताना तिचा निचरा उत्तम असणे आवश्यक आहे. फळबागेसाठी कमीत कमी १ मीटर खोलीनंतर मुरमाचा थर असणारी जमीन निवडावी. भरपूर सेंद्रिय कर्ब असणारी, भुसभुशीत, मध्यम पोताची जमिनीचा सामू ६ ते ७.५ पर्यंत असावा. मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा कमी असावे. जमिनीचा उतार २ ते ३ टक्क्यापेक्षा जास्त नसावा. ज्या ठिकाणी फळबाग लावायची आहे, त्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.

.फार खोल असणाऱ्या जमिनी, क्षारयुक्त जमिनी, चोपण जमिनी यातून पाण्याचा निचरा योग्य होत नाही अशा जमिनीत प्रारंभी झाडे वाढल्यासारखी दिसली तरी पुढे वाढीचा वेग मंदावतो व उत्पादन मिळत नाही. काही वेळा झाडे मरण्याची संभावना असते. तसेच ज्या जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण १० टक्क्यापेक्षा जास्त आहे अशा जमिनीत फळबागेची वाढ होत नाही.

 

 माती परीक्षण करण्यासाठी फळबाग क्षेत्रातील मातीचा नमुना कसा घ्यावा?

 

फळबागेकरिता मातीचा नमुना घेताना जमिनीच्या प्रकारानुसार प्रातिनिधिक नमुना घ्यावा. सर्वप्रथम ३ x ३ x ३ फूट खोलीचा (१०० से.मी.) किंवा मुरूम लागेपर्यंत खड्डा करून पृष्ठभागापासून प्रत्येक फुटातील प्रातिनिधीक नमुना काढावा व तो वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून तपासणीसाठी पाठवावा. माती परीक्षणाप्रमाणेच पाण्याची तपासणी करणे आवश्यक आहे. आपले विहिरीचे/बोअरचे पाणी क्षारयुक्त वा मचूळ असू नये ते गोड असावे. तेव्हा माती बरोबरच, पाण्याचेही रासायनिक परीक्षण करून घ्यावे आणि त्या अनुषंगानेच फळझाडांची निवड करावी.

 

फळबागेसाठी पाण्याची उपलब्धता:-

बागायती फळझाडांना नियमित पाणी द्यावे लागते, अशा बागायती फळझाडांची लागवड करताना कितपत पाणीपुरवठा पुरेल किंवा पाण्याची उपलब्धता किती आहे, याचा विचार करूनच नियोजन करावे. कोरडवाहू फळपिकाना लागवडीच्या सुरुवातीस पहिली तीन ते चार वर्ष पाण्याची, चांगल्या व समाधानकारक वाढीसाठी पाण्याची आवश्यकता असते. नारळ, सुपारी, केळी, पपई, चिकू मसाला पिके यांना इतर फळझाडांपेक्षा जास्त पाणी लागते. तसेच फळझाडांवरील कीड व रोगाच्या नियंत्रणाकरिता आवश्यक फवारणीसाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणून पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळझाडांची निवड करावी. आपल्याकडे १२ महिने पाण्याची सोय असेल तर ज्या फळझाडांना बाराही महिने पाणी लागते अशा फळझाडांची निवड करावी. आपल्याला पाणी आठ महिने पुरत असेल तर पेरू सारखी फळझाडे लावावीत. आपले पाणी फक्त सहा महिने पुरत असेल तर सीताफळ, रामफळ, आवळा, बोर या सारखी कोरडवाहू फळझाडांची लागवड करावी.

हवामानानुसार फळपिकांची लागवड:-

महाराष्ट्रातील शेतकरी या बाबतीत खरोखरच भाग्यवान आहेत, कारण आपल्या राज्यात सफरचंद वगळता बहुतेक फळझाडांची यशस्वी लागवड करता येते. कारण आपल्या राज्यातील हवामान फळबाग लागवडीसाठी खूपच अनुकूल आहे. यामुळे हवामानाच्या बाबतीत फळबाग लागवड करताना शेतकऱ्यांना फारसा विचार करावा लागत नाही. आपल्या राज्याचा विचार करता पश्चिम महाराष्ट्रात आंबा, केळी, चिकू, पपई, नारळ अशा प्रकारची फळझाडे घ्यावीत. पूर्वेकडील उष्ण व कोरड्या हवामानात संत्रा, मोसबी, कागदी लिंबू, पेरू, द्राक्षे, डाळिंब यासारखी फळझाडे घ्यावीत. कोकणासारख्या अति पावसाच्या भागात चिकू, नारळ, फणस, आंबा न काजू यासारखी फळझाडे घ्यावीत. अति कमी पावसाच्या भागात बोर,सीताफळ, आवळा, चिंच अशी कोरडवाहू फळझाडे घ्यावी. हवामानानुसार फळझाडांची लागवड न केल्यास फळे न येणे, फळे लागल्यास फळांची प्रत खालावणे, उशिरा फळे लागणे, रोग व किडींचा प्रादुर्भाव इत्यादी समस्या भेडसावतात म्हणून हवामानानुसार फळझाड लागवड करावी.

                                                     

 -शेतकरी मासिक

  डॉ.आदिनाथ ताकटे,मृदाशास्त्रज्ञ,एकात्मिक शेती पद्धती,

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी

संकलन - IPM school

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters