1. फलोत्पादन

बोर्डो पेस्ट कशासाठी वापरली जाते? व कशी बनवली जाते?

चुना, मोरचूद व पाण्याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाला बोर्डो पेस्ट (मलम) असे म्हणतात.

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
बोर्डो पेस्ट कशासाठी वापरली जाते? व कशी बनवली जाते?

बोर्डो पेस्ट कशासाठी वापरली जाते? व कशी बनवली जाते?

चुना, मोरचूद व पाण्याच्या योग्य प्रमाणातील मिश्रणाला बोर्डो पेस्ट (मलम) असे म्हणतात. हे मिश्रण प्रभावी बुरशीनाशक असून, वेगवेगळ्या तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाचा फवारणी व झाडाच्या बुंध्याला लावण्याकरिता वापर केला जातो. वर्षातून कमीत कमी दोन वेळेस बुंध्यांना बोर्डो पेस्ट(मलम) लावावी.

 

बोर्डो पेस्ट (मलम) तयार करण्याची पद्धत :

चुना व मोरचूद यांच्या घट्ट द्रावणास बोर्डो मलम (पेस्ट) असे म्हणतात. बोर्डो पेस्ट तयार करण्यासाठी बोर्डो मिश्रणाप्रमाणेच चांगल्या प्रतीचे मोरचूद आणि उच्च प्रतीचा हवाबंद डब्यातील चुना घ्यावा. बोर्डो पेस्टमध्ये एक किलो मोरचूद, एक कि.ग्रॅ. कळीचा चुना आणि दहा लिटर पाणी वापरतात.

१) १ किलो स्वच्छ मोरचूद पूड व १ किलो कळीचा चुना प्लॅस्टिकच्या वेगवेगळ्या बादलीत किंवा मडक्यात ५-५ लिटर पाण्यात रात्रभर भिजत घालावे.

२) चुना व मोरचूदचे दुसऱ्या दिवशी अन्य बादलीत मिश्रण करावे.

३) मिश्रण करीत असताना द्रावण काठीने सतत ढवळावे.

४) तयार झालेले घट्ट द्रावण म्हणजेच बोर्डो पेस्ट होय.

५) तयार झालेला बोर्डो मलम झाडांना लावण्यास योग्य असल्याची खात्री करून घ्यावी.

६) बोर्डो मलम झाडाच्या बुंध्यास चांगला चिकटून राहावा याकरिता मिश्रणामध्ये स्टीकर किंवा साबुदाण्याचे पाणी मिसळावे. या करिता २५० ग्रॅम साबुदाणा २ लिटर पाण्यात चांगला उकळून गाळून घ्यावा. थंड झाल्यानंतर तयार बोर्डो मिश्रणात मिसळून झाडाच्या बुंध्याला ही पेस्ट लावावी.

 चांगल्या प्रकारचे पेस्ट तयार झाल्यावर बुंध्यांना लावावे. बुंध्याचे बोर्डो पेस्ट वाळल्यानंतर खोडास निळसर आकाशी रंग येतो. बोर्डो पेस्ट व बोर्डो मिश्रण तयार केल्यावर ताबडतोब वापरावे. जास्त कालावधी झाल्यास त्याचा परिणाम होत नाही.

बोर्डो पेस्ट तयार करताना घ्यावयाची काळजी :

बोर्डो पेस्ट फवारणीच्या वेळी फडक्‍यातून किंवा बारीक चाळणीतून गाळून घ्यावे. तसेच मिश्रण करतेवेळी तिसऱ्या भांड्यात दोन्ही द्रावण ओतताना प्रथम चुन्याचे आणि पाठोपाठ मोरचुदाचे द्रावण ओतून मिश्रण सारखे ढवळावे. एकदा तयार केलेले मिश्रण त्याच दिवशी वापरावे. तयार केलेल्या मिश्रणाची चाचणी निळा लिटमस पेपरने घ्यावी. 

निळा लिटमस पेपर द्रावणात बुडविल्यानंतर जर लाल झाला तर मिश्रणात अधिक मोरचूद आहे किंवा द्रावण आम्ल आहे असे समजावे. मिश्रणातील जास्त मोरचूद नाहीसे करण्यासाठी मिश्रणात परत चुन्याचे द्रावण निळा लिटमस पेपर निळाच राहीपर्यंत टाकावे. चाचणीची दुसरी पद्धत म्हणजे तयार मिश्रणात लोखंडी खिळा किंवा सळई दहा सें.मी. द्रावणात बुडविले असता त्यावर तांबूस रंग चढला तर (तांबडा दिसणारा थर तांब्याचे सूक्ष्म कण जमून झालेला असतो) द्रावण फवारण्यास योग्य नाही असे समजून थोडी थोडी चुन्याची निवळी ओतावी. ही निवळी ओतण्याची क्रिया लोखंडी खिळा किंवा सळई यावर जमणारा तांबडा थर नाहीसा होईपर्यंत करावी म्हणजे मिश्रण वापरण्यास योग्य होईल.

 

  बोर्डो पेस्टचा वापर:

  पावसाळा सुरु झाल्यावर बोर्डो मलम पावसाच्या पाण्यामध्ये विरघळून बुंध्याशी गेल्याने मूळाशी असलेल्या रोगकारक बुरशीचा नाश होतो. 

संत्राबागेमध्ये फायटोप्थोरा (डिंक्या) या रोगाचे बिजाणू जमिनीत असतात. पावसाच्या जोरदार सरींमुळे मातीसोबत त्यातील रोगाचे बिजाणू झाडाच्या बुंध्यावर उडतात. बुरशीच्या वाढीस अनुकूल ओलसर दमट वातावरणात झाडाच्या पेशीत प्रवेश करतात, त्यामुळे डिंक्या रोगाची लागण बागेत होते.     

फळबागेचे रोगांपासून रक्षण करण्याकरिता प्रतिबंधक उपाय म्हणून वर्षातून कमीतकमी दोन वेळा म्हणजेच उन्हाळा सुरु झाल्यावर आणि पावसाळा संपल्यानंतर फळझाडांच्या बुंध्याला बोर्डो पेस्ट(मलम) लावणे आवश्यक आहे.

लिंबूवर्गीय फळपिकावरील पानावरील कोळशी, करपा, फळावरी तपकिरी कुज, खैरया तसेच शेंडेमर करीता ०.६ ते १.० टक्के तीव्रतेचे मिश्रणाचा उपयोग करावा.

 डिंक्या /पायकूज रोगासाठी बोर्डो पेस्टचा उपयोग करावा (पावसाळया आधी व पावसाळा संपल्यानंतर)पेस्ट झाडाच्या खोडास जमिनीपासून वर १ मीटर उंचीपर्यंत लावावी.

झाडांची छाटणी केल्यानंतर फांद्या कापलेल्या ठिकाणी झालेल्या जखमेवर बोर्डो पेस्ट लावल्यास रोगाचे बीजाणू झाडामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. 

मूळकुज रोगासाठी झाडाच्या वाफ्यात १ टक्के बोर्डोक्स मिश्रणाची आवळणी करावी.

 वांगी, मिरची, बटाटा, टोमॅटो, भोपळावर्गीय भाज्या, कोबी, वाटाणा इ. पिकांवरील करपा, काळा करपा, पानांवरील ठिपके, केवडा, भुरी, जिवाणूजन्य करपा अशा विविध रोगांच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार द्रावणांची तीव्रता ठरवावी. साधारणतः भाजीपाला पिकांसाठी 0.5 ते 0.6% तीव्रतेचे बोर्डो मिश्रण फवारणीसाठी योग्य असते.

1 टक्के तीव्रतेचे बोर्डो मिश्रण तयार करण्यासाठी 1 किलो मोरचूद, 1 किलो चुना आणि 100 लिटर पाणी लागते. 

 

संदर्भ : डॉ. पं. दे. कृ. वि., अकोला.  

संकलन- IPM school

English Summary: How to use bordeaux paste and how to to make Published on: 07 March 2022, 11:23 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters