सघन पद्धतीने पेरू लागवड

Friday, 05 October 2018 12:15 PM


पेरू फळपिक कमी पाण्यावर व कोणत्याही जमिनीत येणारे फायदेशीर पीक आहे. इतर फळझाडांच्या तुलनेत पेरूचे पिक कमी खर्चाचे हमखास उत्पादन देणारे आणि कमी मेहनतीचे असल्याने ह्या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

पेरूची सघन लागवड पध्दत किंवा मिडो ऑर्चड पध्दत:

पेरूच्या सघन लागवड पध्दतीमध्ये दोन लागवड पध्दतीने लागवड करता येते. पहिली पध्दत म्हणजे 2 X 1 मीटर (6 X 3 फूट) अंतरावर लागवड व दुसरी पध्दत 7.5 X 7.5 फुट अंतरावर लागवड करणे.

जर आपण 2 X 1 मीटर अंतरावर लागवड केली असेल तर आपल्याला वर्षातून तीन छाटण्या कराव्या लागतात यासाठी मजुरांची गरज जास्त लागते याचा विचार करता 7.5 X 7.5 फूट अंतरावर लागवड कमी खर्चिक आहे.

7.5 x 7.5 फूट लागवड अंतराचे तंत्रज्ञान:

 • जर आपण पेरूची लागवड 7.5 X 7.5 फूट अंतरावर केली तर एकरी पेरूचे 774 झाडे बसतात आणि अशा पध्दतीने एकरी 15 ते 18 टनापर्यंत उत्पादन मिळते. पेरूच्या प्रतीमध्ये चांगली सुधारणा होते.

 • सघन पध्दतीने लागवड केल्यामूळे ठिबक सिंचन पध्दतीचा वापर करून पिकाला गरजेनूसार पाणी देता येते. जमिनीत सतत वाफाचा परिस्थिती राहिल्यामूळे उत्पादनात वाढ होते.

 • मे महिन्यात एकदाच चांगली छाटणी केली तर पेरूचे चांगले उत्पादन मिळते. पेरूच्या झाडाची जास्त वाढ होत असेल तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात वाढणारा शेंडा हाताच्या सहाय्याने एकदाच काढला तर पुढची वाढ थांबते व त्यामूळे फांदीवर फुलांची संख्या वाढते.

 • पेरूची सर्व फळे जाड फांदी व खोडावर येत असल्यामूळे त्याचा आकार व प्रतही चांगले मिळते.

 • झाडाची मे महिन्यात छाटणी करताना जाड फांद्या ठेवून बाकीच्या सर्व बारीक काड्या छाटाव्यात. झाडाच्या मुख्य खोडापासून आलेल्या चार ते पाच उपयुक्त फांद्या आणि त्यानंतर आलेल्या लहान फांद्या अशा प्रकारे झाडांना आकार देण्यात येतो.

 • जुन महिन्यात पाऊस पडल्यानंतर किंवा गरजेप्रमाणे पाणी दिल्यानंतर झाडांना फूट येण्यास सुरूवात होते. पाण्याची उपलब्धता असेल तर लवकर छाटणी करून हंगामापूर्वी फळे बाजारपेठेत पाठविता येतात.

 • पाणी देण्याअगोदर शिफारशीत मात्रेमध्ये शेणखत, रासायनिक खते, आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये झाडाच्या खोडाभोवती रिंग करून द्यावेत किंवा ठिबक मधून सोडावेत (शेणखत सोडून)

 • झाडाला पालवी आल्यानंतर सुरूवातीला फुले हे झाडाच्या जाड फांद्या आणि खोडावर येतात. या फळाचा आकार, वजन आणि गुणवत्ता चांगली असते. फळांची गोडी चांगली असते. झाडाला भरपूर फूट येऊन पानांची संख्या चांगली मिळते. नंतरचा बहार हा नविन आलेल्या शेंड्यांना येतो.

 • पेरूच्या पहिल्या फळाची काढणी सप्टेंबर -ऑक्टोबर मध्ये होते. तर दुसरी फळे फेब्रुवारी-मार्च किंवा यापेक्षा थोडी उशीरा मिळतात. फळाला चांगला बाजारभाव मिळतो.

 • फळांच्या उत्पादनानूसार झाडांना दोनदा चाळणी करावी लागते. झाडांच्या जुन्या मुळ्या तुटून नवीन पांढरी मुळे येण्यासाठी शेत भुसभुशीत ठेवावे. अंतरमशागतीसाठी पॉवर टिलरचा वापर करावा म्हणजे खर्चात बचत होते.

पेरूचे मिडो ऑर्चड तंत्रज्ञान:

या पध्दतीमध्ये पेरूची लागवड 2 X 1 मीटर अंतरावर केली जाते. व एकरी 2000 झाडांची लागवड करता येते. या पध्दतीने जर लागवड करायची असेल तर छाटणी तंत्रज्ञानाचे ज्ञान अवगत असणे महत्त्वाचे आहे. जर आपल्याला छाटणी तंत्र समजले तर आपल्याला उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येईल नाहीतर चांगल्या प्रतीच उत्पादन घेता येत नाही.

पेरूचे मिडो ऑर्चड छाटणी तंत्रज्ञान:

 • पहिल्यांदा 2 X 1 मी. म्हणजेच दोन ओळीतील अंतर 2 मी. व दोन झाडातील अंतर 1 मी. या अंतरावर लागवड करावी.

 • लागवड केल्यानंतर दोन महिन्यांनी 50-60 से.मी. जमिनीपासून खोड ठेवून छाटणी करावी.

 • सुरूवातीला आकार देताना चार दिशेच्या चार फांद्या फक्त ठेवाव्यात. म्हणजे झाडाला चांगला आकार येतो.

 • पहिल्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी परत एकदा फांद्यांची छाटणी करावी. यामध्ये फांदीचे 50 टक्के (अर्धी फांदी) छाटणी करावी. फक्त तांबड्या रंगाची परिपक्व फांदीचा खालचा भाग आहे तसाच ठेवावा.

 • दुसऱ्या छाटणीनंतर तीन महिन्यांनी परत एकदा ज्या नविन फांद्या फुटलेल्या आहेत या फांदीची 50 टक्के म्हणजे सुरूवातीचा 50 टक्के शेंड्याच्या भागाची छाटणी करावी.


छाटणीचे वेळापत्रक:

अ.क्र

महिना व करावयाची कामे

छाटणी संदर्भात माहिती

1

पेरूची लागवड               

दाब कलमांच्या रोपांची लागवड करावी

2

लागवडीनंतर 3 महिन्यांनी   

जमिनीपासून 60 सेमी अंतरावर शेंडा तोडणी/कट करावा

3

पहिल्या छाटणीनंतर 3 महिन्यांनी परत दुसरी छाट्णी करावी. (लागवडीनंतर 6 महिन्यांनी)  

3-4 फांद्या चारी बाजूने सारख्या अंतरावर ठेवून इतर फांद्या काढून टाकाव्यात

4

दुसऱ्या छाटणीनंतर 2-2.5 महिन्यांनी परत तिसरी छाटणी करावी (लागवडीनंतर 9 महिन्यांनी)        

चार फांद्या ज्या ठेवल्या आहेत (प्राथमांक) या फांद्यांची 50 टक्के (अर्धा) छाटणी करावी व खालचा 50 टक्के (अर्धा) भाग जो परिपक्व व तांबड्या रंगाचा आहे तोच भाग ठेवावा.

5

तिसर्‍या छाटणीनंतर परत पुन्हा 3 महिन्यांनी फांद्यांची चौथी छाटणी करावी (लागवडीनंतर 12 महिन्यांनी)

ज्या परिपक्व फांद्या ठेवलेल्या आहेत त्या फांद्यांची 50 टक्के शेंडा छाटणी करावी म्हणजेच या ठिकाणी फुले लागतात व फळधारणा होते.

6

लागवडीनंतर 1 (महिन्यांची 1.5 वर्षानंतर)    

पहिल्यांदा फळधारणा होते.

7

फळे काढणी केल्यानंतर (लागवडीनंतर 23 महिन्यांनी किंवा फळधारणेनंतर 5 महिन्यांनी)

एकुण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्या- बॅक प्रुनिंग)

8

छाटणीनंतर दोन महिन्यांनी (लागवडीनंतर 25 महिन्यांनी)

दुसरी फळधारणा

9

लागवडीनंतर 30 महिन्यांनी

तिसरी फळधारणा

 

 • पहिली फळधारणा लागवडीनंतर 18 महिन्यांनी

 • फळे काढणी केल्यानंतर पुन्हा एकदा एकूण फांदीच्या 50 टक्के फांदीची छाटणी करावी. (सर्व फांद्याची-बॅक प्रुनिंग करावी)

 • छाटणीनंतर पुन्हा दोन ते तीन महिन्यात परत फळधारणा चालु होते.


तुलना: पारंपारिक लागवड आणि सघन लागवड पध्दती

अ.क्र

तुलनात्मक मुद्दा

पारंपारिक लागवड पद्धत

सघन लागवड पद्धत

1

फळधारणा

तिसऱ्या वर्षापासून चालू होते

पहिल्या वर्षापासून चालू होते

2

उत्पादन

12-15 टन/हेक्टर

30-45 टन/हेक्टर

3

व्यवस्थापन

झाडाचा आकार मोठा असल्याने थोडे अवघड होते

झाडाचा आकार लहान असल्यामूळे सोपे होते

4

मजूर

जास्त

कमी

5

उत्पादन खर्च

जास्त

कमी

6

तोडणी / काढणी

अवघड

सोपी

7

फळांचा दर्जा

मोठा आकार, विस्तार, जास्त फांद्या, यामुळे फांद्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे फळांचा दर्जा चांगला मिली नाही

झाडांचा कमी विस्तार यामुळे सर्व फांद्यांना सूर्यप्रकाश मिळतो, हवा खेळती राहते, रोग व कीड कमी प्रमाणात येते व सर्व फांद्यांना व फळांना सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे फळांचा दर्जा व उत्पादन सुधारते

 

श्री. यशवंत जगदाळे, डॉ. सय्यद शाकीर अली
कृषी विज्ञान केंद्र, बारामती
02112-255207, 255227

Guava पेरू सघन पद्धती High Density Planting Meadow orchrad मिडो ऑर्चड krishi vigyan kendra baramati कृषी विज्ञान केंद्र बारामती

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
Download Krishi Jagran Mobile App


CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.