1. फलोत्पादन

द्राक्षावरील महत्वाच्या रोगांची ओळख व नियंत्रण.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
द्राक्षावरील महत्वाच्या रोगांची ओळख व नियंत्रण.

द्राक्षावरील महत्वाच्या रोगांची ओळख व नियंत्रण.

अ)जैविक किंवा सूक्ष्मजंतु 

ब)अजैविक किंवा सूक्ष्म जंतु शिवाय (उदा:जमिनीची नापीकता, खते, पाणी, हवामान, सूर्यप्रकाश आदी)

अ) जैविक कारणांमध्ये बुरशी(Fungus) जीवाणू(Bacteria), विषाणू (Virus) चा प्रमुख्याने समावेश होतो. द्राक्ष पिकामध्ये या प्रमुख कारणामुळे मोठया प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे वेळीच रोगाची ओळख करून त्यांचे नियंत्रणाकरीता किंवा उच्चाटना करीता कृती करणे महत्वाचे असते. रोगाचे निदान झाल्याशिवाय उपाय योजने चुकीचे ठरते.त्याकरीता द्राक्ष पिकात आढळणारे रोग त्यांचे जीवनक्रम, उपाय आदीची महत्वाची माहिती असणे आवश्य असते.

 

१) केवडा (Downy mildew )

द्राक्ष पिकात या रोगाची लागण प्लझमोपॅरा व्हीटीकोला (Plasmopara Viticola) या बुरशी पासून होत असते.या बुरशीचे धागे एक पेशीय नळीच्या आकाराचे असतात या बुरशीचे चर बीजूक वेलीच्या भागावर वाढत असतांना आपली मुळे (हॉसस्टोरिया) वेलीच्या पेशीत प्रवेशतात. यांचा शिरकाव हिरव्या भागावरील त्वचारंध्रा किंवा जखमेतून होत असतो. पानाच्या आतील भागात वाढणारी बुरशी त्वचारंध्रामधून बाहेर दांडे काढतात त्यावर अगणीत चर बुजूक तयार करून वारा पावसाच्या मदतीने निरोगी भागावर पसरून रोगाचा प्रसार करतात.

 

प्रसार कसा होतो :भौतिक गुणधर्म हरवलेल्या जमिनीमध्ये तसेच आद्रतायुक्त हवामानात डाऊनी या रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो या रोगामुळे द्राक्ष पिकाचे मोठया प्रमाणात नुकसान होते. या रोगाला दमट वातावरण अनकूल असते. या रोगाची लागण द्राक्षपिकात पाने, फुले, घडावर होत असते. त्यामुळे रोगग्रस्त भागावरील विषाणू मृत होतात, रोगग्रस्त भाग निकामी होतो या रोगाला पोषक हवामान असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड होते. हा रोग द्राक्ष पिकात हमखास येणारा रोग आहे.

रोगाची लक्षणे :या रोगाची लक्षणे वेलीच्या सर्व हिरव्या भागांवर आढळतात हिरव्या पानावर सुरवातीस लहान तेलकट डाग पडतात पानाच्या खालील भागावर ठिपका असलेल्या ठिकाणी बुरशीची वाढ दिसते. दमट हवामानात तो भाग रोगग्रस्त होऊन वेलीवरून गळतो. हा रोग दमट वातावरणात बुरशीला दीर्घ काळ पोषक असल्यास संपूर्ण कोवळी पाने, फुले, फळे यावर आक्रमक होतो या रोगामुळे द्राक्ष वेलही जळून मरते द्राक्ष मणी अर्धवट वाढतात रोगग्रस्त मण्याच्या गाभ्यात व देठावर बुरशी वाढते त्यामुळे मण्याची कातडी जाड, सुरकुतलेली, करड्या रंगाची जाळीयुक्त होते रोगग्रस्त भागातील पेशी तपकिरी होतात.

बुरशीचा जीवनक्रम :प्लझमोपॅरा व्हीटीकोला शेवाळ कवक वर्गातील बुरशी असून तंतू सलग पटलरहित असतात पण तंतू जुनी झाल्यावर पटल आढळतात या बुरशीचे कवक तंतू दमट हवामानात बिजूकपुंज तयार करतात ही बिजूकपुंज रन्ध्रातून अथवा अपित्व भेदुन आत प्रवेश करतात. आत बिजूकपुंज रुजून रन्ध्रातून ५-६ बीजूकदंड बाहेर येतात. ही बीजूक दंडाची संख्या निश्चित नसून ती २० पर्यंत असू शकतात या बीजूक दंडावर फांद्या येतात व त्यावर उपफांद्या येतात प्रत्येक फांदीच्या अग्रावर गोल वीबिजूक तयार होतो. विबीजूक चरबीजुक तयार करतात चर बीजुकात हालचाल तयार होऊन आवरणयुक्त होतात जनन नलिका तयार करून बीजूक रुजून निरोगी भागावर प्रदुर्भावीत होतात. या रोगाचा प्रसार रोगट पानात तयार होणा-या लैंगिक बिजाद्वारे, वेलीवर राहिलेल्या हिरव्या रोगग्रस्त पानाद्वारे अथवा वेलीवरील सुप्थ डोळ्यामध्ये असलेल्या बुरशीच्या तंतुमुळे होते. विबिजूक तयार होण्यास १२ अंश सेल्सिअस ते १३ अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तर बीजूक रुजवण्याकरिता १८ अंश सेल्सिअस ते २४ अंश सेल्सिअस तापमान पोषक असते. बीजूक रुजवण्यास व बुरशीची आक्रमक वाढ होण्यास ७० ते ९५ टक्के आर्द्रता आवश्यक असते. या रोगाच्या झपाटयाने वाढीकरिता जमिनीतील हवेतील, वेलीतील पाण्याचे प्रमाण महत्वाचे असते. या रोगाचा प्रादुर्भाव पावसात अधिक वाढल्याचे आढळते. आठवडयाचे अंतराने पाऊस पडत असल्यास या रोगाच्या वाढीस गती मिळते. जमीन निकृष्ट दर्जाची असल्यास या रोगाच्या जीवक्रमास अनुकूल परिस्थिती असल्यास रोगाचे नियंत्रण करणे अवघड जाते.

 

रोगाचे नियंत्रण :द्राक्ष फळबाग लागवडीपूर्वी जमीन सुपीक, योग्य नीच-याची निवडणे समस्यायुक्त जमीन असल्यास कृत्रिम चा-या काढून निचरा सुधारणे अथवा सुपिकता सेंद्रीय भूसुधारकाचा सलग वापर करणे रोगग्रस्त भागाची काळजीपूर्वक पाहणी करून नष्ट करणे संरक्षक बुरशी नाशक म्हणून १% बोर्डोमिश्रण किंवा डायथीओकार्बोमेटची फवारणी करणे. या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास फोसेटिल एएल फेनीन अमाईड, थायो लीनेट मिथेल किंवा रीडोमील ०.२५६ % तीव्रतेची केवोलीन औषधासोबत फवारणी करावी. या रोगामुळे श्वसन क्रियेत बदल होत असल्यामुळे वाढती विकृती आढळते. त्याकरिता शलाका कॅप्सुलची फवारणी करावी.

 

२) करपा (Anthracnos)

द्राक्ष पिकात करपा रोगाची लागण एल्सिनॉई अ‍ॅमेसेलीना (Elsinoe amoslina) किंवा स्पोसिलोमा अ‍ॅम्पेलिनम (sphaceloma ampelinum) या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार युरोपियन देशातून झाला. मात्र युरोपमध्ये १९८५ साली आणि नंतर ताम्रयुक्त औषधाच्या वापरामुळे या रोगाचे प्रमाणबरेच कमी झाले पण सेंद्रीय बुरशीनाशकांची वापरामुळे काही भागात रोगाचे प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले या बुरशीचे धागे अनेक पेशीय असतात दाट झुपक्याने एकत्र आढळतात या रोगाचा प्रादुर्भाव व जीवनक्रम संपल्यानंतर त्याच भागावर सुप्त अवस्थेत जातात. पुन्हा अनकूल परिस्थिती प्राप्त होताच बीजे तयार होऊन रोगाचा प्रादुर्भाव सुरु होतो.या रोगाचा प्रसार वारा,पाउस या माध्यमा मधून होतो.

 

रोगाची लक्षणे : करपा रोगामुळे द्राक्षाच्या पानावर बारीक ठिपके पडतात या ठिपक्यांचा आकार गोल किंवा कोनात्मक असतो.ठिपक्याची कडा तपकीरी रंगाची असते. रोगग्रस्त पानावर असंख्य ठिपके येतात. त्याची वाढ झाल्यावर ऐकमेकात मिसळून संपूर्ण पाने करपते त्यावर सुरुवातीच्या लागणीच्या ठिकाणी भोके पडतात.या सुरुवातीची लागण बहुदा कमकुवत कोवळ्या पानावर होते. नविन फुटीवर जास्त प्रादुर्भाव झाल्यास शेंड्याचा भाग करपतो. मध्यम रोगग्रस्त पाने वेडीवाकडी, आकारहीन दिसतात. पानाप्रमाणे हा रोग द्राक्ष काडयावरही आढळतो. सुरुवातीला जांभळट तपकिरी रंगाचे उभट गोलाकार किंवा कोनात्मक ठिपके आढळतात कालांतराने ठिपके एकमेकांत मिसळून ठिपक्यांचा मधला भाग खोलगट होतो. त्यांची व्याप्ती काष्ठा पर्यत होते या रोगाची लागण पिकउत्पादनाच्या वेळी केव्हाही होते. फुलोरा असतांनाही प्रादुर्भाव झाल्यास द्राक्षाचा फुलोरा करपून नष्ट होतो. मण्यावर प्रादुर्भाव असल्यास त्या ठिपक्यांचा आकार पक्षाच्या डोळ्यासारखा होतो त्यामुळे काही ठिकाणी 'बर्डस आयरॉट' म्हणूनही ओळखत असतात.या रोगामुळे मणी तडकण्याचे प्रमाण वाढते.

बुरशीचा जीवनक्रम :जुन्याभागातील सुप्तावस्थेतील बीजूक अनकूल परीस्थित २४ तासच अलैगिक बीजूक तयार होतात. पाउस, वारा प्रसारमाध्यमाद्वारे निरोगी हिरव्या भागावर पसरतात. अनुकूलता असल्यास वेलीच्या आंतरभागास बुरशीचे धाके रुजतात व गतीमान वाढ होण्यास सुरुवात होते ३२ अंश सेल्सिअस तपमान तीन-चार दिवस असल्यास पाउस असल्यास रोगाचा प्रसार झपाटयाने होतो.

रोगाचे नियंत्रण - द्राक्ष पिकाच्या लागवडी करीता निकृष्ट निच-याची जमीन निवडू नये चालू द्राक्ष बागेत निकृष्ट निचरा असल्यास सुरुवातीची खतांची मात्रा देतांना भू-सुधारक सेंद्रिय खताचा वापर सलग करावा. रोगग्रस्तभाग छाटून नष्ट करावा. पिकांची काढणी झाल्यावर बुरशी ग्रस्त भाग किंवा जुन्या रोगग्रस्त फांद्या नष्ट करून द्राक्ष बाग स्वच्छ ठेवावी. बाग करपा मुक्त ठेवण्यासाठी बुरशी संरक्षण म्हणून ०.२% किंवा ०.४ तीव्रतेची बोर्डोमिश्रणाची फवारणी २० ते २५ दिवसाच्या अंतरांनी करावी. पिकाची रोग प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी "रचक कॅप्सूल आणि केवोलीन" औषधाची फवारणी करावी_

 

३) भुरी (Powdery mildew)

द्राक्ष पिकात या बुरशीचा प्रादुर्भाव "अनसिन्युला निकेटर" (Uncinula necator ) या बुरशी पासून होत असतो या रोगाचा प्रथम प्रादुर्भाव १८३४ साली अमेरिकेत आढळून आला. भारतात द्राक्ष पिकातील हा एक महत्वाचा रोग असून या रोगाला अनकूल वातावरण उपलब्ध झाल्यास विराट रुपधारण करते या रोगाच्या तडाख्याने १९५०-५५ वर्षी फ्रान्स मध्ये होऊन संपूर्ण द्राक्ष पिकाचे नुकसान झाले होते. भारतात या रोगाची लक्षणे ऑक्टोबर छाटणीनंतर थंड हवामान, बेताची आद्रता असल्यास आढळते.

 

रोगाची लक्षणे :या रोगाचा प्रादुर्भाव वेलीच्या सर्व हिरव्या भागावर होतो. मात्र बुरशीचे धागे प्रत्यक्ष वेलीच्या भागात प्रवेश न करता पृष्ठभागावरच वाढते मात्र अन्नद्रव्य शोषणाकरीता बुरशीची मुळे (हॉस्टोरिया) पृष्ठपेशी (एपिडरमल सेल्स) मध्ये प्रवेश करतात या बुरशीची सुरुवातीची लक्षणे पिवळसर पांढरट रंगाचे ठिपके नंतर भुरकट पांढ-या रंगाचे दिसतात. हे ठिपके संपूर्ण पानावर पसरून काळपट दिसतात. पिकाचा सर्व भाग रोगग्रस्त होतो. रोगग्रस्त वेलीची वाढ खुंटून पानात विकृती येते फळ धारणेच्या वेळी प्रादुर्भाव असल्यास मणी अनियमित आकाराची होतात काही मणी अपक्वच राहतात. फुलोरा अवस्थेत या रोगाची लागण झाल्यास फलधारणा होत नाही फार मोठे नुकसान होते. यात विशेष म्हणजे मण्यात साखरेचे प्रमाण ८ टक्के पेक्षा पुढे गेल्यास घडावर या रोगाचा प्रादुर्भाव होत नाही.

 

बुरशीचा जीवनक्रम : सुप्ताअवस्थेमधील या बुरशीचे धागे वेलीच्या सुप्ता डोळ्यात जिवंत राहते. या बुरशीचे धागे वेलीच्या डोळांना आश्रीत भाग म्हणून उपयोग करून एक हंगामापासून दुस-या हंगामापर्यत जीवंत राहतात. अनकूल परिस्थिती उपलब्ध होताच सुप्त डोळ्यांतील धागे वाढून नवीन कोवळ्या फुटीवर रोगाची लागण करतात. त्या ठिकाणी बुरशीची वाढ होऊन बीजूक तयार होऊन रोगाचा प्रसाराचा परीचक्र सुरु होतो. या बुरशीची वाढ वातावरणातील आद्रता, तपमान, सूर्यप्रकाशावर अवलंबून असते. हवेत ४० ते १०० टक्के आद्रता, २० ते २४ अंश सेल्सिअस तपमान असतांना रोगाचा प्रादुर्भाव, प्रसार झपाटयाने होतो. ३५ अंश सेल्सियस तपमानात रोगाची तीव्रता कमी होते आणि ४० अंश सेल्सिअसच्या पुढे तपमान गेल्यास या बुरशीचा नाश होतो. पानाच्या पृष्ठभागावर पाण्याचे तुषार साचल्यास अथवा पाउस पडल्यास या बुरशीच्या प्रसारास आळा बसतो.

 

रोगाची नियंत्रण :या बुरशीच्या प्रादुर्भाव पूर्व संरक्षणाकरीता गंधकाची भुकटीची धुरळणी किंवा पाण्यातून फवारणी कमी किंमतीचा प्रभावी उपाय आहे. या बुरशीचा प्रादुर्भाव आढल्यास बेनोमील (बेनलेट) बेलेटॉन (ट्रायडीफॉन)०.२५ तीव्रतेचे द्रावण निवारक म्हणून फवारावे अथवा जास्त प्रादुर्भाव असल्यास अ‍ॅझाक्सीस्टोपीन २३ ईसी (अ‍ॅमिस्टार) २०० मिली एकर या प्रमाणात फवारणी घ्यावी तसेच बागेत खेळती हवा, सूर्यप्रकाश पडेल अशी व्यवस्था करावी वेलीत प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रेणू-ए व केवोलीनची मात्रा द्यावी द्राक्ष पिकात या शिवाय कमी अधिक प्रमाणात फोमॉपसिस परका (Phomopsis Cane and leaf spot) फोमॉपसिस व्हिटोकोला (Phomapsis viticola) बुरशीमुळे होतो पक्व फळकुज (Ripe Rot) कोलोटॉटीकम ग्ल्युओस्पोराईडस (Colletotrichum gloeoporoides) आणि ग्लोमेरेला (Glomerella cingulata) या बुरशीपासून होतो. डिप्लोडीया (Diplodia Cane Dieback) डिप्लोडीया नॉटालान्सीस ( Diplodia natalansis) बुरशीमुळे होतो प्युजेरीयम मर (Fusarium wilt) हा रोग प्युजेरीयम स्पेसिज ( Fusarium sp) प्रकारातील बुरशीमुळे होतो. रायझोक्तोनिया मुळकुज (Rhozoctonia Root Rot) या रोगाची लागण रायझोक्क्तोनिया बटाटीकोला (Rhizoctonia bataticola) बुरशीमुळे होतो.

या बुरशीच्या नियंत्रणासाठी 'बुरशी संरक्षण' बुरशी निर्मुलन, बुरशी निवारक, बुरशीनाशकाची प्रमाणीत मात्रांचा वापर करावा बुरशीजन्य रोगाव्यतीरीक्त जीवानुजन्य, विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. द्राक्ष पिकात रोगाच्या प्रदुर्भावाकरीता जमिनीच्या मुलभूत गुणधर्माचा -हास सुध्दा कारणीभूत आहेत जमिनीची सुपिकता वाढवल्यास द्राक्ष पिकात रोगप्रतिकार क्षमता तयार होऊन पिक रोगमुक्त रहाण्यास मदत होईल. या जमिनीच्या समस्या दूर करण्याकरिता 'सुपीकता' या सारखे भू-सुधारक सेंद्रीय खते अधिक प्रभावी आढळून आले आहेत. कायम स्वरुपी रोगमुक्त ठेवण्याकरीता जमिनीची सुपीकता प्राप्तकरणे रोग नियंत्रणासाठी महत्वाची पायरी ठरेल.

 

लेखक - प्रवीण सरवदे, कराड

प्रतिनिधि - गोपाल उगले

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters