1. कृषीपीडिया

रेशीम उद्योग : एक शेतीपूरक उद्योग

रेशीम उद्योग हा एक चांगला कुटीरउद्योग असून, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणे, उत्पादित मालाच्या विक्रीची हमी, घरच्याघरी करण्यात येण्यासारखा तसेच बाजारात चांगली मागणी असणारा उद्योग आहे. सदर उद्योगाला महाराष्ट्र सरकारने विशेष प्राधान्य व सवलती दिल्या असून रोजगार निर्मितीक्षमता, उत्पादकता व नियमित उत्पादन क्षमता असणारा हा उद्योग आहे.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Sericulture  industry news

Sericulture industry news

डॉ.स्वाती गुर्वे, डॉ. पराग तुरखडे

आजचे बदलते हवामान, शेतीत उत्पादन खर्चात होणारी वाढ, उत्पादीत मालाचा कमी भाव यामुळे शेतकऱ्यांना एकटी शेती करणे परवडत नाही म्हणून शेतकऱ्यांनी पारंपारीक पिकाव्यतिरिक्त एकात्मिक शेतीचा विचार करणे काळाची गरज आहे. यामध्ये रेशीम उद्योग हा एक चांगला कुटीरउद्योग असून, कमी खर्चात जास्त उत्पन्न देणे, उत्पादित मालाच्या विक्रीची हमी, घरच्याघरी करण्यात येण्यासारखा तसेच बाजारात चांगली मागणी असणारा उद्योग आहे. सदर उद्योगाला महाराष्ट्र सरकारने विशेष प्राधान्य व सवलती दिल्या असून रोजगार निर्मितीक्षमता, उत्पादकता व नियमित उत्पादन क्षमता असणारा हा उद्योग आहे.

रेशीम उद्योगाचे महत्व :

१)रेशीम उद्योगापासून दरमहा शाश्वत उत्पन्न मिळू शकते.
२)एकदा लागवड केली की पुढील १२ ते १५ वर्ष तुती लागवडीचा खर्च होत नाही.
३)एकदा संगोपन गृह व साहित्य खरेदी केले की त्याचाही खर्च होत नाही.
४)इतर बागायती पिकांच्या तुलनेत तुतीला १/३ पाणी कमी लागते.
५)तुती बागेस किटनाशके व फवारणीचा खर्च लागत नाही.
६)रेशीम अळ्यांनी खावून राहिलेला पाला जनावरांना दिल्यास त्यांच्या दुधाच्या व फॅटस्च्या प्रमाणात वाढ होते. तसेच मुरघासही बनवता येतो.
७)संगोपनातील काड्या, अळ्यांची विष्ठा, पाला कुजवून चांगल्या प्रतिचे गांडुळ खत तयार करता येते.
८)तुतीच्या काड्यांचा उपयोग इंधन म्हणून जाळण्यासाठीही होतो.
९)सदर उद्योग महीला, पुरुष, लहान मुले कोणीही करण्यासारखा आहे.
या उद्योगात अल्प भांडवली गुंतवणूक करुन दरमहा पगारासारखे उत्पन्न मिळु शकते.
११)ग्रामीण भागात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करुन देणारा व्यवसाय आहे.
१२)शासनाकडुन रोगमुक्त अंडी व द्वितीय अवस्थेतील अळ्या (चॉकी) उपलब्धता आहे.
१३)कोष विक्रीसाठी प्रत्येक तालुक्यात ३-४ ठिकाण उपलब्ध आहेत.
१४)कोषापासुन धागा काढून त्यापासून कापड तयार होते व याशिवाय कमी प्रतिच्या कोषांपासून बुके, हार व देखाव्याच्या इतर वस्तुदेखील तयार होतात.
१५)रेशीम उद्योगासाठी शासनाच्या अनेक सवलती आहेत.

उद्योगाकरिता मिळणाऱ्या शासनाच्या सवलती

१) शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण व वेळोवेळी प्रत्यक्ष बागेस भेट देवून मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते.
२)मोफत अभ्यास दौरे आयोजित करुन रेशीम उद्योगाविषयी माहिती दिली जाते.
३)शासनामार्फत ७५ टक्के सवलतीच्या दरात अंडीपुंजाचा पुरवठा केला जातो.
४)सन २०१५-१६ पासुन महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत अनुदान देण्यात येते.
५)२०२०-२१ मध्ये एका एकरासाठी रु. ३,२३,७९०/- अनुदान ३ वर्षात विभागुन दिले जाते.
६)किटक संगोपन गृहाच्या बांधकामासाठी एका वर्षात रु. ९९,७४४/- एवढे अनुदान दिले जाते.

रेशीम उद्योगाचे प्रमुख ३ टप्पे :

१)रेशीम किड्यांसाठी अन्न निर्मिती: रेशीम किडींच्या विविध जातीपैकी बॉम्बॅक्स मोरी ही जात जास्त प्रचलित आहे. त्या अळ्यांसाठी तुतीच्या झाडाचा पाला अन्न म्हणून उपयोगास येतो. मध्यम पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयोगी पडते. लागवडीसाठी व्ही-१ या जातीची कलमे लागवडीचे अंतर मध्यम जमिनीत ९०४६० से.मी. व हलक्या जमिनीत ६०४६० से.मी. ठेवावे. १०-१५ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. एक हेक्टर बागायती तुतीपासून वर्षाला ३०,००० किलो पाला मिळतो व त्यापासून ८०० ते १२०० किलो रेशीम कोषाचे उत्पादन मिळते.
२)रेशीम किड्यांचे संगोपन: रेशीम किड्यांच्या संगोपनासाठी ०.४ हेक्टर तुतीची लागवड असल्यास १३४७ मी. आकाराची खोली लागते संगोपनासाठी संच पद्धतीचा वापर करतात. संच हा लाकूड, बांबू किंवा लोखंडापासून बनवला असून त्यात ३-४ खाणे असतात. या खाण्यात अळ्यांना फांदी पद्धतीने पाने खावू घालतात.
३)कोष निर्मिती : रेशीम किटकाचे जीवनचक्र अंडी, अळी, कोष व पतंग आशा चार अवस्थेत पुर्ण होत असून वातावरणानुसार २०-२५ दिवसात अळी उबवल्यानंतर कोषात जाण्याची प्रक्रिया सुरु होते कोषावस्था सुरु होताच अळ्यांवर चंद्रिका जाळ्या टाकाव्यात. एका जाळीवर ४० पर्यंत अळ्या असाव्यात वातावरणानुसार पुर्ण विकसित झालेल्या अळ्या ३-५ दिवसात कोष तयार करतात सदर कोषांना लवकरात लवकर विकणे गरजेचे आहे. अन्यथा पतंग कोषाबाहेर येवून रेशीम धागे तुटतात व कोष विक्रीस होतात.

तुती पिकावरील किड व रोगाचे व्यवस्थापनः

महाराष्ट्रात फांदी पद्धतीने अळी संगोपन केले जात असल्याने सर्वच पाला अळी संगोपनासाठी वापरला जातो त्यामुळे कीड व रोगांचा प्रदुर्भाव शक्यातो कमी प्रमाणात आढळतो. कधीतरी तुतीच्या कलमांना किंवा झाडांना वाळवी, हुमणी, पांढरे ढेकूण व लष्करी अळीचा तसेच काही बुरशीजन्य व मर रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात हावू शकतो. लागवड करताना बेणे किंवा कलमे ५ ते १० मिनिटे आधी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीनाशक द्रावणात बुडवून ठेवल्यास मर रोगामुळे होणारे नुकसान टाळता येते. हुमणी आणि वाळवी प्रादुर्भावग्रस्त भागात लागवडीपुर्वी बेणे किंवा कलमे क्लोरोपायरीफॉस या किटकनाशकाच्या द्रवणात ५ ते १० मिनिटे नंतर लागवड करावी पानांवर भुरी रोगाचा प्रादुर्भाव पावसाळी व हिवाळी हंगामात होतो त्यासाठी बागेत हवा चांगली खेळती राहिल्यास ह्या रोगाचा प्रसार कमी करता येतो व सदर रोगाच्या नियंत्रणासाठी ०.२% बाविस्टिन हे बुरशीनाशक पानांवर फवारु शकतो. महत्वाचे म्हणजे किटकनाशके किंवा बुरशीनाशके फवारल्यानंतर किमान १५ दिवसानंतर पाला अळ्यांना अन्न म्हणून द्यावा त्याहीपेक्षा तुतीवर कुठल्याही रसायनाची फवारणी टाळणे योग्य असेल.

रेशीम अळ्यांवरील रोगांची लक्षणे व उपाययोजना:

रेशीम अळ्या संगोपनांतर्गत ऋतुमानानुसार अळ्यांना विविध रोगांची बाधा होवून अळ्या मृत पावतात व पुरेसे कोष उपलब्ध न झाल्याने आर्थिक नुकसान सोसावे लागतात. संगोतपनांतर्गत अळ्यांवर उद्भवणारे रोग पुढीलप्रमाणे आहेत.

ग्रासरी: हा रोग विषाणुजन्य असून बहुधा पावसाळा व उन्हाळ्यात याची लागण होते. सदर रोग संसर्गजन्य असून अळ्यांना कुठल्याही अवस्थेत प्रादुर्भाव होवू शकतो. रोगाची लक्षणे म्हणजे अळ्यांच्या शरीरावर सुज येवून त्वचा ताणल्यासारखी होवून शरीरातून पिवळ्या रंगाचा द्रव बाहेर पडतो. कोषावर जाण्यापुर्वी रोग उद्भवल्यास अळ्या पोचट कोष करुन त्यातच मरतात सदर रोगाची कारणे म्हणजे दोन अळी संगोपनात योग्य असे निर्जंतुकीकरण नसणे, संगोपनगृहात हवा खेळती नसणे, बेडवर अळ्यांची गर्दी होणे, स्वच्छता नसणे योग्य प्रतिचा पाला नसणे सदर कारणांमुळे अळ्या सहजासहजी रोगास बळी पडतात. यावर उपाययोजना म्हणजे संगोपनगृहात कायम स्वच्छता ठेवणे, नियमित निर्जंतुकिकरण करणे, रोगट अळ्या वेळीच फॉरमॅलिन द्रवणात नष्ट करणे, बेडवर विजेता पावडर नियमित वापरणे, उत्तम पाला खावू घालणे व उर्वरीत पाला पाचोळा संगोपनगृहाच्या लांब कुजवणे. सदर उपाययोजना करुन ग्रासरी रोगाचे नुकसान टाळता येते.

फ्लेचेरी: या रोगामुळे अळ्यांची हालचाल मंदावते व त्या सुस्तावतात त्याचे शरीर मऊ व लवचिक बनते. तसेच अळी चपटी होवून काळी पडते. रोगग्रस्त अळ्यांना हागवण लागूण दुर्गंधी येते. सदर रोगाची कारणे म्हणजे संगोपनगृहाचे तापमान व आर्द्रता गरजेपेक्षा जास्त वाढणे, हवा खेळती नसणे, ओलसर पाला टाकणे व बेडवर अळ्यांची गर्दी होणे होय. या रोगासाठी उपाययोजना म्हणजे अंडीपुंजाची साठवणूक शास्त्रोक्त पद्धतीत करणे, उत्तम प्रतिचा पाला वयानुरुप खावू घालणे, संगापनगृहात तापमान व आर्द्रता राखणे अळ्यांची गर्दी टाळणे व बेडवर विजेता पावडर वापरणे.

मस्कार्डाइन: हा बुरशीजन्य रोग असून याचा प्रादुर्भाव पावसाळयात व हिवाळ्यात होतो. अळ्यांच्या शरीरावर बुरशीची वाढ होवून अळ्या मृत पावतात. एकदा प्रादुर्भाव झाला की तो झपाट्याने वाढतो. यामध्ये रोगग्रस्त अळ्यांची भुक व हालचाल मंदावते. अळ्यांचे शरीर खड़ सारखे टणक बनते, यावर उपाययोजना म्हणजे निर्जंतुकीकरण व्यवस्थित करणे, स्वच्छता ठेवणे, आद्रता व तापमान कमी ठेवणे, अळ्यांच्या शरीरावर विजेता पावडर धुरळणे होय.

अॅस्परजिलेसीस: सदर रोगाची लागण बाल्यअळ्यांना होते. रोगाचे लक्षण म्हणजे अळीचे शरीर पांढरे किंवा हिरवे होवून अळ्या मृत पावतात. उपाययोजना म्हणजे मृत अळ्या नष्ट करणे, तापमान आद्रता कमी करणे, हवा खेळती ठेवणे व विजेता पावडरची धुरळणी करणे होय.

लेखक - डॉ.स्वाती गुर्वे, शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, बोरगाव, ता. जि. सातारा
डॉ. पराग तुरखडे, शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, कणेरी मठ, ता. कागल, जि. कोल्हापूर

English Summary: Sericulture An agriculturist industry reshim udyoag reshim news Published on: 17 April 2024, 03:43 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters