लिंबूवर्गीय(Orange) फळझाडांना बहार येण्याकरीत्या झाडाची वाढ करणारे अन्नद्रव्य (कर्ब/नत्र) वाढीकरिता खर्च न होता, अन्नद्रव्यांचा संचय होणे जरुरी असते. अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये प्रमाणबध्द झाल्यावर पोषक हवामान मिळताच, बहाराची फुले नवतीसोबत दिसू लागतात. बहार धरणे म्हणजे झाडांना पाण्याचा ताण देऊन विश्रांती देणे. निसर्गतः संत्रा-मोसंबी फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहारास मृग बहार आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये (हस्त नक्षत्रात) येणाऱ्या बहारास हस्त बहार तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे (थंडी संपतेवेळी) येणाऱ्या बहरास आंबे बहार म्हणतात.
बहार धरण्याकरीत्या जमिनीच्या मगदुराप्रमाणे झाडाचे वय व अवस्था पाहून ताण घावा. हलक्या जमिनीत 35 ते 45 दिवस, मध्यम जमिनीत 45-60 दिवस आणि भारी जमिनीत 55 ते 65 दिवस ताण द्यावा. आंबिया बहारासाठी 5 डिसेंबर ते 15 जानेवारी पर्यंत ताण द्यावा. ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास सायकोसिल 1,000 पी.पी.एम. (1,000 मि.ली. ग्रॅम प्रति लिटर पाणी) ची फवारणी करावी. सायकोसिल ऐवजी लिव्होसिन (50%) मार्केट मध्ये उपलब्ध आहे. एक लिटर पाण्यात 2 मि.ली. लिव्होसिन टाकून (1,000 पी.पी.एम.) फवारणी करावी.
हेही वाचा:ऊस उत्पादकासांठी खूशखबर ! प्रति क्विंटल ऊसाला १० ते २८५ रुपये वाढीव भाव मिळणार
आंबे बहार व्यवस्थापन:
संत्रा-मोसंबीची झाडे निसर्गतः थंडीच्या आणि उन्हाळ्याच्या दिवसात कमी-जास्त तापमानामुळे झाडे दोनदा विश्रांती घेतात वाढ थांबल्यामुळे अन्नद्रव्यांचा संचय झाडाच्या फांद्यांमध्ये होतो. हवामान अनुकूल झाल्यावर झाडावर फुले येण्यास याचा उपयोग होतो. डिसेंबरचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या एका महिन्याच्या कालावधीत रात्रीचे किमान तापमान साधारणतः 10 अंश सेल्शिअसपेक्षा कमी असते, परिणामी झाडांना नैसर्गिक ताण बसतो. यामुळे संत्रा-मोसंबीच्या आंबे बहाराला ‘नैसर्गिक बहार’ असे म्हणतात.
ताण देणे:
काळ्या जमिनीत झाडे ताणावर सोडताच झाडाच्या मुळ्या पाण्याच्या शोधात खोलवर जातात. काळी जमीन ही उत्तम ओलावा टिकवून ठेवणारी असल्यामुळे झाडांना ओलावा मिळत राहतो त्यामुळे झाडाला ताण बसत नाही. 5 डिसेंबरच्या आसपास झाडांच्या ओळींमधून ट्रक्टरच्या सहाय्याने नांगरून झाडाच्या मुळ्या उघड्या कराव्यात. त्यामुळे टोकावरची तंतूमुळे तुटल्याने झाडला ताण बसतो. तसेच ताणाच्या कालावधीत पाऊस पडल्यास 2 मि.लि. क्लोरमेक्वाट क्लोडराईड (लिहोसीन) प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारावे. हे कायिक वाढ रोखणारे संजीवक आहे.
झाडास ताण बसला हे कसे ओळखावे
ताण सुरू करण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे काढावीत, फळे पूर्ण काढून झाल्यानंतर बागेला पाणी देणे बंद करावे. साधारणपणे 25 ते 35 टक्के पानगळ झाल्यास झाडाला ताण बसला असे समजावे. अशा प्रकारे झाडांना ताण दिल्यास व नंतर ताण तोडल्यास एकाच वेळी फुलोरा येतो आणि ते व्यापारीदृष्ट्या फायद्याचे ठरते.
अन्नद्रव्य व्यवस्थापन:
डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून झाडे ताणावर सोडल्यानंतर बागेला आडवी-उभी नांगरणी व वखरणी करावी. तसेच प्रत्येक झाडाला आळे बांधून 40 ते 50 किलो शेणखत टाकून जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा झाडाचा ताण तोडतांना हलक्या ओलिता अगोदर प्रत्येक झाडाला 450 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद, 300 ग्रॅम पालाश प्रती झाड द्यावीत. शेणखतासोबत 7 कीलो निंबोळी पेंड, 500 ग्रॅम व्हॅम, 100 ग्रॅम स्फूरद विरघळणारे जिवाणु 100 ग्रॅम ॲझोस्पिरीलम आणि 100 ग्रॅम ट्रायकोडर्मा हरजियानम यांचे एकञ मिश्रण करून द्यावे. त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी द्यावे.
अशाप्रकारे दिल्या जाणाऱ्या पहिल्या व दुसऱ्या पाण्याला आंबवणी व चिंबवणी असे म्हटले जाते. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर 20 ते 25 दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा अर्धा हप्ता (450 ग्रॅम) फुलोऱ्यानंतर एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा. हलक्या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. तसेच सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता आढलळ्यास मार्च महिन्यात नवीन पालवी आल्यानंतर 0.5% झिंक सल्फेट, मँगेनीज सल्फेट व मँग्नेशियम सल्फेट आणि 0.3% फेरस सल्फेट आणि कॉपर सल्फेट या सूक्ष्म अन्नद्रव्याची एकत्रित फवारणी करून घ्यावीत.
हेही वाचा:ऊस रोपवाटिका व्यवस्थापन
पाणी व्यवस्थापन:
आंबिया बहाराची फळे उन्हाळ्यात झाडावर पोसली जातात त्यामुळे पाण्याचा साठा उन्हाळ्यात उपलब्ध असणे जरुरीचे आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्यास फळगळ होते व फळांची प्रत खालावते म्हणून आंबे बहार घेतांना ओलिताकडे कटाक्षाने लक्ष देणे जरुरीचे आहे. ओलितासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास पाण्याची बचत होते. जमिनीच्या पोताप्रमाणे पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
बहार धरताना या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे :
- ताण देण्यापूर्वी झाडावरील पूर्वीची फळे, वाळलेल्या, रोगट फांद्या काढून टाकाव्यात.
- किती काळ ताण द्यायचा हे जमिनीची प्रत व झाडाचे वय पाहून निश्चित करावे.
- आवश्यकतेपेक्षा जास्त ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी.
- झाडांची नियमित पाहणी करून कीड व रोग नियंत्रणाचे उपाय योजावेत.
- सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी बागेभोवती झेंडूच्या रोपांची लागवड करावी.
फळगळ रोखण्याकरिता उपाय :
- आंबिया बहारातील फळांची गळ ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात होते. ती कमी करण्यासाठी एन.ए.ए. 10 पी.पी.एम. (1 ग्रॅम) +1% युरिया (1 किलो) 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
- बुरशीजन्य फळगळ रोखण्याकरिता फळधारणा झाल्यावर कार्बेनडेझीम 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.
- फळधारणेच्या काळात झाडाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. अथवा आळ्यात पाणी साचू देवू नये तसेच बागेची खोल मशागत करू नये.
श्री. शक्तीकुमार आनंदराव तायडे
पीएच.डी.विद्यार्थी, उद्यानविद्या विभाग
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
7588189834
Share your comments